Copper-Brass Utensils Cleaning: आपल्याकडे अनेक घरांमध्ये सणावाराला आवर्जून घरातील तांब्या-पितळेची भांडी घासून स्वच्छ केली जातात. पण, तांब्या-पितळेची भांडी साफ करायला खूप वेळ लागतो. त्याशिवाय हे काम खूप कंटाळवाणे आहे. तुम्हीही या समस्येतून जात असाल, तर आता ही भांडी सहज स्वच्छ करण्याचा सोपा उपाय जाणून घ्या. लोक तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी बाजारातील रासायनिक उत्पादने वापरतात; परंतु कधी कधी त्यांच्या वापरामुळे भांडीदेखील खराब होतात. जर तुमच्या घरात तांब्या-पितळेची भांडी असतील, तर तुम्ही ती सहजपणे स्वच्छ करू शकता. या लेखात काही सोप्या टिप्स दिल्या आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही ही भांडी सहजतेने स्वच्छ करू शकता.
लिंबू आणि मिठाने स्वच्छ करा
काळी पडलेली तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठ यांचा वापरू शकता. या भांड्यांवरील डाग काढून टाकण्यासाठी या दोन्हींचे मिश्रण खूप प्रभावी आहे. ते वापरण्यासाठी सर्वप्रथम एक लिंबू कापून घ्या. आता त्यावर मीठ टाका आणि तांब्याच्या भांड्यांवर त्या लिंबूच्या तुकड्याने घासून घ्या. त्यामुळे काही मिनिटांत तांब्या-पितळेच्या भांड्यांवरील काळे डाग हळूहळू निघून जातील.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
भांडी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण खूप प्रभावी आहे. त्यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिसळून पेस्ट बनवा. मग ती पेस्ट भांड्यांवर लावा आणि हलक्या हाताने घासून घ्या. त्यानंतर भांडी स्वच्छ पाण्याने धुऊन सुकवा. अशा प्रकारे भांड्यांची चमक परत येईल.
चिंचेच्या मदतीने स्वच्छ करा
चिंचेचा वापर भांडी स्वच्छ करण्यासाठीही केला जातो. खरे तर त्यात नैसर्गिक आम्ले असतात, जी भांड्यांवरची घाण काढून टाकण्यास मदत करतात. त्यासाठी प्रथम चिंच काही वेळ पाण्यात भिजवा. आता ती तांब्याच्या भांड्यांवर लावून, ब्रशच्या मदतीने घासून घ्या. या उपायाने जुने डागदेखील सहज निघून जातील.