News Flash

मुलांमधील अतिचंचलता

‘मला वर्गात शिकवलेलं काही कळत नाही. सगळी मुलं सतत चिडवत असतात.

|| गुंजन कुलकर्णी, बाल व कुटुंब मनोविकास तज्ज्ञ

‘मला वर्गात शिकवलेलं काही कळत नाही. सगळी मुलं सतत चिडवत असतात. खूप राग येतो, मग मी मुलांना मारतो. घरी सगळ्यांना वाटतं की मी खूप शिकावं. आमच्या एकत्र कुटुंबात मी मोठा आहे. सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून. पण मी त्या पूर्ण करू शकत नाही. याचा खूप ताण आहे माझ्यावर.. ’ एवढं बोलून यश (नाव बदलले आहे) रडायला लागला. त्याला होणारा त्रास पाहता त्याच्याकडून प्रश्नावली भरून घेतल्या तेव्हा तो ‘हायपर अ‍ॅक्टिव्हिटी’ने (अतिचंचलता) त्रस्त असल्याचे लक्षात आले. सततच्या प्रयत्नांनी आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने आज त्याच्यातील आत्मविश्वास दुणावला आहे.

अतिचंचलता अवस्था (ए टेन्शन डेफिसिएट हायपरअ‍ॅक्टिव्हीटी डिसऑर्डर – एडीएचडी)

बऱ्याचदा लहान वयात ‘एडीएचडी’ म्हणजे एकाग्रता नसणे, अतिचंचलता आणि अधिरता अशा वर्तनाच्या समस्या लक्षात येऊ शकतात. काही वेळा मुलांच्या आयुष्यात लहान भावंडाच्या जन्मासारख्या काही महत्वाच्या घटना घडल्या किंवा शाळेची सुरुवात असे काही मोठे बदल झाले तर ही लक्षणे जास्त तीव्रतेने समोर येतात. चंचलता आणि अतिचंचलता यामध्ये गल्लत होऊ शकते. यामुळे आपल्या मुलांच्या वर्तनाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शास्त्रीय चाचण्यांच्या आधारे त्याचे निदान करणे आवश्यक आहे. वयानुरूप यात बदल करता येतात. मात्र काही लोकांमध्ये ही लक्षणे प्रौढपणी समस्या निर्माण करू शकतात.

अतिचंचलता अवस्थेची लक्षणे

अतिचंचलता ही अस्वस्थ, एकाग्रता नसणे किंवा अधीरता या दोन प्रकारात विभागली गेली आहे. या दोन्ही प्रकारच्या वर्तन समस्या एकत्र दिसून येतात. अशा प्रकरणात ‘एडीएचडी’ दुर्लक्षित होऊ शकते. कारण त्याची लक्षणे तीव्रतेने समोर येणारी नसतात.

एकाग्रता नसणे

 • एकाग्रतेचा कालावधी खूप कमी असणे व वारंवार लक्ष विचलित होणे.
 • सातत्याने चूका होणे.
 • वेळखाऊ व किचकट गोष्टी करण्यात लक्ष न राहणे.
 • दिलेल्या सूचना पूर्णपणे ऐकण्याचा संयम नसणे.
 • सातत्याने एक कृती अर्धवट ठेवत दुसरी हातात घेणे.

अतिचंचलता व अधीरता

 • विशेषत शांत वातावरणात एका जागी स्थिर न बसता येणे.
 • कायम अस्वस्थ असणे.
 • हातातल्या कृतीवर लक्ष एकाग्र करता न येणे.
 • शरीराची सतत हालचाल करत राहणे.
 • सातत्याने खूप बोलत राहणे.
 • आपल्याला संधी मिळेपर्यंत थांबता न येणे.
 • विचार न करता कृती करून मोकळे होणे.
 • भोवतालच्या धोक्याचा अंदाज न येणे.

काळजीपूर्वक निरीक्षण करून अंदाज घेतल्याशिवाय दुर्लक्षिल्या जाऊ शकणाऱ्या किंवा चुकीचे निदान होऊ शकणाऱ्या या अवस्थेमागे नक्की काय कारणे आहेत, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अतिचंचलता अवस्थेचे एकमेव अचूक कारण आजही पूर्णत समजलेले नाही. परंतु वेगवेगळ्या गोष्टी याला कारणीभूत ठरू शकतात.

बऱ्याच प्रकरणात अतिचंचलता ही पालकांकडून काही गुणसुत्रांद्वारे संक्रमित होते. संशोधनामधून असे समोर आले आहे की अतिचंचलता अवस्था असणाऱ्या लोकांच्या मेंदूची रचना इतर लोकांपेक्षा काही अंशी वेगळी असते. तसेच या लोकांच्या मेंदूच्या वाढीला इतर लोकांच्या मेंदूच्या वाढीपेक्षा जास्त काळ लागतो. काही वेळा ३७ आठवडय़ांच्या आधी झालेला जन्म, जन्मवेळेचे कमी वजन, गर्भावस्थेत वा नवजात अर्भकाच्या मेंदूला झालेली दुखापत, गर्भारपणात आईने केलेले अतिरिक्त मद्यपान, धुम्रपान, शिसे यासारख्या विषारी गोष्टींचा बालवयात आलेला अवाजवी संपर्क यामुळे अतिचंचलता अवस्था निर्माण होऊ शकते. याचे निदान काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या वर्तनाबाबत काही चिंता किंवा शंका असल्यास त्यांनी मनोविकार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. योग्य निदान झाले तर वेळीच उपचार होऊ शकतात. औषधोपचारांबरोबर ‘एडीएचडी’ समस्या शास्त्रीय माहिती, विचार वर्तनोपचार, वेळेचे नियोजन, सुस्पष्ट सीमारेषा व सूचना, सकारात्मकता, प्रोत्साहनात्मक गोष्टी, सविस्तर निरीक्षण, नियमित व्यायाम, सकस आहार आणि शांत झोप यासारख्या सवयींमुळे दूर करता येते. रोजच्या आयुष्यात अतिचंचलता अवस्थेशी जुळवून घेणे शक्य असल्याचे पालकांनी लक्षात घ्यावे.

charu.kulkarni85@gmail.com

(शब्दांकन – चारुशिला कुलकर्णी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:15 am

Web Title: excessive volatility in children
Next Stories
1 वर्तनोपचार
2 मधुमेह : काय खावे?
3 प्रवास आणि अस्थिरोग
Just Now!
X