काळानुसार माणसाची प्रगती होत गेली आणि त्याच्या आवडीनिवडीच्या संकल्पना बदलत गेल्या. १९ व्या शतकामध्ये माणसाने विशेष प्रगती करत असतानाच काही पाश्चात्य पद्धतींचा स्वीकार केला. विचाराबरोबर खाद्यपदार्थांची देवाणघेवाण सुरु झाली. यातूनच जिभेचे चोचले पुरवायच्या नादात भारतीय तरुणाईला पास्ता या पाश्चात्य पदार्थाची ओळख झाली. सध्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर पास्ता या पाश्चात्य पदार्थाचं क्रेझ आहे. तर भारतीय संस्कृतीमध्येही भाताला विशेष महत्व असून प्रत्येक भारतीयांच्या ताटामध्ये भाताला आग्रस्थान देण्यात आले आहे. मात्र हा पास्ता आणि भात काही प्रमाणात स्त्रियांसाठी घातक ठरत असल्याचं दिसून येत आहे. लंडनमधील ‘अॅपिडेमिलॉजी अॅण्ड कम्युनिटी हेल्थ’ या मासिकात याचा खुलासा करण्यात आला आहे.

भारतीयांच्या स्वयंपाकघरात मानाचं स्थान घेणारा भात आणि पाश्चात्य संस्कृतीमधील पास्ता हे दोन्ही पदार्थ महिलांसाठी घातक आहेत. भात आणि पास्ता यांचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्यास रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉज लवकर येण्याची शक्यता असते. हा मेनोपॉज काही वेळी दीड वर्ष आधी देखील येऊ शकतो. तर मासे, ताजी फळे,मटार यासारख्या पदार्थांचे सेवन केल्यास मेनोपॉजचा कालावधी लांबण्याची शक्यता अधिक असते. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये खाण्याच्या पद्धती आणि मेनोपॉज यांच्यातील संबंध या विषयावर संशोधन करण्यात आले. यासाठी ब्रिटनमधील १४ हजार १५० महिलांच्या खाण्याच्या सवयींचे निरीक्षण करण्यात आले.

महिलांच्या आहारात येणारी पोषकद्रव्ये, महिलांची खाद्य संस्कृती आणि नैसर्गिक मेनोपॉजचा कालावधी यांचा परस्परातील संबंध तपासण्यासाठी पहिल्यांदाच असे संशोधन केल्याचे याश्वी डननेराम यांनी सांगितले. या संशोधनादरम्यान ९०० महिलांना नैसर्गिकरित्या मेनोपॉज आला. मात्र, ज्या महिलांनी माश्यांचे सेवन जास्त प्रमाणात केले अशा महिलांच्या मेनोपॉजचा कालावधी तीन वर्ष लांबणीवर गेला. तर ज्या महिलांनी पास्ता किंवा भाताचे सेवन अधिक प्रमाणात केले अशा महिलांना वेळेपूर्वीच म्हणजे दीड वर्षापूर्वीच मेनोपॉज आला.

दरम्यान, मेनोपॉजचा वेळेपूर्वी आल्याने त्याचा गंभीर परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होऊ शकतात, असे युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सचे प्राध्यापक जानेट केड यांनी सांगितले. वेळेपूर्वी मेनोपॉज आल्यामुळे स्त्रियांना ऑस्टियोपरोसिस होणे किंवा हृदयविकार होण्याची शक्यता असते. तर मेनोपॉज उशीराने झाल्यास स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांनी भात किंवा पास्ता यासारख्या पदार्थांचे सेवन अतिसेवन टाळावे तसेच स्वत:च्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.