20 February 2019

News Flash

पिंपळपान : ऐरण

पान दोन्ही अंगास गुळगुळीत, फुले हिरवट पांढरी व तुऱ्यांनी येतात.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

‘‘तर्कारी फटुका तिक्ता तिथोष्णाऽ निलपाण्डुनुत।

शोथश्लेष्माग्निमान्द्यामविबन्धांश्च विनाशयेत्॥ (ध. नि.)

ऐरण, अरणी, अग्निमन्थ, गनीकारिका या विविध संस्कृत नावांनी ओळखला जाणारा वृक्ष सर्वत्र आढळतो. मराठीत त्याला ‘नरवेल’ अशी ओळख आहे. नरक्या ही वनस्पती अगदीच भिन्न आहे. काहीजण ऐरण आणि तर्कारी हे एकच आहे, असे समजतात. पण दोन्ही वनस्पती भिन्न आहेत. गुजरातमध्ये मोटी अरणी आणि नानी अरणी अशा दोन प्रकारची ऐरण वनस्पती सांगितली आहे. हे लहान झाळकट झाड असून, त्यास पावसात फुले येतात. याचे खोड आखूड व फांद्या पुष्कळ असून, खाली लोंबतात. साल उदी रंगाची व गुळगुळीत, पाने समोरासमोर, लांब देठयुक्त साधारण हृदयाकृती असून, पुढचे टोक कातरलेले असते. पान दोन्ही अंगास गुळगुळीत, फुले हिरवट पांढरी व तुऱ्यांनी येतात. फळ काळे व वाटाण्याएवढे; झाडास एक प्रकारचा दर्प येतो. रुची आमसर आणि कषाय असते. मूळ आणि पाने औषधात वापरतात. नरवेल कटू, उष्ण, तिक्त, शोथघ्न, वातहर, दीपन, श्लेष्मघ्न, ज्वरघ्न आणि गर्भाशयास अवसादक आहे. हे मूळ दशमुळांत वापरतात.

नरवेल कफ आणि वातप्रधान रोगांत वापरतात. शोथघ्न म्हणून नरवेल गंडमाळा, सूज यांत पोटात देतात व बाहेरून लेप करतात. वातहर म्हणून सर्व प्रकारच्या वातविकारात, आमवात, मज्जातंतू शूळ, दुखणारी मूळव्याध, इ. रोगांत वापरतात. ज्वरघ्न म्हणून साधारण ज्वर, पाळीने येणारा ज्वर व अंगावर फुटणारा ज्वर उदा. मसूरिकामध्ये देतात. श्लेष्मघ्न म्हणून सर्दी व कफरोगात वापरतात. ऐरण अथवा नरवेल दीपन असल्यामुळे अग्निमांद्य, कुपचन व कुपचनापासून उद्भवलेला उदरवायूमध्ये देतात. पुष्कळ दिवस दिल्याने शरीरातील सर्व क्रिया सुधारून पांडू व इक्षुमह नाहीसा होतो. याची गर्भाशयावर विशेष क्रिया होत असते. गर्भाशयाची संकुचित होण्याची क्रिया या औषधाने बंद पडते आणि संकोचन पीडा कमी होते. हे स्त्रीचा गर्भपात बंद करण्यात अत्युत्तम आहे. याबरोबर शीतल व सुगंधी पदार्थ द्यावेत. नरवेलीबरोबर कमळफूल दिल्यास गर्भपात बंद होतो. अत्यार्तव, पीडितआर्तव व बाळंतपणातील वायगोळय़ात उत्तम कार्य करते.

वातकफप्रधान फ्ल्यू ज्वरात ऐरणमुळीची साल व सुंठ व हिरडा चूर्णाबरोबर द्यावी. थंडीताप किंवा मलेशियात याच्या पानांचे चूर्ण मिरीचूर्णाबरोबर द्यावे. गोवर कांजिण्यासारख्या विस्फोटक तापामध्ये ऐरण पानांचा फांट द्यावा. गरज पडल्यास ऐरणमुळाचे चूर्ण, सुंठ, डिकेमाली, कडू जिरे यांच्या चूर्णाचा दाट लेप शोथग्रस्त रुग्णाच्या सुजेवर लावावा. नव्याने बाळंतीण झालेल्या स्त्रीच्या पायांवर काही वेळेस सूज येते, त्यावर ऐरणमुळाच्या सालीच्या चूर्णाचा लेप लावावा. पोटात पाणी होण्याची शक्यता असल्यास ‘झट की पट’ ऐरणसालीच्या काढय़ात जवखार मिसळून द्यावा. पोट होऊन पोटाचा घेर लगेच कमी होतो. सोनपाठा, महारूख, महानिंब अशा नावांनी ओळखणाऱ्या वनस्पतींना काही वेळा ऐरण या नावाने ओळखले जाते.

हरी परशुराम औषधालयाच्या वातगजांकुश या औषधांत ऐरणमुळाचा समावेश आहे.

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on February 13, 2018 1:43 am

Web Title: creek premna coastal premna