एल. के. कुलकर्णी,‘भूगोलकोशा’चे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक ’

महापुरुष हे भूगोलाचे गुलाम नसतात, तर भूगोलाला आपला सखाच बनवून ते इतिहासालाही दिशा देतात. शिवरायांच्या आग्य्राहून सुटकेचा प्रसंग याची साक्ष देणारा आहे..

Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
Geographical mind Geographical knowledge about the battlefield
भूगोलाचा इतिहास: भौगोलिक बुद्धिबळ
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतभूमीला पडलेले एक तेजस्वी स्वप्न होते. असे विलक्षण स्वप्न की ज्याचे जनमनातले तेज आज साडेतीनशे वर्षांनंतरही उणावले नाही. पण त्यांच्या चरित्रातले अनेक प्रसंग अजूनही समग्रपणे उजेडात येणे बाकी आहे. त्यापैकी ‘आग्य्राहून सुटका’ या प्रकरणात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अग्निशिखेप्रमाणे उजळून निघाले. क्रूर व कावेबाज औरंगजेबाच्या अभेद्य कैदेतून त्यांचे निसटून जाणे हे कल्पनातीत होते. आणि त्यानंतर हजारो किलोमीटर दूर राजगडावर सुखरूप पोहोचणे, हे तर एक आश्चर्यच होते. म्हणूनच अनेकांनी याला ‘द ग्रेट एस्केप’ म्हटले आहे. या प्रवास प्रसंगातून महाराजांचा स्थलकालविवेक व भौगोलिक जागरूकतेचे दर्शन घडते.

आपल्याभोवतीचा पाच पदरी पहारा भेदून १७ ऑगस्ट १६६६ रोजी महाराज आग्य्रातून निसटले व हे औरंगजेबाला दुसऱ्या दिवशी १८ ऑगस्टला समजले. (ते कसे निसटले हा या लेखाचा विषय नाही.) सप्टेंबरअखेरीस वा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ते राजगडावर पोहोचले. म्हणजे आग्रा ते राजगड हा प्रवास त्यांनी सुमारे ४० ते ५० दिवसांत केला. महत्त्वाची गोष्ट अशी की ते दिवस पावसाळय़ाचे असून या काळात भारतीय नद्यांना पूर आलेले असतात. आपण नेमके कोणत्या मार्गाने व किती दिवसांत राजगडाला आलो, हे शिवाजी महाराजांनी जाहीर केले नाही. ते आले होते त्याच मार्गाने नंतर संभाजी राजांना मथुरेहून परत आणायचे असल्याने ही गोपनीयता राखली गेली.

आग्य्राला जाताना पुणे, औरंगाबाद, बुऱ्हाणपूर, हांडिया, सिहोर, धौलपूर, ग्वाल्हेर, आग्रा या मार्गाने ते गेले होते. पण येताना ते त्या मार्गाने परत आले नाहीत, हे बहुतेकांना मान्य आहे. या मार्गावर सर्वत्र त्यांचा शोध व कठोर तपासणी सुरू असणार हे उघड होते. त्यांच्या पलायनाची बातमी कळताच त्यांच्या शोधार्थ कुंवर रामसिंग धौलपूरच्याच दिशेने गेला होता. दुसरे, या मार्गावर विंध्य व सातपुडा पर्वत असून हांडियाजवळ नर्मदा व बुऱ्हाणपूर येथे तापी नदी पार करणे त्यांना अपरिहार्य होते. या दोन्ही ठिकाणी अतिशय कडक तपासण्या होणारच होत्या. यामुळे आग्य्राहून सुटताच सरळ दक्षिणेकडे न जाता, ते उत्तरेला मथुरेकडे गेले.

 ते निसटले हे सगळय़ांच्या लक्षात येईपर्यंत महाराज मथुरेला पोहोचलेले होते. त्यातही त्यांनी एक भौगोलिक चाल खेळली. आग्रा व मथुरा ही दोन्ही गावे यमुनेच्या एकाच म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर आहेत. पण आग्य्राच्या सीमेबाहेर आल्यावर त्यांनी एकदा अंधारात चोरून व एकदा उघडपणे यमुना नदी ओलांडली. ते कुणीकडे गेले याबाबत शत्रूचा गोंधळ उडावा यासाठी ही युक्ती होती.

महाराजांचे प्रधान मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे काशीपंत हे मथुरेला राहत होते. त्यांच्याकडे संभाजी राजांना सुरक्षित ठेवून महाराज पुढील प्रवासाला निघाले. हा प्रवास त्यांनी तीन विश्वासू लोकांसह, गोसाव्याच्या वेशात केला. या प्रवास मार्गासंबंधी विभिन्न मते आहेत.

महाराज राजस्थान व गुजरातमधून (मथुरा- दौसा- शहापुरा- बांसवाडा- राजपिपला- साल्हेर या मार्गाने) स्वराज्यात आले असे एक मत आहे. पण राजस्थानातील बहुसंख्य राजे औरंगजेबाचे मांडलिक असल्याने या भागात दगाफटका होण्याची भीती होती. ‘शिवभारत’कार कवींद्र परमानंद हे आग्य्राला काही दिवस महाराजांसोबत होते. महाराज निसटल्यानंतर परामानंदांना राजस्थानात दौसा येथे एकदा व पुन्हा हिंदूौनजवळ कैद करण्यात आले. तसेच या मार्गावर बराच प्रवास अरवली पर्वत व वाळवंटी प्रदेशातून असल्याने तो समूहात करणे भाग होते. त्यात ओळख लपून राहणे अवघड होते. दुसरे, या मार्गाने वाटेत राजपिपला येथे नर्मदा व मांडवी येथे तापी नदी ओलांडणे अपरिहार्य होते. पावसाळय़ात या दोन्ही नद्या तिथे दुथडी भरून वाहतात. त्यामुळे स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय त्या ओलांडणे शक्य नव्हते. जानेवारी १६६४ मध्ये सुरत लुटीचा प्रसंग घडल्याने तूर्त महाराजांसाठी हा मार्ग धोकादायक होता.

आणखी एक मत असे की, मथुरा- प्रयाग- काशीमार्गे पूर्वेकडून महाराज स्वराज्यात आले. हा मार्ग मथुरा- प्रयाग- काशी- अंबिकापूर, रतनपूर (सध्याच्या छत्तीसगडमध्ये)- देवगड – चांदा (चंद्रपूर), गोवळकोंडा संस्थानातील इंदूरजवळ (सध्याचे निजामाबाद) गोदावरी ओलांडून बिदर प्रांतातून- सोलापूर- फलटण- भोर- राजगड असा सांगितला जातो. त्यानुसार मथुरेहून महाराज पूर्वेला प्रयाग व काशीच्या दिशेने वळले. मथुरा- प्रयाग- काशी हा पुरातन ‘उत्तरापथाचा’ भाग व यात्रेकरूंच्या वर्दळीचा मार्ग होता. स्वत: महाराज व त्यांच्या तिन्ही सोबत्यांनी संन्याशांचे रूप घेतल्याने ते यात्रेकरूंच्या जथ्यात बेमालूम मिसळून प्रवास करू शकले.

एक असेही मत आहे की, काशी- वाराणसीहून पुढे गयेला जाऊन मग ते र्नैऋत्येला चांद्याच्या दिशेने वळले. पण या मार्गाने अंतर पाच- सहाशे कि.मी. अधिक पडते. शिवाय वाराणसी ते गया या प्रवासात वाटेत लागणाऱ्या महाप्रचंड विस्ताराच्या शोण नदीला ओलांडणे स्थानिक मदतीशिवाय अशक्य व फार जोखमीचे होते. गयेहून पुढे कटक व पुरी येथे जाऊन मग महाराज पश्चिमेकडे चांद्याला आले, असेही सुचवले गेले आहे. हे तर भौगोलिकदृष्टय़ा अधिकच अवघड ठरते. कारण यासाठी दीड-दोन हजार किलोमीटर अधिक व एक महिना जास्त प्रवास करावा लागला असता. शिवाय वाटेत तुफान पूर असणारी महानदी ओलांडण्याचे आव्हान होते.

वरील विविध मतांपैकी मथुरा, प्रयाग, काशी, चांदा, इंदूर (निजामाबाद) इ. ठिकाणांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. यावरून एकंदर काशीनंतर महाराजांनी सरळ दक्षिणेकडे वळून अंबिकापूर, रतनपूर, देवगड मार्गे चांदा व पुढे इंदूर प्रांत गाठणे भौगोलिकदृष्टय़ा सोयीस्कर व संभाव्य दिसते. हा एक असा मार्ग आहे की त्यावरून येताना मोठी नदी ओलांडावी लागत नाही. त्या काळी पावसाळय़ात नद्यांचा पूर ओसरून त्या ओलांडण्यासाठी कित्येक आठवडे वाट पाहावी लागे. या मार्गावरही वाटेत लामसराईजवळ शोण नदी लागते. पण डोंगराळ भाग असल्याने अजून तिला प्रचंड रूप प्राप्त झालेले नसते. तसेच नर्मदा, तापी इ. नद्या या मार्गाच्या पश्चिमेला तर महानदी पूर्वेला आहे.

काही अभ्यासकांच्या मते हा परतीचा प्रवास सुमारे तीन साडेतीन हजार कि.मी.चा होता. महाराज घोडय़ावरून दररोज पाच ते सहा तासांत ६० ते १०० कि.मी. प्रवास करीत. उरलेल्या वेळेत विश्रांती मिळून घोडा दुसऱ्या दिवशी प्रवासाला सज्ज असे. यामुळे ते ४०-५० दिवसांत ते राजगडावर सुखरूप पोहोचू शकले. स्थलकाल व अंतराच्या संदर्भात हे मत योग्य ठरते.

एकूणच शिवरायांचे आग्य्राहून स्वराज्यात पोहोचणे हे सर्वार्थाने अद्भुत कार्य होते. जगात एकमेवाद्वितीय अशा या दीर्घ प्रवासात महाराजांचे शौर्य, धाडस यासोबत त्यांचे अखंड जागृत निसर्गभान निर्णायक ठरले. महापुरुष हे भूगोलाचे गुलाम नसतात, तर भूगोलाला आपला सखाच बनवून ते इतिहासालाही दिशा देतात. छत्रपती शिवाजी महाराजांना अधिक आयुष्य लाभले असते, तर भूगोल वापरून त्यांनी अवघ्या भारताचा इतिहास बदलून टाकला असता.

lkkulkarni.nanded @gmail.com