उन्हाळा आला की सर्वांनाच चविष्ट आंबे खाण्याचे वेध लागतात. पण आंबे असो वा कैरी आपण दोन्ही फळे चवीने खातो. ही फळे आपल्या आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहेत. करीपासून आपण अनेक चटण्या, लोणची आणि पन्ह बनवू शकतो. उन्हाळ्यात उष्माघात, डिहायड्रेशन टाळण्यासाठी कैरी पन्ह हे सर्वोत्तम पेय आहे. कैरीमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, फायबर इत्यादी घटक असतात. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात कैरी पन्ह प्यायल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.

उष्माघातापासून बचाव :

कैरीचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे कैरीचे पन्ह बनवून प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात लोकांना उष्माघाताचा सर्वाधिक त्रास होतो, अशा परिस्थितीत जर तुम्ही अर्धा कप कैरीचे पन्ह पिऊन घराबाहेर पडलात तर उष्माघातापासून तुमचा बचाव होईल. उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने शरीरात लोह, सोडियम क्लोराईडची कमतरता निर्माण होते. कैरी पन्ह ही कमतरता दूर करते.

डिहाइड्रेशनपासून बचाव :

जर तुम्हाला खूप घाम येत असेल आणि तुमचे कामही बाहेरचे असेल तर उन्हाळ्यात दररोज कैरीच्या पन्ह्याचे सेवन करा. उन्हाळ्यातील हे आरोग्यदायी पेय शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते. लोहाची कमतरता भरून काढते, आणि शरीर हायड्रेटेड ठेवते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

तुम्हालाही खूप तहान लागते का? असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण

अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध :

कैरीच्या पन्ह्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी१, बी२, सी, कार्बोहायड्रेट्स, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट इत्यादी विविध पोषक घटक असतात. हे सर्व घटक उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवतात.

कॅन्सरचा धोका कमी करते :

आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी अँटिऑक्सिडंट्स तयार करते, जे शरीराला फुफ्फुस, पोट, कोलन, प्रोस्टेट इत्यादी अनेक प्रकारच्या कर्करोगापासून वाचवू शकते. अशा परिस्थितीत कैरी खावी किंवा त्यापासून बनवलेले कैरी पन्ह नक्की प्यावे.

Heat Wave चा सामना करण्यासाठी करा ‘या’ थंडगार सरबतांचे सेवन; गरमीच्या दाहकतेवर ठरेल परिणामकारक

पचनशक्ती सुधारते :

उन्हाळ्यात अनेकदा लोकांची पचनशक्ती बिघडते. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते, त्यामुळे ताजे अन्न न खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कैरी पन्ह्यामध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवते. अन्न लवकर पचण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी आतड्यांसंबंधी समस्या दूर करते.

डोळे निरोगी ठेवते :

कैरी पन्ह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांना मोतीबिंदू, रातांधळेपणा, कोरडे डोळे, डोळे लाल होणे यासारख्या अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करते. कैरी पन्ह मर्यादित प्रमाणात सेवन करावे अन्यथा मधुमेह, वजन वाढणे, उच्च रक्तदाब, जुलाब अशा समस्या उद्भवू शकतात.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)