Why Does Left Arm Hurt Heart Attack: जेव्हा आपण ‘हृदयविकाराचा झटका’ ऐकतो, तेव्हा मनात सर्वांत आधी येतं ते म्हणजे छातीत होणारी तीव्र वेदना. पण अनेक वेळा हृदयविकाराचा झटका येताना वेदना डाव्या हातात, खांद्यात किंवा जबड्यात जाणवते. काहींना तो फक्त झिणझिणेपणा, जडपणा किंवा हलकं दुखणं वाटतं; पण हाच एक सर्वांत महत्त्वाचा इशारा असतो, जो तुमचे प्राण वाचवू शकतो.

अलीकडील संशोधनांनुसार, हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांपैकी जवळपास ४० टक्के लोकांनी डाव्या हातात वेदना जाणवली असल्याचं समोर आलं आहे. ‘BMC Cardiovascular Disorders’ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार, ४१% रुग्णांना डाव्या हातात, तर ४७% रुग्णांना डाव्या खांद्यात वेदना होती. हा केवळ योगायोग नाही, तर शरीरातील नसांच्या गुंतागुंतीशी संबंधित एक जैविक कारण आहे.

हृदयविकाराचा झटका आणि डावा हात दोघांमधील अदृश्य संबंध

जेव्हा हृदयाला ऑक्सिजन मिळणं थांबतं, तेव्हा हृदयातील स्नायू मदतीसाठी स्नायूंच्या माध्यमातून सिग्नल पाठवतात. हे सिग्नल्स छातीतील आणि डाव्या हातातील नसांमधून एकाच मार्गाने मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मेंदूला ‘वेदना हृदयात आहे की हातात’ हे ओळखता येत नाही. त्यालाच वैद्यकीय भाषेत ‘Referred Pain’, असे म्हणतात. म्हणजेच वेदना एका अवयवात होते; पण जाणवते दुसऱ्या ठिकाणी. हृदय आणि डावा हात हे दोघेही T1 ते T4 स्पायनल नर्व्ह रूट्सशी जोडलेले असल्याने हा गोंधळ निर्माण होतो आणि हाच गोंधळ तुम्हाला वेळेआधी धोक्याची जाणीव करून देतो.

डाव्या बाजूलाच वेदना का जास्त जाणवते?

हृदय हे शरीराच्या डाव्या बाजूला थोडं झुकलेलं असतं. त्यामुळे रक्तपुरवठा थांबला की, त्यामुळे सर्वाधिक ताण डावा खांदा आणि डाव्या हातात जाणवतो. विशेषतः Left Anterior Descending (LAD) Artery बंद झाल्यास वेदना तीव्र होते. हीच ती धमनी, जी डॉक्टर ‘Widowmaker’ म्हणून ओळखतात. कारण- ती पूर्णपणे बंद झाली, तर रुग्णाला वाचवणं कठीण होतं.

कधी घ्यावी डाव्या हाताच्या वेदनेची गंभीर दखल

सर्वच बाबतीत हातदुखी हृदयाशी संबंधित नसते; पण जर जडपणा, दाबल्यासारखे किंवा जळजळ यांसारखं काही वाटत असेल आणि त्यासोबत छातीत दडपण, श्वास घेण्यास त्रास, गरगरणं किंवा घाम येणं अशी लक्षणं असतील, तर ती गंभीर बाब आहे. मग अशा वेळी तत्काळ डॉक्टरांकडे धाव घ्या, कारण- काही लोकांना या बाबतीत छातीत अजिबात वेदना होत नाहीत; फक्त डाव्या हातात दुखणं हेच एकमेव लक्षण असतं.

शरीराच्या ‘Silent Alarm’कडे दुर्लक्ष केल्यास ते घातक ठरू शकते

जेव्हा हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा शरीर आधीच ‘धोका जवळ आलाय’, असा इशारा देतं. वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, लक्षणं दिसल्यापासून पहिल्या एका तासात रुग्णाला रुग्णालयात पोहोचवल्यास जगण्याची शक्यता सर्वाधिक असते. कारण- clot-busting औषधे किंवा angioplasty यांमुळे रक्तप्रवाह लवकर पूर्ववत करता येतो.

निष्कर्ष

डाव्या हातातील वेदना ही फक्त एक साधी दुखणी नाही, ती तुमचं हृदय SOS पाठवतंय याची खूण आहे. म्हणूनच जर कधीही डाव्या हातात अनाकलनीय जडपणा, झिणझिण्या किंवा वेदना जाणवली, विशेषतः छातीत दडपण किंवा श्वास घेण्यास त्रास होत असला, तर क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कधी कधी, तुमचं हृदय काही बोलत नाही… पण तुमचा डावा हात मात्र ‘धोक्याची घंटा’ वाजवतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण- हा इशारा तुमचं आयुष्य वाचवू शकतो.