नवीन वर्षांची सुरुवात जशी गुढीपाडव्याने होते, तशीच पहिल्या ‘वसंत’ ऋतूची सुरुवातही याच चैत्र महिन्यापासून होते. या ऋतूपासून सूर्याची उष्णता वाढल्यामुळे शरीरातील पोषक स्निग्धांश कमी होतो. परिणामी घामावाटे शरीरातील पोषक द्रव्ये जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे अशक्तपणा वाढतो. याकरिता..
’ उन्हाळ्यात पचायला हलके अन्न खावे. थोडे तिखट, कडू, तुरट रसांचे पदार्थ खावेत. याचसाठी पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने वाटून त्यात सुंठ, ओवा, जिरे, मोहरी, सैंधव साखर घालून खायला सांगितले आहे. कडुनिंबाची ही चटणी उन्हाळ्यात अनेक विकारांपासून दूर ठेवण्यासाठी रोज खाल्ली पाहिजे.
’ याच महिन्यात येणाऱ्या रामनवमी व हनुमान जयंतीला ‘सुंठवडा’ दिला पाहिजे. सुंठ ही फक्त चवीला तिखट असली तरी ती उत्तम पित्तशामक आहे.
वरील गोष्टी या उत्कृष्ट पित्तशामक, कफ कमी करणाऱ्या, भूक वाढविणाऱ्या, पाचक, रक्तशुद्धी करणाऱ्या आहेत. त्यामुळे या ऋतूतील अपचन, तहान, अशक्तपणा, आम्लपित्त, घामामुळे होणारे त्वचारोग अशा अनेक रोगांवर त्यांचा औषध म्हणून उपयोग होतो.
वैद्य राजीव कानिटकर