आतापर्यंत आपण संप्रेरकांमुळे होणाऱ्या फक्त एका स्थितीचा म्हणजे पीसीओडीचा अगदी व्यवस्थित परामर्श घेतला. पण साधारणपणे २० टक्के स्त्रियांना अधिक रक्तस्राव हा होतोच. त्याची कारणमीमांसा व उपाययोजना विचारात घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी सर्वप्रथम सुरू झाल्यानंतर साधारण १-२ वष्रे ती अनियमित असली तरी वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीसुद्धा अधिक रक्तस्रावाचा त्रास होऊ शकतो. अधिक रक्तस्राव होणे याची व्याख्या नक्की कधी करू शकतो? मासिक पाळी आल्यानंतर ती सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू राहते तर रक्तस्रावाचा स्रोत हा ८० मि.ली.पेक्षा अधिक म्हणजे दर दिवसास ५ ते ६ सॅनिटरी नॅपकिन्स बदलावे लागत असतील तर त्याकडे लक्ष देणे भाग आहे.
वयाच्या कोणत्याही वर्षी अधिक होत असलेल्या रक्तस्रावामागे दोन कारणे असतात. शरीररचनेतील बदल हा आपण नंतर जाणून घेऊ व दुसरे कारण म्हणजे रक्तातील संप्रेरक द्रव्यांचे असंतुलन. हे असंतुलन का होते, त्याचे परिणाम कोणते हे समजून घेणे आवश्यक आहे.
मासिक पाळीतील रक्तस्राव हा इस्ट्रोजेन व प्रोजस्टेरॉन या संप्रेरकांच्या पातळीवर अवलंबून असतो. प्रॉस्टाग्लंडीन या द्रव्याच्या अतिरिक्त स्रावाने गर्भाशयाच्या आतील आवरणाची जाडी वाढते, याशिवाय गर्भाशयातील रक्तनलिकांमध्ये झालेले बदल आणि कमी होत जाणारी पातळी या सर्व गोष्टी रक्तस्राव घडवून आणण्यात महत्त्वाच्या आहेत. एकदा रक्तस्राव सुरू झाला की पुन्हा गर्भाशयाचे आतील आवरण तयार होण्यास सुरुवात होते. यामुळेच जेव्हा अंडकोशातून बीज निर्माण होऊन फुटत नसेल तर तिथे संप्रेरक द्रव्यास अटकाव होतो. यालाच ‘अन्ओव्युलेटरी सायकल’ म्हणतात. यामुळे संप्रेरक द्रव्यांच्या पातळीवर नियंत्रण न राहिल्याने रक्तस्राव सुरूच राहतो. अशी परिस्थिती जशी वयाच्या ८ ते १२ वर्षांपर्यंत निर्माण होऊ शकते तशीच ती वयाच्या ३९ ते ५१ वर्षांकडे होते.
पिटय़ुटरी ग्रंथीचा इतर स्रावांवर नियंत्रण नसणे, पिटय़ुटरीमध्ये गाठी निर्माण झाल्यास, रक्तातील प्रोलॅक्टिन द्रव्य वाढणे, थॉयराईड ग्रंथींची अकार्यक्षमता, पी.सी.ओ.डी., अंडकोशाचे काम वयाच्या ४० वर्षांआधी थांबणे, रक्तातील काही विशेष रक्तघटकांची कमतरता, रक्त न गोठण्याचे काही स्थितीजन्य आजार, इडियोपॅथिक थंब्रोसायटोपेनिक परप्युरा अशी अनेक कारणे अधिक रक्तस्राव झाल्यास अभ्यासणे जरुरीचे आहे. यात गर्भाशयाच्या गाठी व अंडकोशाची गुल्मे विचारात घेतलेली नाहीत. काही वेळेस गर्भ राहिल्यानंतरही तीन-तीन महिने पाळी येत रहाते. अशा वेळेस सोनोग्राफीमुळे रक्तस्रावाचे कारण समजू शकते. वयाच्या २० ते ४५ वर्षांच्या कालावधीत कुटुंबनियोजनाचे साधन म्हणून घेण्यात येणाऱ्या गोळ्यांमधील खंड वा गर्भाशयातील तांबी अकार्यक्षम झाल्यास वा नीट न बसल्यास अधिक रक्तस्राव होऊ शकतो.
रक्तस्रावाची कारणे शोधताना घेण्यात येणारी पूर्वपीठिका, काही साध्या व काही महत्त्वाच्या रक्तचाचण्या, सोनोग्राफी यांचा विचार करावा लागतो. रक्तस्राव कमी होण्यास हल्ली अनेक औषधे उपलब्ध आहेत. काही संप्रेरक असलेली तांबीसुद्धा उपयोगी पडते. स्त्रीरोगतज्ज्ञाकडे जाऊन तपासणी केल्यास काही स्त्रियांना पिशवी साफ करण्याचा म्हणजे डायलेटेशन व क्युरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. यात दोन प्रकारे फायदे असतात. गर्भाशयाच्या आवरणाचा अभ्यास केला जातो व खराब असलेले आवरण काढून टाकल्यास नवीन आवरण येते. त्याने रक्तस्राव अतिशय कमी होतो. काही स्त्रीरोगतज्ज्ञ काही काळ पोटात घेण्याची औषधे व तांबी (संप्रेरकयुक्त) बसवून देतात. काहीजण शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देतात. आवश्यकतेनुसार उपचार करून घ्यावेत. रक्तातील हिमघटकांचे साखरेचे प्रमाण व काही विशेष चाचण्या केल्यानंतरच्या काही स्रावांचे योग्य प्रमाण ठेवल्यास रक्तस्राव आटोक्यात येतो.
एकंदरीत रक्तस्रावाकडे एक गंभीर समस्या म्हणून लक्ष दिले गेलेच पाहिजे. कारणमीमांसेनंतर उपचारही त्वरित करावेत.
डॉ. रश्मी फडणवीस – rashmifadnavis46@gmail.com