20 April 2019

News Flash

लोहाच्या गोळ्यांचा उपयोग

मुंबईच्या महापालिका शाळेमधील मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या चर्चेत आल्या.

(संग्रहित छायाचित्र)

लोहाच्या गोळ्यांचा उपयोग

मुंबईच्या महापालिका शाळेमधील मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या चर्चेत आल्या. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत शाळेत सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गोळ्या या मुलीलाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मुलीला रक्ताच्या उलटय़ा झाल्या असा आरोप पालकांनी केला. या मुलीला क्षयरोग असल्याचे नंतर समोर आले. या निमित्ताने लोह व फॉलिक गोळ्या नेमक्या का दिल्या जातात, त्यांचे परिणाम व दुष्परिणांविषयी..

लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या म्हणजे काय?

शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लोह व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या दिल्या जातात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांचा अधिक प्रभावीपणे सामना करता येतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतातील १० ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के मुली आणि ३० टक्के मुले अशक्त आहेत. त्यामुळे या मुलांना लोह व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या गोळ्यांचे दुष्परिणाम कोणते?

या गोळ्यांचे मोठे दुष्परिणाम नाहीत. मात्र लोहाच्या गोळ्यांनी थोडेफार इतर लक्षणे दिसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लोहाच्या गोळ्या पचण्यास थोडय़ा कठीण असतात. त्यामुळे पहिल्यांदा या गोळ्या घेतल्या की त्यांचे पचन होताना थोडे अडचणीचे ठरते. त्या वेळी पोटदुखी किंवा मळमळ अशी लक्षणे दिसू शकतात. शौचाला कडक होते. अर्थात ही लक्षणे काही काळाने दूर होतात.

सरकारी उपक्रम

भारताचा साप्ताहिक लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड गोळ्या देण्याचा उपक्रम आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीमेअंतर्गत जानेवारी २०१३ पासून दर आठवडय़ाला लोह व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पालिकेच्या व अनुदानित शाळांमध्ये तसेच अंगणवाडय़ांमध्ये मुलांना या गोळ्या पुरवल्या जातात.

किती प्रमाणात द्यावी?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार शाळेत जाणाऱ्या तसेच त्यापेक्षा लहान मुलांमध्ये २० टक्क्यांहून अधिक मुले अशक्त असतील तर सार्वजनिक आरोग्य मोहीम राबवणे योग्य ठरते. पाच ते १२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना साधारण ४५ ग्रॅम लोह देण्याची गरज असते. आठवडय़ातून एक गोळी पुरेशी ठरते.

First Published on August 14, 2018 3:48 am

Web Title: use of iron tablets