मनोविकार होण्यामागे बायो-सायको-सोशल प्रारूप असते. मनोविकृतीच्या जडणघडणीत या तीनही घटकांचा कमी-जास्त प्रमाणात हातभार असतोच. जैविक कारणांमध्ये मुख्यत्वे मेंदूतील जीवरासायनिक संप्रेरकांच्या मात्रेतील चढउतारांचा समावेश असतो. मध्यंतरी आलेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील प्रख्यात झालेला शब्द ‘केमिकल लोचा’ तो हाच!

त्या रासायनिक असंतुलनाला संतुलित करण्याचे काम मनोविकारांवरील औषधे करत असतात. स्किझोफ्रेनिया, नैराश्य, चिंतेवरील औषधे ही याच जीवरसायनांच्या मात्रेवर, कार्यावर, उपलब्धतेवर अनुकूल बदल घडवून आणतात. या रसायनांना शास्त्रीय भाषेत न्युरोट्रान्समीटर्स असे म्हटले जाते.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

न्युरोट्रान्समीटर्स अनेक प्रकारची असतात. प्रत्येकाचे कार्यही वेगळे असते. गॅमा अ‍ॅमिनोब्युटिरिक अ‍ॅसिड (गाबा) हे असेच एक महत्त्वाचे जीवरसायन. मेंदूकडून शरीराकडे जाणाऱ्या-येणाऱ्या संदेशापैकी प्राधान्य ठरवून कोणते संदेश पुढे पाठवायचे, कुठले थोपवायचे हे ठरवण्याचं काम गाबा करीत असतं. थोडक्यात, ‘रखवालदाराचे’ काम! जर मेंदूतील हा गाबा कमी झाला तर या संदेशाची गडबड होते, वेडय़ावाकडय़ा मार्गाने, जास्त प्रमाणात ते जाऊ शकतात, ज्यामुळे वैचारिक गोंधळ उडू शकतो. वृद्ध वयात बऱ्याच वेळा हे ‘गाबा’ कमी होत असते.

ग्लुरामेट हे आणखी एक महत्त्वाचे रसायन! मेंदूच्या कार्यात खूप महत्त्वाचा वाटा असतो. डोपामीन या जीवरसायनाला आनंददायी रसायन असेही म्हटले जाते. त्यामुळे याचे प्रमाण कमी असेल तर नैराश्य येते. थोडय़ा जास्त प्रमाणातील डोपामीनचा व्यसन, गुन्हेगारी, सनसनाटी वागण्याच्या वृत्तीशी संबंध असतो. स्किझोफ्रेनियामध्ये हे प्रमाण खूप जास्त आढळते. सिरोटोनीन हे रसायन मूड किंवा भाव नियंत्रणात ठेवतं, भुकेवर नियंत्रण ठेवतं. अ‍ॅड्रिनालीन या रसायनाचा सजगपणा, उत्तेजना किंवा भावनातिरेक याच्याशी संबंध असतो. एण्डॉर्फिन्स रसायन वेदना नियंत्रित करण्यासाठी आणि आनंदाची भावना वाढवायला मदत करते तर अ‍ॅड्रिनोकोर्टिको ट्रोफिन या रसायनाचा सर्जनशील विचार करण्यासाठी उपयोग होतो. अशी अनेक रसायने आहेत. त्यांच्यावरच काम करणारी औषधे हे मनोविकार बरे करण्यासाठी वापरली जातात.

औषधे या रसायनांवर काम करणारी असली तरी त्यांची योग्य ती निवड करावी लागते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते निदान! निदान योग्य करणे खूप महत्त्वाचे असते. बऱ्याचदा त्यात विविध विकारांची लक्षणे संयुक्तपणे दिसत असतात किंवा व्यक्तिमत्त्वाचा विचारही करावा लागतो. काही वेळा आधीच्या औषधांनी फरक पडत नसल्याने रुग्ण आलेला असतो. तेव्हा आधी कोणती औषधे सुरू होती, कशाने किती फरक पडला या सगळ्याचा विचार करून औषधयोजना ठरवावी लागते.

‘पिंडे पिंडे भर्तिर्भिन्ना:’प्रमाणे रुग्णागणिक जरी निदान तेच असेल तरी औषध किंवा त्याचे प्रमाण वेगवेगळे असते. आजाराची तीव्रता, रुग्णाची औषधाबद्दलची आनुवंशिक  संवेदनशीलता, औषधाचा चयापचय करण्याचा वेग आणि इतर शारीरिक विकारांचा विचार करावा लागतो. बऱ्याचदा औषधाची ‘पॉवर’ बघून रुग्ण घाबरतात आणि कमी पॉवरचे औषध द्या असे सांगतात. पण असे काही नसते. एखादे औषध ५ मिलिग्रॅमच्या डोसमध्ये जो परिणाम साधते, तेच दुसरे औषध ५० मिलिग्रॅम किंवा १०० मिलिग्रॅममध्ये साधते. औषधे सुरू करताना नेहमीचा प्रश्न असतो, किती काळ घ्यावी लागणार? तेव्हा मी उत्तर देतो, हा काही सर्दी-खोकला किंवा साधा ताप नाही. त्यामुळे जास्त काळ घ्यावी लागणार. त्यामध्ये तीन पायऱ्या असतात. पूर्णपणे लक्षणे नाहीशी होईपर्यंतचा भाग, नंतर ज्या डोसला ‘हा’ परिणाम साधता आला तो डोस काही काळ चालू ठेवणे, नंतर तो डोस कमी कमी करून बंद करणे. या सर्व औषधांचे परिणाम दिसायला काही आठवडे जातात. सुरुवातीला कदाचित थोडे दुष्परिणाम जाणवतात, पण धिराने उपचार केल्यास योग्य परिणाम दिसू लागतो. त्यामुळे औषधोपचार घेताना संयम, धीर धरणे खूप महत्त्वाचे असते. उपचाराचे यश हे अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे निदान, औषधांचा डोस, काळ तसेच रुग्णाने ते नियमित घेणेही तेवढेच महत्त्वाचे असते. तसेच कुमारवयात होणारे मनोविकार हे नंतरच्या वयात होणाऱ्या  मनोविकारांपेक्षा दीर्घकाळ चालणारे तसेच औषधे सुरू असतानाही चढ-उतार दाखवणारे असतात!

बऱ्याचदा औषधांविषयीच्या गैरसमजांमुळे रुग्ण म्हणतात, आम्हाला फक्त मानसोपचार हवा. तर औषधांनी बरे वाटायला  लागले की म्हणतात, आम्हाला आता मानसोपचारांची काय गरज? के. जेमिसन या मनोरुग्णाने ‘अ‍ॅन अनक्वाएट माइंड’ या आत्मचरित्रात मानसोपचार आणि औषधे या दोघांचा वापर केल्याशिवाय सामान्य आयुष्य जगणेच शक्य नाही, असे अनुभवाअंती लिहिलेय. लिथियममुळे नैराश्य कमी व्हायला मदत होते. माझे विचार विवेकवादी होतात, वागणूक सुधारते व रुग्णालयाबाहेर राहणे शक्य होते. पण मला अधिक बरे वाटले ते जोडीला मानसोपचार घेतल्याने. मानसोपचारामुळे मनातला गोंधळ कमी होऊन आयुष्याविषयी आशा वाटू लागली. पण मानसोपचार घेणे औषधांमुळेच शक्य झाले!

थोडक्यात, औषधोपचार व इतर मानसोपचार एकत्र घेणे महत्त्वाचे!

-डॉ. अद्वैत पाध्ये Adwaitpadhye1972@gmail.com