या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समोर बसलेला पंचवीस वर्षांचा मुलगा स्वत:वरच कावलेला दिसत होता. ‘‘तुम्ही मला मागच्या वेळी सांगितलं होतं की व्यायाम सुरू कर. मीही तुम्हाला कबूल केलं होतं की मी नक्की व्यायाम सुरू करेन. पण काय होतं ना डॉक्टर, माझा आळस आड येतो. मला हे अगदी माहीत आहे, माझं वजन कमी व्हायला हवं. माझं नैराश्य तुम्ही दिलेल्या औषधांनी कमी झालं. पण माझा आळस नाही कमी झाला. मला वाटतं तो आळस माझ्या अंगात मुरलाय गेली दोन र्वष. मी नेटवरही व्यायामाबद्दल वाचलंय. व्यायामाचे फायदे शरीराला आणि मनाला होतात हे मला चांगलं कळलंय. माझे वडील मला नेहमी म्हणतात की, तुला सगळं कळतं पण वळत नाही. मला पटतं त्यांचं. खरंच मला सगळं कळतं पण वळत नाही. माझा प्रश्न एकच आहे. माझा व्यायामाचा आळस मी कसा घालवू? त्यासाठी मला काही तरी उपाय सांगा. काही तरी असं जालीम सांगा की मला ते करणं भागच पडेल. मी रोज रात्री ठरवतो की उद्यापासून चालण्याचा व्यायाम सुरू करायचा. सकाळी उठल्यावर म्हणतो, जाऊ  दे ना, आजच्या ऐवजी उद्या जाऊ, आत्ता झोपू या.’’

या मुलाचं वजन ८५ किलो होतं. त्याच्या उंचीच्या मानाने सुमारे वीस किलोंनी ते जास्त होतं. गेली दोन र्वष तो नैराश्यग्रस्त होता. उपचार सुरू होऊन एक महिना होऊन गेला होता. त्याला दिलेल्या नैराश्यविरोधी औषधांनी त्याला आधी जाणवणारी लक्षणं – औदासीन्य, बेचैनी, चिडचिडेपणा, झोप नीट न लागणं, ही सर्व कमी झाली होती. व्यायामाबद्दल त्याला सविस्तरपणे समजावण्यात आलं होतं. व्यायामाने जसे शारीरिक फायदे होतात- वजन कमी होतं, चयापचय सुधारतं, रक्ताभिसरण सुधारतं इत्यादी, तसेच मानसिक फायदे होतात- एकूण भावस्थिती सुधारते, मानसिक ताण कमी होतो, आत्मप्रतिमा सुधारते, ऊर्जेची एकंदरित पातळी वाढते, आत्मविश्वास सुधारतो- या सर्व गोष्टींबद्दल त्याच्याबरोबर यथासांग चर्चा झाली होती. त्यावर मोठय़ा उत्साहाने ‘हो हो, नक्की नक्की’ असं म्हणत त्याने निरोप घेतला होता आणि आज पराभूत चेहऱ्याने परत समोर आला होता.

व्यायाम न करण्यासाठी तो ‘आळस’ हे कारण देतो. आळस  कसा घालवू हा प्रश्नही ‘एखाद्या खोलीतला अंधार कसा काढू?’ या प्रश्नाइतकाच विसंगत आहे. अंधार नावाचं काही नसतं. प्रकाशाच्या अभावाला आपण अंधार म्हणतो. आळस नावाचंही काही नसतं. काम करण्याच्या इच्छेच्या अभावाला आपण आळस म्हणतो. आळस आहे म्हणून काम करण्याची इच्छा होत नाही म्हणणं चुकीचं आहे. काम करण्याची इच्छा नसणे म्हणजे आळस! अंधार काढण्यासाठी जसा दिवा लावावा लागतो तसा आळस घालवण्यासाठी काम सुरू करायला लागतं. तोच त्यावरच उपाय आहे. आळस अंगात मुरलाय याचा अर्थ एवढाच की, बराच काळ काम केलेलं नाही. काम सुरू केल्याक्षणी अंगातला आळस गायब होतो. पुन्हा कामाला नको म्हटलं की आळस हजर आहेच!

या मुलाचं मन त्याला चकवतं आहे. तो त्याला बळी पडतो आहे. आपण आळशी आहोत हा शिक्का त्याने स्वत:वर मारून घेतला आहे आणि त्याची ढाल करून तो व्यायाम टाळतो आहे आणि स्वत:चा बचाव करून घेतो आहे. आळस हे व्यायाम न करण्याचं ‘कारण’ नसून दुसरं नाव आहे हे जर त्याच्या लक्षात आलं तर तो जागा होईल. जालीम उपाय त्याच्याकडेच आहे. सकाळी उठल्यावर त्याने स्वत:शी काहीही संवाद न करता ताडकन अंथरुणातून बाहेर पडून चालायला घराबाहेर पडायला हवं. त्यासाठी निश्चय करणं, मनाचा निर्धार करणं, महत्त्वाकांक्षा बाळगणं वगैरे याची गरज नाही. ही कृती म्हणजे ‘वळवणं’ आहे. आपण जे वळवतो तेच आपल्याला नक्की ‘कळलेलं’ असतं.

drmanoj2610@gmail.com

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is laziness
First published on: 13-04-2017 at 00:41 IST