Kidney Cancer: २०५० पर्यंत किडनी कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा कॅन्सर होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने लठ्ठपणा, धूम्रपान, व्यायामाचा अभाव, मधुमेह व उच्च रक्तदाब या समस्या असणाऱ्यांचा समावेश असू शकतो. फॉक्स चेस कॅन्सर सेंटरमधील संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात किडनीच्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष युरोपियन युरोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधकांना असे आढळून आले की, पुढील २५ वर्षांत जगभरात किडनीच्या कॅन्सरचे प्रमाण दुप्पट होईल.

२०५० पर्यंत किडनीच्या कॅन्सरमध्ये झपाट्याने वाढ

२०२२ मध्ये जगभरात सुमारे ४,३५,००० नवीन किडनीच्या कॅन्सरचे रुग्ण आणि १,५६,००० मृत्यू नोंदवले गेले. संशोधकांनी सांगितले की, जर सध्याचा ट्रेंड असाच राहिला, तर २०५० पर्यंत ही संख्या दुप्पट होऊ शकते. “किडनीचा कॅन्सर ही एक वाढती जागतिक आरोग्य समस्या आहे आणि या वाढत्या वाढीसाठी चिकित्सक व धोरणकर्त्यांनी तयारी करणं आवश्यक आहे. हा आढावा या क्षेत्रासाठी एक संदर्भ बिंदू आहे, जो किडनीच्या कॅन्सरच्या घटना, जगण्याची शक्यता, आनुवंशिकता आणि जोखीम घटकांबद्दल आपल्याला जी माहिती आहे, त्याचा सारांश देतो,” असे वरिष्ठ लेखक अलेक्झांडर कुटिकोव्ह (एमडी, एफएसीएस, फॉक्स चेस कॅन्सर सेंटर येथील मूत्रविज्ञान विभागाचे अध्यक्ष) यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

संशोधकांना या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांच्या जगण्याच्या बाबतीत असमानता आढळली, पाच वर्षांचा जगण्याचा दर ४०% ते ७५% पर्यंत बदलतो, त्यांनी असेही नमूद केले की सुमारे ५% ते ८% किडनीचे कॅन्सर आनुवंशिक असतात. जगभरातील किडनी कॅन्सरच्या अर्ध्याहून अधिक प्रकरणे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, दीर्घकालीन मूत्रपिंड रोग, धूम्रपान, पर्यावरणीय संपर्क व शारीरिक व्यायामाचा अभाव यांसारख्या घटकांमुळे होतात. संशोधकांनी यावर भर दिला की, वजन नियंत्रण, रक्तदाब, रक्तातील साखरेचे व्यवस्थापन व धूम्रपान सोडणे यांसारख्या जीवनशैलीतील बदलांमुळे धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो आणि कॅन्सर रोखता येतो.

वृद्धांमध्ये जास्त धोका

६५ ते ७४ वयोगटातील लोकांमध्ये किडनी कॅन्सर सर्वांत सामान्य आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना हा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. मुलांमध्ये हा कॅन्सर कमी प्रमाणात आढळतो. किडनी कॅन्सरची लक्षणे लवकर ओळखणे हे उपचार पर्याय आणि परिणाम सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बरेच लोक किडनी कॅन्सरच्या धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे निदान उशिरा होते आणि उपचार पर्याय मर्यादित होतात, ज्यामुळे परिणामांवर नकारात्मक परिणाम होतो. किडनी कॅन्सरच्या पाच लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करू नका.

  • सतत थकवा जाणवणे
  • भूक कमी लागणे
  • पाठ किंवा मानेत सूज किंवा गाठ
  • लघवी करताना रक्त येणे
  • वजन झपाट्याने कमी होणे