• व्यायाम का सुरू करायचा, या प्रश्नाला प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर असेल. हे उत्तरच व्यायामाचा उत्साह टिकवण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. ‘मला ‘अ‍ॅक्टिव्ह’ आणि ‘फिट’ राहायचे आहे, आणि त्यासाठी कुठलाही ‘शॉर्ट कट’ नाही,’ हे एकदा डोक्यात पक्कं बसलं की झालं!, मग व्यायामात खंड पडायला नको, हे त्या व्यक्तीला पटतं. तरीही चालढकल होऊ लागली, तर लगेच आपण स्वत:च आपल्या उद्देशाचं स्मरण करावं.
  • व्यायामाला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनी त्याचे परिणाम दिसू लागतात. दिवसभर ताजेतवाने वाटू लागते, मानसिकदृष्टय़ा शांत वाटते, चेहऱ्यावर तजेला येतो. आपल्यात होणारा हा चांगला बदल व्यायाम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतो. शरीर प्रमाणबद्ध होते, पूर्वीचे कपडे ढगळ होऊन नवे कपडे घेण्याची जरूर भासते. या गोष्टी इतरांच्या चटकन लक्षात येत नसल्या तरी व्यायाम करणाऱ्या व्यक्तीसाठी त्या खूप महत्त्वाच्या ठरतात.
  • विशिष्ट आजार असलेल्यांनी योग्य सल्ल्याने व्यायाम सुरू केल्यानंतर त्यांनाही दिवसेंदिवस स्वत:मध्ये फरक जाणवू लागतो. अगदी एखाद्याला सारखा सर्दी-खोकला होत असेल आणि व्यायामाच्या सातत्यानंतर सारखे आजारी पडण्याची प्रवृती कमी होतेय, असं लक्षात आलं तरी ती व्यक्ती व्यायाम सुरू ठेवते.
  • गटाने जमून व्यायाम केल्यामुळे उत्साह नक्कीच टिकून राहतो. समवयस्क मित्रमैत्रिणी भेटतात, व्यायामानंतर गप्पा होतात, गटातली एखादी व्यक्ती आली नाही तर इतर जण त्याची आवर्जून चौकशी करतात. एरोबिक्स, झुंबा, बॉलिवूड डान्स असे गटाने करण्याचे व्यायाम, योग आणि चालायला जाणेही गटाने करता येते.
  • अनेक जण वेट ट्रेनिंगसारख्या व्यायामासाठी जिममध्ये ‘पर्सनल ट्रेनर’ घेतात. एखादा दिवस जरी जिमला बुट्टी मारली की हा पर्सनल ट्रेनर फोन करतो आणि व्यायाम सहसा चुकवला जात नाही.
  • व्यायामाचा संकल्प केल्यावर त्यासाठी खास व्यायामाचे कपडे, बूट घेऊन पाहा. खरे तर व्यायाम कोणत्याही कपडय़ांवर करता येतो, त्यात नव्याने खरेदी करायलाच हवी असे नाही. पण अनेक जणांना खास व्यायामासाठी ट्रॅकपँट, टी- शर्ट वगैरे खरेदी केली की दुप्पट हुरूप येतो. नेहमीचा अनुभव म्हणजे, ट्रॅकपँट अजिबात न घालणाऱ्या अनेक वयस्कर स्त्रिया आधी पंजाबी ड्रेस घालून व्यायाम करून पाहतात, मग इतरांचे पाहून ट्रॅकपँट घालतात आणि त्यांना ते मनापासून आवडतेही.
  • तालबद्ध संगीत हादेखील व्यायामाचा उत्साह टिकवणारा भाग आहे. हल्ली जिममध्ये चांगले संगीत लावलेले असते, लोक चालायला जातानाही संगीत ऐकत जातात. संगीताच्या तालावर जॉगिंग करायला मजा वाटते. संगीत आणि मित्रांचा गट व्यायामाला असला तर विचारायलाच नको!
  • नव्याने व्यायाम सुरू केल्यावर पहिला काही काळ हातपाय दुखू शकतात. आपण रोज शरीराची एवढी हालचाल करत नसतो आणि एकदम व्यायाम सुरू केल्यावर ते जाणवू लागते आणि नकोच तो व्यायाम असे वाटू लागते. अशा वेळी व्यायाम एकदम न वाढवता हळूहळू आपल्या प्रकृती झेपेल तसाच वाढवत न्यायला हवा, त्याने दुखापत टाळता येईल.
  • व्यायामाचा ‘प्रोग्रॅम’ दर काही दिवसांनी बदलल्यामुळेही उत्साह टिकतो. काही नवीन प्रकारचे व्यायाम सुरू करणे, डान्स फॉर्म वा एरोबिक्सचा व्यायाम करत असाल तर एखादी नवीन स्टेप करून पाहणे, नवीन गाण्याच्या तालावर व्यायाम करून पाहणे हे करून पाहा.

palakkokil@yahoo.com

(शब्दांकन- संपदा सोवनी)