White or Pink Guava : फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डॉक्टर अनेकदा आहारात हंगामी फळे खाण्याचा सल्ला देतात. काही फळे आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. पेरू हे सर्वोत्तम फळांच्या यादीतील एक असे फळ आहे, जे दररोज सेवन केल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे फळ पांढरा आणि गुलाबी अशा दोश रंगांमध्ये उपलब्ध असते.
पांढऱ्या पेरूच्या तुलनेत गुलाबी पेरू दिसायला खूप छान दिसतो आणि तो खावासा वाटतो. पण, पांढरा आणि गुलाबी अशा दोन्ही प्रकारच्या पेरूमुळे शरीराला जे पोषण मिळते, ते समान असते का, या दोन्ही प्रकारच्या पेरूंचा शरीरावर समान परिणाम होतो का? आहारतज्ज्ञ शिखा कुमारी यांनी इन्स्टाग्रामवर पेरू खाण्याचे फायदे आणि दोघांमधील फरक स्पष्ट केला आहे. दोन्ही प्रकारच्या पेरूंमध्ये काय फरक आहे आणि ते आरोग्यावर कसा परिणाम करतात ते जाणून घेऊया.
पांढऱ्या पेरूचे आरोग्यदायी फायदे
तज्ज्ञांनी सांगितले की, हलक्या हिरव्या, किंचित गोड असलेल्या या फळाच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्यही सुधारते. पेरूचे सेवन महिलांचे आरोग्य सुधारण्यासदेखील मदत करते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो आणि पचन सुधारते. पेरूचे सेवन वजन कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. त्यात कर्करोगविरोधी गुणधर्मदेखील आहेत. त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. हे फळ त्वचेचा रंगदेखील सुधारते.
मुंबईतील भाटिया हॉस्पिटलमधील वरिष्ठ आहारतज्ज्ञ तन्वी एस. चिपळूणकर म्हणाल्या की, या फायद्यांव्यतिरिक्त, पेरू हा लोह, कॅल्शियम व फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. ते पुढे म्हणाले की, पेरू हा आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जो मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो.
गुलाबी पेरू पांढऱ्या पेरूपेक्षा कसा वेगळा?
गुलाबी पेरूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि साखर कमी असते. तसेच स्टार्च कमी आणि व्हिटॅमिन सी जास्त असते. या पेरूमध्ये बिया कमी असतात किंवा ते बिया नसलेलेदेखील असू शकते. दुसरीकडे पांढऱ्या पेरूमध्ये साखर, स्टार्च, व्हिटॅमिन सी व बिया जास्त असतात. पांढऱ्या मांसाच्या पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात; परंतु लाल मांसाच्या जातीमध्ये ते अधिक जास्त प्रमाणात असतात. तज्ज्ञांनी सांगितले की, गुलाबी पेरूमध्ये कॅरोटीनॉइड नावाचे नैसर्गिक सेंद्रिय रंगद्रव्य असते, जे त्याला एक विशिष्ट गुलाबी रंग देते. दुसरीकडे, पांढऱ्या पेरूमध्ये त्याच्या मांसाला रंग देण्यासाठी पुरेसे कॅरोटीनॉइड नसते. तज्ज्ञांनी सांगितले की, पांढऱ्या आणि गुलाबी पेरूची चवही थोडी वेगवेगळी असते.
पांढऱ्या आणि गुलाबी पेरूंपैकी कोणता चांगला?
पोषणतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षिका डॉ. अर्चना बत्रा म्हणाल्या की गुलाबी पेरूला अनेकदा ‘सुपर फ्रूट’ म्हटले जाते. कारण- त्यात जीवनसत्त्वे अ व क, तसेच ओमेगा-३ व ओमेगा-६ पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आणि आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यात भरपूर प्रमाणात असणारे फायबर असते आणि ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.दोन्ही प्रकारचे पेरू खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते आणि शरीर निरोगी राहते.