लहान वयात केस पांढरे होणे म्हणजे केवळ केस खराब होणे नसून, मानसिक स्वास्थ बिघडवणारेदेखील ठरते. केसांचे पांढरे पडणे थांबविण्यासाठी अनेकजण विविध प्रकारच्या रासायनिक प्रसाधनांचा वापर करताना दिसतात. परंतु, त्याचा केसांवर विपरीत परीणाम होत असल्याचे पाहायला मिळते. केस लहानपणीच पांढरे होण्यामागे बदललेली जीवनशैली हे मुख्य कारण आहे. तणाव, अपुरी झोप, प्रदूषण, निकृष्ट प्रतिचे भोजन यासारख्या कारणांमुळे कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे दिलेल्या घरगुती उपायांचा वापर केल्यास लहान वयात केस पांढरे होणे थांबवता येऊ शकते.
कढीपत्ता – ग्लासभर पाण्यात कढीपत्ता उकळवून पाणी अर्ध्यावर आले की गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवावे. त्यानंतर या पाण्याचे सेवन करावे. रोज असे केल्यास हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.
लिंबू आणि आवळा – आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ची मात्रा मुबलक प्रमाणात असते. स्किनच्या डेड सेल्सवर हे परिणामकारक ठरते. यामुळे केस तुटणे, केसांना इजा पोचणे आणि केस पांढरे होण्यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. यासाठी लिंबाच्या रसात आवळ्याची पावडर मिसळून रोज सकाळी याचे सेवन करावे.
त्रिफळा चूर्ण – याच्या सेवनाने नवीन सेल्सच्या निर्मितीसाठी फायदा होऊ शकतो. त्रिफळा चूर्ण केसांसाठी फायदेशीर असते. त्रिफळा चूर्ण केसांना पांढरे होण्यापासून थांबविण्याबरोबरच डॅमेज झालेल्या केसांनादेखील ठीक करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण आणि आवळ्याचे चूर्ण पाण्यात मिसळून सेवन करावे.
भृंगराज तेल – हा एक आयुर्वेदिक उपाय असून, केसांच्या सर्व समस्यांवर गुणकारी आहे. केसांना पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी हे तेल अतिशय फायदेशीर ठरते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भृंगराज तेल आणि एक चमचा आवळा तेल एकत्र करून केसांना लावावे.
कांदा – केसांना कमी वयातच पांढरे होण्यापासून थांबविण्यासाठी हा गुणकारी घरगुती उपाय आहे. रोज रात्री कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून रात्रभर केस तसेच ठेवावे आणि सकाळी डोक्यावरून अंघोळ करावी. पांढऱ्या केसांच्या समस्येतून मुक्त होण्याबरोबरच केसांच्या वाढीसाठीदेखील मदत होते.
सूचना – वरील उपाय करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.