Banana in Winter Good or Bad: थंडी सुरू झाली की शरीराला उबदार अन्नाची गरज वाढते. पण, या गारव्यात एक प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसतो, “हिवाळ्यात केळं खावं का टाळावं?” सुपरफूड म्हटलं की सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते केळं. वर्षभर मिळणारं, सहज पचणारं आणि ऊर्जा देणारं हे फळ शरीराला मजबुती देतं. पण, थंडीमध्ये याच केळ्यानं फायदा होतो की त्रास वाढतो, यावर तज्ज्ञांची मते जाणून घेणं आवश्यक आहे.

केळं पचनास हलकं मानलं जातं, ऊर्जा वाढवतं, शरीरातील स्नायूंना पोषण देतं. परंतु, आयुर्वेदानुसार काही लोकांनी केळं टाळावं, विशेषतः पित्त प्रकृतीचे लोक, ज्यांना लवकर चिडचिड, अंगात उष्णता, छातीत जळजळ जाणवते. याशिवाय ज्यांना सर्दी-फ्लू किंवा कफप्रवृत्ती जास्त असेल, त्यांनीही केळं खाण्याबाबत सावध राहावं. पण प्रश्न अजूनही तसाच, हिवाळ्यात केळं खाणं फायदेशीर की हानिकारक?

केळं-कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन्सची अप्रतिम खाण. ‘Healthline’च्या माहितीनुसार केळं हे अत्यंत पौष्टिक फळ आहे. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B समूह, पोटॅशिय, मॅग्नेशियम हे घटक हृदयापासून पचनसंस्थेपर्यंत संपूर्ण आरोग्य व्यवस्थित ठेवतात.

हिवाळ्यात अनेकांना हाडांमध्ये दुखणे, सांधेदुखी, स्नायूंमध्ये ताण जाणवतो. अशावेळी केळ्यातील कॅल्शियम, मॅंगनीज, आयर्न, फोलेट, राइबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन B6 शरीराला आतून बळ देतात. हाडांची झीज रोखण्यासाठी केळं महत्त्वपूर्ण ठरतं, असे तज्ज्ञ सांगतात. फायबरने समृद्ध केळं – बद्धकोष्ठतेवर रामबाण! केळ्यात घुलनशील आणि अघुलनशील असे दोन्ही प्रकारचे रेशे (फायबर) भरपूर असतात रेशांमुळे पचनसंस्था सक्रिय होते, पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, बद्धकोष्ठता नैसर्गिकरित्या कमी होते, वजन नियंत्रणात राहते. परंतु, आयुर्वेद येथे एक महत्त्वाचा नियम सांगतो, रात्री केळं टाळा. कारण रात्री केळं खाल्ल्यास कफ वाढतो, खोकला आणि सर्दी वाढू शकते, पचन मंदावते, आळस आणि जडपणा येतो, म्हणूनच दिवसा केळं – औषध; रात्री केळं – त्रास हे समीकरण लक्षात ठेवा.

हृदयासाठी सर्वोत्तम – पोटॅशियमने समृद्ध केळं

केळ्यातील पोटॅशियम

रक्तदाब नियंत्रित ठेवतो

हृदयाची गती संतुलित ठेवतो

मेंदूला सतर्क ठेवतो

ब्रिटनमधील “लीड्स युनिव्हर्सिटी”च्या अभ्यासात सिद्ध झाले आहे की, फायबरयुक्त अन्नामुळे हृदयरोग आणि कोरोनरी आजारांचा धोका कमी होतो. केळं यात मोठी भूमिका बजावते. थंडीच्या रात्रींना केळं खायचं का? तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर: “नाही!” थंडीमध्ये आपलं शरीर कफ वाढवणारं अन्न पटकन प्रतिक्रिया दाखवतं. तज्ज्ञ सांगतात, रात्री केळं खाल्ल्यास कफ वाढतो, घशात खवखव, बंद नाक, श्वसनचा त्रास होऊ शकतो, छातीत जळजळ किंवा पचन बिघडू शकतं, कफामुळे झोपेत त्रास संभवतो, म्हणून जर सर्दी, खोकला किंवा श्वसन समस्या असेल तर रात्री केळं अजिबात खाऊ नका.

दिवसा खाल्ल्यास केळं अत्यंत फायदेशीर; पण रात्री तेवढंच त्रासदायक होऊ शकतं.

निष्कर्ष – केळं चांगलं की वाईट? उत्तर वेळ ठरवते!

दिवसा खा, ऊर्जा, पचन, हृदय, हाडांसाठी लाभ

रात्री खाणं टाळा. कफ, सर्दी, सुस्तीपासून बचाव

पित्त प्रकृतीच्या लोकांनी सावधगिरी बाळगा

सर्दी-खोकला असेल तर केळं टाळा

हिवाळ्यात केळं नक्की खाऊ शकता पण योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत महत्त्वाची!