डॉ. अविनाश गावंडे

उन्हाळा आणि पावसाळ्यात दूषित पाणी व अन्नाच्या सेवनाने लहान मुलांना अतिसार होण्याची शक्यता वाढते. दिवसात पाचपेक्षा अधिक वेळा शौचास जावे लागणे म्हणजे अतिसार.  एका वेळी शौचाला अधिक प्रमाणात होणे, पातळ होणे किंवा वारंवार शौचास होणे ही अतिसाराचीच लक्षणे आहे. हा त्रास चौदा दिवसांहून अधिक असल्यास त्याला ‘क्रॉनिक’ अतिसार असेही म्हणतात. हा आजार विशेषत: लहान मुलांमध्ये आढळतो. काही बालकांमध्ये अतिसारात शौचासोबत आव व रक्त जाणे ही लक्षणेही दिसतात.

लक्षणे कोणती?

साधारणत कुठल्या जिवाणू वा विषाणूमुळे आजार झाला आहे त्यावर त्याची लक्षणे अवलंबून असतात. काही लक्षणे अशी-

  •  शौचास होणे, ओकारी होणे, ताप.
  • पोट दुखणे, शौच झाल्यावरही जाण्याची इच्छा होणे.
  • लघवीचे प्रमाण कमी होऊन ती गडद रंगाची होणे.
  • मोठय़ा मुलांना तहान जास्त लागणे.
  •  डोके दुखणे, चक्कर आल्यासारखे वाटणे.
  • खाण्याची इच्छा कमी होणे.
  •  शौचासोबत रक्त आणि आव पडणे.
  • आजाराची तीव्रता जास्त असल्यास वजन कमी होणे.
  • कधी-कधी झटकेही येऊ शकतात.
  • तोंड, जिभेसह त्वचा शुष्क होणे.
  • मुलाच्या नाडीची गती वाढणे.

संभाव्य गुंतागुंत

  • गंभीर रुग्णांमध्ये शुष्कतेचे (डिहायड्रेशन) प्रमाण जास्त असते.
  • मूत्रपिंड निकामी होणे.
  • शरीरात क्षारांची कमतरता निर्माण होणे.
  • काही रुग्णांमध्ये पक्षाघातही होऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

  • वैयक्तिक स्वच्छतेसोबत परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
  • जेवणाआधी व शौचास जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे.
  • जेवण बनवणाऱ्या वा मुलाला भरवणाऱ्या व्यक्तीने स्वतचे हात स्वच्छ धुवावे.
  • आजारी व्यक्तीने जेवण तयार करू नये व बालकाला भरवूही नये.
  • भाजीपाला, फळे वापराआधी स्वच्छ धुवावीत.
  • बाळाला पहिले ६ महिने मातेचेच दूध द्यावे.
  • सहा महिन्यानंतर बाळाला पूरक आहार चालू करतो तेव्हा स्वच्छतेचे नियम पाळावे.
  • ‘रोटा व्हायरस’, ‘टायफॉईड’सारख्या लसी शक्य झाल्यास बाळाला द्याव्यात.

निदान

डॉक्टरांच्या तपासणीद्वारे तसेच प्रयोगशाळेत शौचाची तपासणी करून अतिसाराचे निदान होते. पोटाची क्ष-किरण (एक्स-रे) तपासणीही काही रुग्णांत केली जाते. गंभीर रुग्णांना आतडय़ांची बायोप्सी करायलाही सांगू शकतात. गुद्द्वारातून ‘बेरियम एनिमा’ व ‘कोलोनोस्कोपी’ तपासणीही करता येते.

उपचार

  •  ‘जलसंजीवनी’ (ओआरएस) देऊन शुष्कतेवर उपचार केले जातात.
  •  शुष्कता कमी असल्यास किंवा जलसंजीवनी पावडर नसल्यास साखर-मीठ-पाण्यापासून घरीच जलसंजीवनी करून रुग्णावर उपचार शक्य आहे.
  • नारळाचे पाणी देणे वा घरी असलेला पातळ पदार्थ ज्यात मीठ टाकता येईल (उदा. भाताचे वा वरणाचे पाणी, सूप, दही, ताक ) रुग्णाला देणे.
  • रुग्णाला खाण्याकरिता साधे जेवण द्यावे. मसालेदार, तिखट, आंबट, स्निग्ध पदार्थ असलेले जेवण टाळावे.
  • आजार तीव्र स्वरूपाचा असेल तर रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करून उपचार करणे गरजेचे.
  •  अतिसाराचे प्रमाण कमी करण्याकरिता ‘झिंक’ रसायनाचा वापरही फायद्याचा ठरतो. तो डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.

महत्त्वाचे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलसंजीवनी (ओआरएस) ही ९० ते ९५ टक्के अतिसाराच्या आजारात महत्त्वाची जीवनदायी उपचार पद्धती आहे. ही कुठल्याही शासकीय, निमशासकीय रुग्णालयात मोफत, तर खासगी औषधालयात अल्प किमतीत उपलब्ध असते. आजारी बाळाला जलसंजीवनी ठरावीक अंतराने द्यावी. बाळ दुधावर असेल तरी त्याला ती देणे आवश्यक आहे. जलसंजीवनी कशी बनवावी आणि अतिसाराने आजारी असलेल्या बाळाला ती किती प्रमाणात व किती वेळाने द्यावी याविषयी माहिती घेण्यासाठी एकदा आपल्या डॉक्टरांशीही बोलून घेणे गरजेचे.

(शब्दांकन- महेश बोकडे )