World Mental Health Day 2025: आपल्या मानसिक स्थितीवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो, मात्र अनेकदा पोषणाकडे दुर्लक्ष झाल्याने मानसिक आरोग्यावरही त्याचा प्रभाव पडतो. आपण जे अन्न खातो ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असेल तर आपला मूड, विचारही सकारात्मक राहतात.

मानसिक आरोग्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात हे दहा पदार्थ समाविष्ट करा. त्यामुळे तुम्हाला पोषक तत्वे मिळतील, मूड चांगला होईल आणि मानसिक आरोग्य सुधारेल.

घरी तयार केलेलं दही

दही हे पोटासाठी उत्तम आहे. आतड्यांचे चांगले आरोग्य मेंदूच्या कार्याला चालना देते. दररोज अर्धा ते एक कप घरी तयार केलेलं दही खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. त्यात चिमूटभर भाजलेले जिरे आणि काळी मिरी पावडर टाकल्याने ते अधिक चवदार बनते आणि पचनही सुधारते.

ओट्स आणि धान्ये

ओट्समध्ये विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते. बीटा ग्लुकन हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. चांगला मूड आणि सतत ऊर्जा राखण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी स्थिर असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या जेवणात ओट्स सहजपणे वापरू शकता. ओट्स उपमा, ओव्हरनाइट ओट्स किंवा ओटमील याचा वापर करा. लाल तांदूळ आणि क्विनोआ यासारखे धान्य देखील फायदेशीर ठरते.

केळी

केळी हे पैष्टिक, जलद ऊर्जा स्त्रोत आणि व्हिटॅमिन बी ६ चा उत्तम स्त्रोत आहे. हे व्हिटॅमिन सेरोटोनिन तयार करण्यास मदत करते. एक न्यूरोट्रान्समीटर जो आनंदाच्या विचार, भावनांना हातभार लावतो. तुमची ऊर्जा स्थिर ठेवण्यासाठी आणि चांगला मूड राखण्यासाठी मूठभर काजूसह एक लहान केळं खा.

प्रथिने

मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर बनवण्यासाठी प्रथिने महत्त्वाची असतात. सेरोटोनिन आणि डोपामाइन तयार करण्यासाठी आवश्यक असलेले अमिनो आम्ल मसूर, हरभरा आणि अंकुरलेले पदार्थ यामध्ये मिळते.

अक्रोड आणि बदाम

काजू तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. अक्रोड फायदेशीर आहेत कारण त्यात वनस्पती आधारित ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, ते जळजळ कमी करण्यास मदत करतात. बदामदेखील मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. त्यात मॅग्नेशियम असते. रोज बदाम खाल्ल्याने मूड चांगला राहतो.

अंबाडी आणि भोपळ्याच्या बिया

तुमच्या आहारात फक्त एक चमचा जवस किंवा भोपळ्याच्या बियांचा समावेश आवर्जून करा. जवस हे ओमेगा ३चा उत्तम स्त्रोत आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि झिंकचे प्रमाण जास्त असते.

पालेभाज्या

पालेभाज्यांमधील काही घटक मज्जासंस्थेला शांत ठेवण्यास मदत करतात. तुमचे पोषण वाढवण्यासाठी आणि तुमच्या मानसिक आरोग्याला आधार देण्यासाठी पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत.

आहार रंगीबेरंगी हवा

तुमच्या ताटातील आहारात रंगीबेरंगी पदार्थ असायला हवेत. बेरी, लिंबूवर्गीय फळे, आवळा, बीट, टोमॅटो असे. रंगीबेरंगी भाज्या आणि फळआंमध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते, ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते.

व्हिटॅमिन डी आणि बी १२

हे दोन्ही व्हिटॅमिन तुमच्या ऊर्जेवर, मन:स्थितीवर आणि विचारांवर खूप परिणाम करतात. व्हिटॅमिन डीसाठी तुम्ही सकाळच्या सूर्यप्रकाशात जाणं महत्त्वाचं आहे. तर बी १२ साठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्सही घेऊ शकता.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट तुम्ही आवडीने खाल्लेच असेल. यामध्ये कोको पॉलीफेनॉल आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन तुमचा मूड सुधारू शकते. मात्र १५ ते २० ग्रॅम एवढेच सेवन करा. त्यामुळे रात्री साखरेची सवय लागणार नाही.

संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरते.