Sleeping Time : झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. अनेकदा डॉक्टर ७ ते ९ तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात. मात्र, बदलत्या लाइफस्टाइलनुसार अनेकांची झोप पूर्ण होत नाही आणि अपूर्ण झोपेमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. काही लोकांना रात्री उशिरा झोपण्याची सवय असते, तर काही लोकांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. मुळात या दोन्ही सवयी घातक आहेत.
व्यक्तीने किती तासाची झोप घ्यावी, हे व्यक्तीचे वय, काम करण्याची पद्धत आणि झोपण्याच्या वेळापत्रकानुसार ठरवू शकता. रात्री किती वाजता झोपावे आणि किती तास झोपावे? याविषयी आज आपण जाणून घेऊया.
रात्री किती वाजता झोपावे?
‘व्हेरी वेल हेल्थ’ या वेबसाइटनी दिलेल्या माहितीनुसार, व्यक्तीने ७ ते ९ तासाची झोप घेणे आवश्यक आहे, पण वयानुसार झोपण्याची वेळ ही प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असू शकते. किशोरवयीन मुलांनी रात्री ९ ते १० च्या दरम्यान झोपावे. प्रौढ वयातील व्यक्तींचा झोपण्याचा बेस्ट टाइम १० ते ११ आहे. लहान मुलांनी ७ ते ९ च्या दरम्यान झोपावे. विशेष म्हणजे नियमित झोपण्याची वेळ पाळणे आरोग्यासाठी चांगले आहे.
हेही वाचा : Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सब्जा फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ….
किती तास झोपावे?
वयानुसार प्रत्येक व्यक्तीचा झोपण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. बाळांनी १२ ते १५ तास झोपणे आवश्यक आहे. लहान मुलांनी ११ ते १४ तास झोपावे, तर शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनी ९ ते ११ तास झोपावे. किशोरवयीन मुलांनी ८ ते १० तास झोपणे गरजेचे आहे. तरुणांनी ७ ते ९ तास झोपणे कधीही चांगले आहे. चांगल्या आरोग्यासाठी वृद्धांनी ७ ते ८ तासांची झोप घ्यावी.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)