डॉ. उपेंद्र भालेराव, हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ

दिवसेंदिवस बदलती जीवनशैली, आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे तरुण पिढीतही हृदयविकाराचा धोका वाढला आहे. तंबाखूचा अतिवापर, हृदयविकाराचा कौटुंबिक वारसा आणि नियमित व्यायाम न केल्यामुळे अकाली हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. त्यामुळे वेळीच तरुणांनी सावधान होत आरोग्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…

सध्या तरुण धकाधकीचे जीवन जगत आहेत. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखताना अनेकदा मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. परिणामी तणाव, चिंता आणि नैराश्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. यासह जीवनशैलीतील बदल, व्यसनाधीनता, अपुरी झोप, पोषक आहाराची कमतरता या साऱ्या गोष्टी हृदयविकाराच्या समस्या वाढविण्यास कारणीभूत असतात.

मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण आणि लठ्ठपणा, प्रक्रिया केलेले तेलकट, खारट आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थाचे सेवन हेही हृदयावर परिणाम करू शकते. घरातून कार्यालयाचे काम (वर्क फ्रॉम होम) यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. खूप जास्त काळासाठी एकाच जागी बसून राहणे अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते. यामुळेही हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. तरुण रुग्णांना हा आजार गंभीर स्वरूपात असल्यास अँजिओप्लास्टी किंवा शस्त्रक्रियेची गरज पडते. शरीरात होमोसिस्टिनचे प्रमाण जास्त असलेल्या तरुण रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आढळते.

१) तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका टाळणे शक्य आहे का?

अनेक तरुणांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण यांसारख्या व्याधी असतात. परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करतात. यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याने त्यांना हदयासंबंधी आजारांचा सामना करावा लागतो. छातीत दुखणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, छातीत धडधडणे, दम लागणे आणि सतत घाम येणे यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, तर अनेकदा अपचनाची समस्या असेल असा गैरसमज करून या लक्षणांकडे टाळाटाळ करतात. यामुळे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका येऊ  शकतो तसेच उपचारास विलंब झाल्यास जीव गमवावा लागू शकतो. म्हणूनच प्रत्येकाने नियमित शरीराची तपासणी करणे आवश्यक आहे. यात ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, इको कार्डिओग्राफीचा समावेश असतो. या प्राथमिक चाचण्यांमध्ये दोष आढळून आल्यास अ‍ॅन्जोग्राफी आणि इतर चाचण्या करून घेणे गरजेचे आहे. आपले रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहच्या तपासणी नियमितपणे करा. डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे नियमित हृदय तपासणी करून घ्या. याबाबी वेळेत केल्यास नक्कीच संभाव्य धोका टाळणे शक्य आहे.

२)हृदयविकार होऊ नये म्हणून तणावापासून दूर कसे राहता येईल?

आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपल्याला तणावाचे व्यवस्थापन करावे लागेल. जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर समुपदेशनाचा पर्याय निवडा आणि शांतपणे त्रास सहन करण्याऐवजी उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. आपले कुटुंब आणि मित्रांसह आपल्या समस्यांवर चर्चा करून ताण कमी करा. तुम्हाला आवडणाऱ्या उपक्रमांमध्ये वेळ गुंतवा. वाचन, लेखन, नृत्य करणे, स्वयंपाक करणे, बागकाम, छायाचित्रण करू शकता आणि संगीत ऐकू शकता.

३)हृदयरोग टाळण्यासाठी आहार कसा असावा ?

वजन नियंत्रित करण्यासाठी उपाशी राहणे हा योग्य मार्ग नसून आवश्यक अन्नघटक आहारात समाविष्ट करणे ही योग्य पद्धत आहे. आपण काय आणि किती प्रमाणात खात आहात याकडे लक्ष द्या. दुधाचे पदार्थ पूर्ण बंद करण्याची गरज नाही. कमी चरबी असलेले दूध, दही यांचा वापर करावा. मटन, चरबीयुक्त पदार्थ, अतिरिक्त प्रमाणात तेल आणि तूप यांचे सेवन टाळावे. आपण ताजी फळे, भाज्या, शेंगा, कडधान्ये, तृणधान्याचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा. आहारात तेल, मीठ, साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ, जंकफूड, मसालेदार आणि हवाबंद डब्यातील अन्नाचे सेवन कमी करा. ब्रेड, पास्ता, पिझ्झा, केक, पेस्ट्री, डोनट्स, चिप्स, आणि खारट पदार्थाचे सेवन शक्यतो टाळाच. शर्करायुक्त पदार्थाचे अतिसेवन टाळा. वजन प्रमाणात राखण्याचा प्रयत्न करा.

४)आरोग्य पूरके (सप्लिमेंट), स्टिरॉइड्सचा वापर आणि हृदयविकाराचा झटका यांचा संबंध काय ?

डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हेल्थ सप्लिमेंटचा वापर करू नका. कारण त्यांचे अनेक दुष्परिणाम आहेत, जे तुम्हाला कदाचित माहीतही नसतील. हेल्थ सप्लिमेंटसारखे पदार्थ हे हृदयाची गती अनियमित करतात आणि हृदयावरचा ताण वाढवतात. त्यामुळे अशा कृत्रिम पदार्थाचे सेवन न करणे हेच योग्य. अनेक जण शरीराला सुदृढ आकार देण्यासाठी स्टेरॉइड घेत असतील तर ते चिंतेचे कारण आहे. हृदयरोगाचा प्रारंभ होण्यास स्टेरॉइड कारणीभूत ठरू शकतात. स्टिरॉइड हे हृदय कमकुवत करू शकते आणि रक्तवाहिन्यांमध्ये गुठळय़ा तयार होण्यास कारणीभूत ठरू शकते.

५)हृदयाच्या आरोग्यासाठी व्यायाम कोणता आणि किती प्रमाणात करावा?

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज नियमितपणे पुरेसा व्यायाम करावा. नियमित व्यायाम केल्याने हृदयाचे स्नायू मजबूत होतात, हृदय आणि रक्त वाहिन्यांमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित करता येतो. आपल्याला आवडेल आणि झेपेल असा व्यायाम प्रकार निवडावा. रोज ३० ते ४५ मिनिटे चालणे, पोहणे, सूर्यनमस्कार, योगासने, धावणे, सायकल चालवणे हे हृदयासाठी उत्तम व्यायाम प्रकार आहेत. वेटलिफ्टिंगसारख्या प्रकारात सहभाग घेण्याआधी वैद्यकीय चाचणी करून घेणे फायद्याचे ठरते. अतिरेकी प्रमाणात केलेला कोणताही व्यायाम हा फायद्याचा न ठरता हृदयावरचा ताण वाढवणारा ठरतो.

संतुलित आहार, नियमित आणि पुरेसा व्यायाम, मानसिक तणावावरील नियंत्रण या गोष्टी तरुणाच्या जीवनशैलीचा भाग झाल्या तर हृदयरोग टाळता येऊ  शकतो. हृदयरोग्याची लक्षणे समजून घेऊन तात्काळ चाचण्या आणि उपचार केल्यास अनेक तरुणांचे प्राण वाचू शकतील.