शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा प्रवासाला आपण कुठेही गेलो तरी आपल्यासोबत पाण्याची बाटली असतेच. आरोग्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे गरजेचे असल्यामुळे प्रत्येक जण आपली बाटली सोबत बाळगतो. काही लोक स्टीलची बाटली वापरतात, काही कॉपरची बाटली वापरतात, तर अनेक जण प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करतात, काही दिवसांनी या बाटल्यांमधून विचित्र वास येऊ लागतो. अनेक वेळा साबणानं धुतल्यानंतरही तो वास जात नाही, ज्यामुळे पाणी पिणे टाळावेसे वाटते. अशा प्रकारचा वास पाण्याच्या चवीवर तर परिणाम करतोच; पण त्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. घाणेरड्या किंवा वास येणाऱ्या बाटलीतून पाणी प्याल्यास जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी बाटली योग्य प्रकारे स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे.
साध्या पाण्याने किंवा फक्त साबणाने धुतल्याने वास कायमस्वरूपी जात नाही. त्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर करून आपण बाटली अगदी चमकदार आणि स्वच्छ ठेवू शकतो. लिंबू, बेकिंग सोडा, मीठ किंवा कडुलिंब यांसारख्या घरातील सहज मिळणाऱ्या गोष्टींच्या मदतीने बाटलीतील दुर्गंधी आपण पटकन दूर करतो. या उपायांसाठी जास्त खर्च किंवा मेहनतही लागत नाही. फक्त थोडा वेळ आणि योग्य पद्धत वापरली, तर बाटली स्वच्छ आणि वासरहित होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया, बाटलीतील वास कसा घालवायचा आणि ती नेहमी स्वच्छ कशी ठेवायची.
१. लिंबू आणि बेकिंग सोडा
बाटली स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा हा सर्वांत सोपा आणि परिणाम देणारा उपाय आहे. हे दोन्ही क्लिनिंग एजंट मानले जातात. बेकिंग सोड्यामुळे दुर्गंधी शोषली जाते; तर लिंबूमुळे ती जागा सुगंध घेतो. त्यासाठी सर्वांत आधी बाटलीत एक चमचा बेकिंग सोडा टाका. मग त्यावर काही थेंब लिंबाचा रस पिळा. पाहा लगेचच फेस येऊ लागतो. आता या मिश्रणात कोमट पाणी टाकून, बाटली नीट झाका आणि काही वेळ हलवून घ्या. हे मिश्रण बाटलीला आतून सगळीकडे लागले पाहिजे. त्यानंतर ती बाटली १५ ते २० मिनिटे तशीच ठेवा. यादरम्यान बेकिंग सोडा आणि लिंबू यांची प्रतिक्रिया बाटलीतील जीवाणू, डाग आणि वास दूर करण्याचे काम करते. नंतर बाटली कोमट पाण्याने नीट धुऊन टाका. ती बाटली शेवटी थंड पाण्याने एकदा स्वच्छ धुऊन घ्या. अशा प्रकारे बाटली स्वच्छ केल्यानंतर त्यातील कोणताही वास पूर्णपणे दूर होईल. हा उपाय आठवड्यातून किमान एकदा केल्यास बाटली नेहमी ताजी आणि स्वच्छ राहील.
२. मीठ आणि लिंबूचा वापर
मीठ आणि लिंबू हा उत्तम पर्याय आहे. मीठ हा नैसर्गिक स्क्रबर मानला जातो; तर लिंबूमुळे जंतुनाशक गुण मिळतात. त्यासाठी बाटलीच्या आत थोडे मीठ टाका. त्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळून द्या. आता एखाद्या छोट्या ब्रशने किंवा जुन्या टूथब्रशने बाटलीच्या आत चांगल्या प्रकारे घासून घ्या. ज्या ठिकाणी डाग, तिथे विशेष लक्ष द्या. लिंबामुळे फेस तयार होतो आणि तो फेस डाग व वास बाहेर काढण्यास मदत करतो.बाटली ब्रशद्वारे नीट स्वच्छ केल्यानंतर हे मिश्रण काही मिनिटे बाटलीत तसेच राहू द्या. नंतर बाटली स्वच्छ पाण्याने धुऊन काढा. हवे असल्यास ती शेवटी कोमट पाण्याने एकदा धुऊन घ्या. त्यामुळे बाटली केवळ स्वच्छच होणार नाही, तर तिच्यात काही वेळ ताजातवाना सुगंधही टिकून राहील. हा उपाय स्टीलच्या बाटल्यांसाठी आणि जिथे खूप जिद्दी डाग असतात, तिथे उपयुक्त ठरतो. प्लास्टिकच्या बाटलीसाठीही तो वापरता येतो; पण त्यात मिश्रण जास्त वेळ ठेवू नका. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास वास कायमचा दूर राहतो.
३. लिंबू आणि कडुलिंबाच्या पाण्याने स्वच्छता
लिंबू आणि कडुलिंबाच्या पाण्याचा वापर हा अजून एक चांगला उपाय आहे. कडुलिंबामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात; तर लिंबू पाण्याला ताजेपणा आणि सुगंध देतो. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्या पाण्यात कडुलिंबाची काही पाने आणि लिंबूचे काही तुकडे टाका. हे पाणी साधारण १० मिनिटे उकळा. जेणेकरून त्यातील गुणधर्म त्यातील पाण्यात मिसळले जातील.आणि उकळून झाल्यानंतर हे पाणी कोमट असताना बाटलीत टाका. बाटली नीट झाकून ठेवा आणि १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या.
या प्रक्रियेमुळे बाटलीतील दुर्गंधीसह जंतूही सहजपणे निघून जातील. दिलेल्या वेळेनंतर बाटली रिकामी करून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. शेवटी ती थंड पाण्याने एकदा धुऊन ठेवा.