दिनक्रमातील नित्याची बाब असूनही अवघडलेपणातून अधोवायूसारख्या समस्येवर फारशी चर्चा होत नाही. खरेतर प्रत्येकजण दिवसातून ७ ते २० वेळा अधोवायू सोडत असतो. हा वायू पोटात नेमका कसा येतो, दिवसभरात या वायूचे प्रमाण किती असते, अधोवायू सोडताना आवाज का होतो, वास का येतो, अधोवायू वाढल्याची लक्षणे व तो कमी करण्याचे उपाय अशा अनेक प्रश्नांची ही उत्तरे..

दिवसभरात शरीरात जात असलेले घटक वेगवेगळ्या रुपात शरीराबाहेर टाकले जातात. शिंका, जांभया, ढेकर, मूत्र, शौच आणि अधोवायू हे त्यातील काही प्रकार. शरीरात जात असलेल्या आहाराबाबत सर्वसामान्य उत्साही असतात मात्र या आहाराचे शरीरात गेल्यावर नेमके काय होते व त्याचे परिणाम कोणकोणत्या स्वरुपात समोर येतात याबाबत मात्र अनेकजण अनभिज्ञ असतात. हवा का झोका म्हणून चिडवला जाणारा अधोवायू याबाबत तर फारच कमी माहिती असते.

पोटातील वायू म्हणजे नेमके काय?

वायू ही आहार पचनातील सर्वसामान्य क्रिया आहे. आपल्या पचनक्रियेच्या साखळीत दोन प्रकारे वायू तयार होतात.

१. तोंडावाटे घेतलेली हवा २. मोठय़ा आतडय़ांमध्ये नैसर्गिकपणे असलेल्या निरुपद्रवी जीवाणूंकडून अन्नाचे विघटन होत असताना तयार झालेले वायू.

अन्नाचे पचन करताना एका दिवसात आतडय़ांमध्ये साधारण २५ लिटर वायू असतो किंवा तयार होतो व त्यातील बहुतेक वायू तिथेच वापरलाही जातो, त्यामुळे दिवसाला साधारण १ ते २ लिटर वायू शरीरातून अधोवायूच्या रुपात बाहेर पडतो.

या वायुमुळे ढेकर, पोट फुगणे, अधोवायू असे प्रकार घडतात. या वायूमध्ये खालील घटक असतात.

ऑक्सिजन

नायट्रोजन

कार्बन डायऑक्साइड

हायड्रोजन

मिथेन

हायड्रोजन सल्फाइड

शरीरात वायूंची निर्मिती कशी होते?

प्रत्येक वेळी गिळताना १५ ते २० घन सेंटीमीटर हवा आपल्या पोटात जाते. याप्रमाणे आपण दिवसाला साधारण अडीच लिटर हवा गिळतो. अन्ननलिकेत किंवा पोटात वायूची निर्मिती होत नाही. तिथे फक्त आपण हवेतून घेतलेले ऑक्सिजन आणि नायट्रोजन वायू सापडतात. यापैकी जवळपास ९९ टक्के ऑक्सिजन शोषला जातो मात्र केवळ ७० टक्के नायट्रोजन पोटात शोषला जातो.

यकृतात तयार होत असलेले आम्ल आणि स्वादुपिंडामध्ये स्रवणारे बायकाबरेनेट यांच्यामुळे स्निग्ध, कबरेदक, प्रथिन यांचे पचन होते. त्यावेळी साधारण तीन लिटर कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो, मात्र त्यातील बहुतांश वायू पुन्हा लहान आतडय़ात शोषला जातो. हायड्रोजनची निर्मिती ही मोठय़ा आतडय़ांशी संबंधित आहे. या ठिकाणी ४०० प्रकारचे जीवाणू किण्वन प्रक्रियेने अन्नाचे विघटन करतात. या विघटनात दिवसाला तब्बल १२ लिटर हायड्रोजन वायू तयार होतो. त्यातील १० लिटर वायू पुन्हा मोठय़ा आतडय़ांमध्ये शोषला जातो आणि फुप्फुसांमधून श्वासावाटे बाहेर टाकला जातो. काही वायू जीवाणूंकडून पुन्हा मोठय़ा आतडय़ांमधून वापरला जातो. यातील दोन लिटर वायू मात्र गुदद्वारातून बाहेर पडतो.

अधोवायूला वास का येतो?

शरीरातून बाहेर पडल्यावर अत्यंत वेगाने हवेत मिसळणाऱ्या तीन वायूंमुळे अधोवायूला वास येतो. हायड्रोजन सल्फाइड, मिथेन आणि डायमिथाइल सल्फाइड हे ते तीन वायू. हे वायू जीवाणूंमुळे होणाऱ्या अन्नाच्या विघटनात तयार होतात. पोटातून बाहेर पडणारे इतर सर्व वायू गंधरहित असतात. माणसागणिक वायूनिर्मितीचे प्रमाण व घटक बदलतात. काहींमध्ये मिथेन तयार होतो तर काहींमध्ये सल्फेट वायू तयार होतो. मोठय़ा आतडय़ांमध्ये असलेल्या जीवाणूंच्या प्रकारांवरून ते ठरते. बद्धकोष्ठ झाल्यास वासाची तीव्रता वाढते.

अधोवायू सोडताना आवाज का येतो?

प्रत्येक व्यक्ती दिवसाला साधारण २००० घन सेंटीमीटर वायू शरीराबाहेर सोडतो. यातील साधारण ३० ते १२० घन सेंटीमीटर हवा एकावेळी बाहेर सोडली जाते. त्यामुळे दिवसातून ७ ते २० वेळा वायू शरीरातून बाहेर पडतो. काहीजण सकाळी जास्त प्रमाणात अधोवायू बाहेर टाकतात तर काही संध्याकाळी अधिक प्रमाणात वायू बाहेर सोडतात. बहुतांश लोकांमध्ये जेवणानंतर अधिक प्रमाणात तर झोपल्यावर कमी प्रमाणात वायू तयार होतो. गर्भधारणेपूर्वी, शस्त्रक्रिया आणि वृद्धापकाळामुळे वायू सोडण्याच्या क्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या ओटीपोटातील स्नायूंच्या क्षमतेत बदल होतात. त्यामुळे वृद्धांमध्ये कुशी बदलतानाही अधोवायू बाहेर पडतो.

गुदद्वारामधून वायू बाहेर पडताना तो आवाज करत नाही मात्र तो बाहेर काढण्यासाठी दाब वाढला की मोठय़ा आतडय़ातील स्नायू कंप पावतात आणि अरुंद पोकळीतून वायू वेगाने बाहेर पडताना आवाज होतो. लहान मुलांनाही अधोवायू बाहेर काढण्यासाठी पोटावर झोपवले जाते तेव्हा आवाज होतो तो याच कारणाने.

अधोवायू वाढल्याची लक्षणे कोणती?

काहीवेळा अधोवायू किंवा वायूवर नियंत्रण ठेवणे कठीण गेल्याने शारीरिक ताण व सामाजिक अवघडलेपणाही येतो. अधोवायू वाढल्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

ढेकर येणे.

पोट फुगणे

ओटीपोटात दुखणे.

सतत व जास्त प्रमाणात अधोवायू सुटणे.

अधोवायूला वास येणे.

अन्नविघटनात तयार झालेला वायू व मोठय़ा आतडय़ांचे आकुंचन-प्रसरण यांच्या परस्परक्रियांमुळे हे घडते. या लक्षणांसाठी अन्न आणि औषधे अधिकतर कारणीभूत असतात. ही लक्षणे का दिसतात आणि अधोवायूवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात काय बदल करावेत हे पुढच्या आठवडय़ात जाणून घेऊया.

– डॉ. रेखा भातखंडे -पोटविकारतज्ज्ञ