How To Keep Knees Healthy : गुडघेदुखीचा त्रास आजकाल बहुतेकांना होत असल्याचे दिसू लागले आहे. कर्मचारी वर्गापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत गुडघेदुखी आता सामान्य झाली आहे. त्यामुळे गुडघे मजबूत आणि सुस्थितीत असणे महत्त्वाचे ठरत आहे. तुमचे गुडघे तुमच्या शरीराचे वजन वाहून नेतात, तुम्हाला हालचाल करण्यास मदत करतात. पण, कालांतराने झीज, बसण्याची अयोग्य स्थिती किंवा पोषक तत्त्वांची कमतरता यांमुळे सांधे कमकुवत होऊ शकतात. पण, आज आपण या सगळ्या दुखण्यावर एक साधा आणि रोजच्या आयुष्यात करता येणारा उपाय पाहणार आहोत. योग्य आहाराने तुम्ही तुमच्या गुडघ्यांना आधार देऊ शकता आणि निरोगी जीवनशैली निवडू शकता.
नियमित व्यायाम आणि योग्य आसनासह,तुमचे गुडघे सुरक्षित ठेवण्याबरोबर शरीराला योग्य पोषण मिळणेदेखील महत्त्वाचे आहे. तुमचे गुडघे मजबूत ठेवण्यास, दुखापत होण्याचा धोका कमी करण्यास आणि वयानुसार होणारी झीज रोखण्यास काही पदार्थ तुम्हाला मदत करू शकतात. त्यामुळे @indiatvnews ने दिलेल्या वृत्तानुसार येथे असे काही पदार्थ दिले आहेत, जे तुमचे गुडघे मजबूत ठेवू शकतात…
मासे (फॅटी फिश)
सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन व ट्युना हे मासे ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध असतात. त्यामध्ये सूज कमी करणे आणि सांध्यांना फायदा देणारे गुणधर्म असतात. गुडघेदुखी, शरीर कडक होणे हे बहुतेकदा सांध्यातील जळजळीमुळे होते. त्यामुळे ओमेगा- ३ सूज कमी करण्यास, चालण्याची किंवा शरीराची हालचाल करण्याची क्षमता सुधारतात आणि दीर्घकालीन सांध्यांच्या आरोग्यास मदत करतात.
पालेभाज्या (कॅल्शियम + व्हिटॅमिन के)
पालक, केल (Kale) व कोलार्ड ग्रीन्स (collard greens) यांसारख्या भाज्या तुम्हाला कॅल्शियम देतात, जे तुमच्या हाडांसाठी फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन के हाडांच्या चयापचयात महत्त्वाची भूमिका बजावते. जर गुडघ्याभोवतीची हाडे मजबूत असतील, तर सांध्यावरील ताण कमी करण्यास मदत होते. तसेच व्हिटॅमिन केकडून कॅल्शियमचे योग्य ठिकाणी वापर केला जातो, ज्यामुळे कॅल्शियम चुकीच्या ठिकाणी साचत नाही.
लिंबूवर्गीय फळे (व्हिटॅमिन सी)
संत्री, लिंबू, द्राक्षे यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते; जे कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक असते. कोलेजन हे कार्टिलेज, टेंडन्स व लिगामेंट्सचा एक प्रमुख भाग आहे. पुरेशा प्रमाणातील व्हिटॅमिन सी तुमच्या गुडघ्यांभोवती असणारा गादीसारखा भाग सुरक्षित ठेवण्यास मदत क, ज्यामुळे झीज कमी होते.
सुका मेवा (मॅग्नेशियम + व्हिटॅमिन ई)
बदाम, अक्रोड, चिया सीड्स व जवस हे हाडांच्या घनतेसाठी मॅग्नेशियम आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यासाठी व्हिटॅमिन ई शरीराला पोहचवतात. गुडघ्याच्या सांध्याला मुक्त रॅडिकल्समुळे (शरीरातील हानिकारक घटक) लवकर नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हिटॅमिन ई यांपासून संरक्षण करण्यासाठी एक ढाल म्हणून काम करते. त्यामुळे शरीराची हालचाल म्हणजे नीट वाकणे, उभे राहणे व चालणे या क्रियांना मदत होते.
मटण किंवा चिकन रस्सा (कोलेजन + जिलेटिन)
घरी बनवलेला रस्सा हा निरोगी सांध्यासाठी एक जुना उपाय आहे. त्यात कोलेजन, जिलेटिन, प्रोलाइन व ग्लाइसिन यांसारखी अमिनो आम्ले असतात. या रश्शाच्या नियमित सेवनाने गुडघ्यांभोवती असणारा गादीसारख्या भागामध्ये सुधारणा होते आणि कडकपणा कमी होऊन गुडघे मऊसर होतात.