यंदा राज्यात अनेक भागांमध्ये मोठय़ा आवाजाचे किंवा जास्त प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर र्निबध आणले आहे. ठाण्यात तर रात्री दहानतंर फटाके वाजवण्यावरही बंदी केली आहे. बांधकाम, रस्ते वाहनांच्या प्रदूषणाने आधीच धोक्याची पातळी गाठली असून याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. त्यातच दिवाळीतील फटाक्यांच्या धुराची भर पडते. फटाक्यांमधून निघणाऱ्या वायूमुळे फुप्फुसाचे आणि श्वसनाच्या आजारांचा धोका वाढतो. आजारी, वयोवृद्ध आणि लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने ते या आजारांना लवकर बळी पडतात. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या दिवसांमध्येही डॉक्टरांकडे ॅलर्जी, फुप्फुस आणि श्वसनाच्या रुग्णांची सध्या वाढलेली दिसते.  

दिवाळीत होणारे प्रदूषण आणि त्यामुळे उद्भवणारे आजार याला अनेक कारणे आहेत. सर्वसाधारणपणे वाहनांमधून, रस्ते किंवा बांधकामामुळे, मोठय़ा आवाजामुळे प्रदूषण होते. मात्र दिवाळीच्या दिवसात फटाक्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण दुपटीने वाढते. त्यातच दिवाळीच्या दिवसात तेलकट आणि तूपकट पदार्थ खाण्यात येते. त्यामुळे शरीरातील श्वसनक्रिया मंदावते. साधारणपणे दिवाळी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान येते. या ऋ तू बदलानंतर थंडी सुरू होते. थंडीत वातावरणात दमटपणा असल्यामुळे श्वसनाचे विकार निर्माण होतात. या सगळ्या गुंतागुंतीच्या क्रियामुळे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत श्वसनाच्या विकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होते. हवामानासारख्या नैसर्गिक गोष्टींवर आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. बांधकाम, वाहनांमधील धुराला अटकाव करण्यासाठी सार्वजनिक स्तरावर जागृती होणे गरजेचे आहे; पण आपण किमान फटाक्यांमधून येणाऱ्या दूषित वायूमुळे आजार वाढण्यास अटकाव करू शकतो.

bombay hc declare sawantwadi dodamarg corridor as ecologically sensitive
अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

फटाक्यांमध्ये पोटॅशिअम नायट्रेट, कार्बन आणि सल्फर हे घटक असतात. हे विषारी घटक अधिक वेळ हवेत राहतात. श्वसनावाटे हे थेट फुप्फुसांमध्ये जातात. ज्यांना सर्दी, कफ याचा त्रास आहे अशा रुग्णांना याचा त्रास अधिक जाणवतो. फटाक्यांचे वेष्टन करण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिक जाळल्यानंतर येणारा दूषित धूरही शरीरात जातो. त्यामुळे दिवाळी दरम्यान सर्दी, खोकला, धाप लागणे, घसा खवखवणे हे आजार प्रामुख्याने दिसतात. फटाक्यांमधून येणारा दूषित वायू हवेत मिसळल्यामुळे आणि ही हवा श्वसनावाटे शरीरात घेतल्यामुळे श्वसन आणि फुप्फुसांच्या विकारात वाढ होते. श्वसन नलिका, फुप्फुस आणि दम्याच्या रुग्णांना फटाक्यांतील दूषित वायूंचा धोका अधिक संभवतो. एरवी औषधे आणि उपचाराने नियंत्रणात आलेला दमा, फुप्फुसांच्या नळीला सूज येणे (ब्रॉकायटिस) आणि तत्सम आजार या दिवसात टोकाला जातात. जसे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढते तशी आजाराची तीव्रता वाढते. दूषित वायूमुळे न्यूमोनिया आणि क्षयरोगाच्या प्रमाणात वाढ होत असून मधुमेहाच्या रुग्णांना याचा सर्वाधिक धोका असतो.

श्वसनावाटे ऑक्सिजनबरोबरच फटाक्यांतून हवेत मिसळलेले रासायनिक वायू शरीरात जातात. धूम्रपान करणाऱ्या आणि हा धूर श्वसनावाटे घेणाऱ्या व्यक्तींना जितका धोका संभवतो तितकाच फटाक्यांचा वायू शरीरात घेणाऱ्या व्यक्तींना होतो. दूषित वातावरणात किती काळ घालविला किंवा किती वेळ दूषित वायू श्वासावाटे फुप्फुसात घेतला यावर विकाराची तीव्रता अवलंबून असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर फटाक्यांमधून निघणाऱ्या दूषित वायूचा परिणाम वाढतो.

लहान मुले, वयोवृद्ध, मधुमेही किंवा आजारी व्यक्तींना दूषित धुराचा धोका अधिक असतो. या कारणांमुळे मधुमेही, वयोवृद्धांना कधीकधी अतिदक्षता विभागात दाखल करण्याचीही वेळ येते. सुतळी बॉम्ब, रॉकेट, सुरसुरीचा रशीसारखा प्रकार यामधून मोठय़ा प्रमाणात धूर येतो. यामध्ये काळ्या रंगाची गोळी (ज्याला सापाची गोळी म्हटले जाते) पेटविल्यानंतर मोठय़ा प्रमाणात धूर येतो. या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात.

फटाक्यांमध्ये असणारे घटक

गन पावडर कागदामध्ये गुडांळून फटाके तयार केले जातात. या गन पावडरमध्ये ७५ टक्के पोटॅशिअम नायट्रेट, १५ टक्के कार्बन, १० टक्के सल्फर असते. यामध्ये प्लास्टिकचाही वापर केला जातो. सध्या रंगीत फटाके पाहावयास मिळतात. रंग आणण्यासाठी फटाक्यांसाठी रासायनिक घटकांचा वापर केला जातो.

आवाजही घातक

फटाक्यांतून निघणाऱ्या आवाजामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. यातून अस्वस्थ वाटणे, ओकारी येणे, झोप न लागणे अशी लक्षणे दिसतात. यामध्ये गर्भवती आणि वयोवृद्ध व्यक्तींना आवाजामुळे शरीरव्याधी निर्माण होण्याची शक्यता असते.

कारखान्यातील कर्मचारी बळी

फटाके तयार केल्या जाणाऱ्या कारखाण्यातील कर्मचारी श्वसन विकाराचे पहिले बळी ठरतात. फटाके बनविताना यातून निघणारा धूर किंवा रासायनिक घटक श्वसनावाटे फुप्फुसात जातात. त्यामुळे रोजगार करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये फुप्फुसाच्या आजाराचे प्रमाण अधिक असतात.

प्रतिबंधात्मक उपाय

  • मोठय़ा आवाजाचे आणि अधिक धूर येणारे फटाके वाजवू नये.
  • श्वसनाचे विकार असल्यास फटाके वाजविल्या जाणाऱ्या भागात जाणे टाळावे.
  • नाकाला मास्क लावल्याने दूषित वायूपासून पूर्णत: संरक्षण होत नसले तरी काही प्रमाणात अटकाव केला जाऊ शकतो.
  • रुग्णालये, शाळा या ठिकाणी फटाके वाजवू नये.

डॉ. मनोज मस्के,श्वसनविकारतज्ज्ञ, सहयोग नर्सिग होम

डॉ. मेहूल शाह,श्वसनविकारतज्ज्ञ, वॉकहार्ट रुग्णालय

डॉ. सुरेश रंग, जसलोक रुग्णालय