एखाद्या देशातील लोकांचे आरोग्य चांगले असेल तर त्या देशाचे आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणू शकतो. मात्र त्यासाठी देशातील लोकांचे जीवनमान आरोग्यदायी असायला हवे. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनातून जगात सर्वाधिक आरोग्यविषयक समस्या असलेल्या देशाचे नाव जाहीर करण्यात आले. यामध्ये विशिष्ट देशातील लोकांचे मद्यपानाचे प्रमाण, त्यांच्या तंबाखू खाण्याच्या सवयी आणि लठ्ठपणा या निकषांवर भर देण्यात आला आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये १७९ देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. ‘चेक प्रजासत्ताक’ या देशातील लोकांना आरोग्यविषयक समस्या असल्याचे संशोधनातून समोर आल्याचे समजते आहे.
या देशात तंबाखूचे सेवन सर्वाधिक होते असेही या संशोधनातून समोर आले आहे. तर त्याखालोखाल रशिया आणि स्लोव्हेनियामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात आरोग्यदायी देश आहे. याठिकाणी लठ्ठपणाची समस्या असणाऱ्या लोकांची संख्या सर्वात कमी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. याठिकाणी केवळ २.७ टक्के लोकांचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) ३० हून अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी लठ्ठपणाची समस्या असणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी आहे. तर चेक प्रजासत्ताकमधील ४१ टक्के लोकांचा बीएमआय ३० हून जास्त आहे.
याहून आणखी आश्चर्याची बाब म्हणजे अफगाणिस्तानमध्ये वर्षभरात केवळ ८३ सिगारेट ओढल्या जातात असे या संशोधनात म्हटले आहे. तसेच याठिकाणी मद्यपानाचे प्रमाणही अतिशय कमी आहे. जिनिया हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोग्यदायी देश असल्याचेही यामध्ये सांगण्यात आले.