Why Are Strokes Skyrocketing Among Young Adults: कधी काळी फक्त वृद्धांच्या आजारांमध्ये गणला जाणारा ‘स्ट्रोक’ (मेंदूला येणारा झटका) आता तरुणांनाही वेगाने जखडत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, आज २० ते ४० वर्षांच्या तरुणांमध्येही स्ट्रोकचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२० ते २०२२ या दोन वर्षांत १८ ते ४४ वयोगटातील तरुणांमध्ये स्ट्रोकच्या घटना तब्बल १४.६% ने वाढल्या आहेत. हे आकडे पाहून जगभरातील न्युरोलॉजिस्ट हादरले आहेत, कारण आता रुग्ण तरुण असतात, आणि त्यांच्या मेंदूला असा झटका येणं हे अतिशय चिंताजनक दृश्य आहे.

डॉक्टरांचाही विश्वास बसत नाही!

एंडेव्हर हेल्थ न्युरोसायन्सेस इन्स्टिट्यूटचे प्रमुख न्युरोविशेषज्ञ डॉ. मोहम्मद अनदानी यांनी ‘न्यूयॉर्क पोस्ट’शी बोलताना सांगितलं, “आम्ही इतके तरुण रुग्ण कधीच पाहिले नव्हते. वयाच्या २०व्या वर्षी स्ट्रोक होईल असं कोणीच विचार करत नाही. या रुग्णांचं उपचार करताना आम्हालाही मानसिक ताण येतो, कारण ते वयाने खूपच तरुण असतात.”

निरोगी, तरुण… आणि तरीही स्ट्रोक!

डॉ. अनदानी यांनी नुकतंच २३ आणि २४ वर्षांच्या दोन तरुणींवर उपचार केले, ज्यांना पूर्ण निरोगी असतानाही स्ट्रोक आला. या दोघीही गर्भनिरोधक गोळ्या (oral contraceptives) घेत होत्या ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या बनून स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यापैकी एका मुलीला पेटंट फोरेमन ओव्हले (PFO) नावाचा जन्मजात हृदयविकार होता. हृदयात असलेलं एक छोटं छिद्र ज्यातून रक्तातील गुठळी थेट मेंदूपर्यंत जाऊ शकते.

तरुणांमध्ये स्ट्रोक का वाढतोय?

डॉ. अनदानी यांच्या मते, या वाढीमागे अनेक कारणांचा एकत्रित प्रभाव आहे. “हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्राॅल, आणि लठ्ठपणा या पारंपरिक कारणांसोबतच आजच्या पिढीची जीवनशैलीसुद्धा मोठं कारण आहे ताण, झोपेचा अभाव, लांब कामाचे तास, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार,” असं ते सांगतात.

एका रुग्ण तरुणीबद्दल त्यांनी सांगितलं, ती दररोज २०० मिग्रॅ कॅफिन असलेले एनर्जी ड्रिंक्स घेत होती (जे दिवसाच्या अर्ध्या प्रमाणाइतकं आहे!). अभ्यास सांगतात की असे पेय ब्लड प्रेशर वाढवतात, हृदयाच्या ठोक्यांमध्ये असंतुलन आणतात, आणि त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

एनर्जी ड्रिंक्स अ‍ॅडरॉल धोकादायक कॉम्बिनेशन

कार्डिओलॉजिस्ट डॉ. इव्हन लेविन यांच्या मते, एनर्जी ड्रिंक्स हे हृदयासाठी सर्वात घातक पेय आहेत. त्यांनी हेही सांगितलं की आज अनेक तरुण ऑनलाईन टेलिहेल्थ सेवांद्वारे सहजपणे ‘अ‍ॅडरॉल’ सारखी उत्तेजक औषधं घेतात.

“२० ते ४० वयोगटातील औषध घेणारे तरुण इतरांच्या तुलनेत ५७% अधिक हृदयरोगाच्या धोक्याखाली असतात,” असं डॉ. लेविन सांगतात.

डॉ. अनदानी मात्र सांगतात, “अ‍ॅडरॉल आणि एनर्जी ड्रिंक्सचा परिणाम काही अभ्यासांत दिसतो; काहींमध्ये नाही. पण, मुख्य कारणं अजूनही तीच लठ्ठपणा, ताण आणि असंतुलित जीवनशैली.”

तरुण पिढीसाठी इशारा!

स्ट्रोक आता फक्त वृद्धांचा आजार राहिलेला नाही. तो कोणत्याही वयात होऊ शकतो आणि तरुणांमध्ये त्याचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. तज्ज्ञ सांगतात “सतत ताण, चुकीचा आहार, निद्रानाश आणि एनर्जी ड्रिंक्सचा गैरवापर या चार बाबींमुळे स्ट्रोकच्या पाशात ही पिढी अलगदपणे अडकत चालली आहे.”

तेव्हा तरुणांनो, जर वेळीच तुमची जीवनशैली सुधारली नाही, तर स्ट्रोकची पुढची शिकार कदाचित ‘तुम्हीच’ असू शकता!शेवटी प्रश्न एकच की, आपल्या हातात अजून वेळ आहे का? आपल्या अंगातला थकवा, झिणझिण्या, टोचल्यासारखा त्रास किंवा डोकं हलकं होणं ही लक्षणं हलक्यात घेऊ नका. तीच तुमच्या शरीराची ‘स्ट्रोकची’ सावधान करणारी पहिली घंटा असू शकते.