लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp मध्ये लवकरच एक नवीन फिचार बघायला मिळणार आहे. या नवीन फिचरअंतर्गत युजर्स कोणताही व्हिडिओ सेंड करण्याआधी तो ‘म्यूट’ करु शकणार आहेत. यासोबतच व्हिडिओला एडिट आणि इमोजी लावण्याचा पर्यायही मिळू शकतो.

WhatsApp ने हे नवीन फिचर आपल्या बीटा युजर्ससाठी जारी केलं आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर सर्व युजर्ससाठी हे फिचर रोलआउट केलं जाईल. लेटेस्ट बीटा व्हर्जन म्हणजे WhatsApp beta 2.21.3.13 वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध झालंय. WhatsApp चे फिचर्स ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo ने याबाबत माहिती दिली असून एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

स्क्रीनशॉटमध्ये एक स्पीकरचा आयकॉन दिसत आहे. व्हिडिओ पाठवताना स्पीकर आयकॉनवर टॅप केल्यानंतर व्हिडिओ म्यूट होऊन सेंड होईल. हे फिचर सध्या बीटा व्हर्जनसाठीच आहे. गेल्या वर्षापासून या फिचरवर कंपनीकडून टेस्टिंग सुरू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयफोनवर हे फिचर टेस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता अँड्रॉइडवर हे फिचर टेस्ट केलं जात आहे.