कुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या प्रसाराबाबत निरनिराळे गैरसमज रूढ आहेत. कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरणारा आजार नसून सध्याच्या बहुविध औषधोपचारांमुळे तो पूर्णत: बरा होतो. त्यामुळे समाजाचा या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे. हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी याची योग्य माहिती समजून घेणे, इतरांना देणे आणि गैरसमज, भीती दूर करणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरिअम लेप्री या जंतूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोगाची सांसर्गिकता ही शरीरातील कुष्ठजंतूच्या प्रमाणावर अवलंबून असते. दृष्य स्वरूपातील विकृती किंवा विद्रूपतेवर नाही. कुष्ठरोग हा महारोग नसून स्पर्शाने मुळीच पसरत नाही. उपचार न घेतलेल्या संसर्ग झालेल्या कुष्ठरुग्णांकडून जंतूचा प्रसार हवेमार्फत होतो. केवळ औषधोपचोर न घेतलेल्या कुष्ठरुग्णांकडूनच या रोगाच्या जंतूचा प्रसार होतो. कुष्ठजंतूंचा हवेमार्फत शरीरात प्रवेश झाल्यानंतर साधारणत: तीन ते पाच वर्षांनंतर प्राथमिक लक्षणे शरीरावर दिसायला लागतात. कुष्ठरोगाचे जंतू मुख्यत्वे चेतातंतू आणि त्वचा यावर आघात करतात.

कुष्ठरोग हा आजार आनुवंशिक नाही. पाप-पुण्य याचाही या आजाराशी कोणताही संबंध नाही. नवस फेडणे, मंत्र-तंत्र वा जडीबुटी हा या आजारावरील उपाय नाही. वास्तविक कुष्ठरोगाविरुद्धच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीमुळे ९८ टक्के लोकांना हा आजार होणे अशक्यच आहे. हा आजार अत्यल्प संसर्गजन्य रोग असून प्रतिकारशक्ती कमी असलेल्या केवळ दोन टक्केच लोकांना हा आजार होऊ शकतो. १९४८ पर्यंत या आजारावर प्रभावी औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे हा एक असाध्य रोग समजण्यात येत होता. १९८० मध्ये बहुविध औषधोपचार (मल्टी ड्रग) पद्धती विकसित झाल्याने हा आजार नियंत्रणात आणणे शक्य झाले.

कुष्ठरुग्ण शोध मोहीम

कुष्ठरोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत नसल्याने स्वत:हून हे रुग्ण सहसा उपचारासाठी येत नाहीत. तेव्हा कुष्ठरोग नियंत्रणासाठी राज्यभरात १९९८ पासून कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबवण्यात आली. प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण एकाच वेळी शोधून औषधोपचाराखाली आणून कुष्ठरोगाचे दर दहा हजारी प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या मोहिमेतून कुष्ठरोगाचे २००५ साली दूरीकरण झाल्याचे जाहीर केले. म्हणजेच दर दहा हजारी लोकसंख्येत कुष्ठरोगाचे प्रमाण एकपेक्षाही कमी असणे. दूरीकरण झाले असले तरी कुष्ठरोगाचे निमूर्लन म्हणजेच संपूर्ण उच्चाटन झालेले नाही. तेव्हा हे उच्चाटन करण्यासाठी २०१५ पासून पुन्हा कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आल्या. या मोहीमेत आढळलेल्या रुग्णांना एमटीडी उपचार देण्यात येतात. त्याद्वारे कुष्ठरोग प्रसाराची साखळी खंडित करण्यात येते. लवकर निदान व नियमित उपचाराने कुष्ठरोगातील विकृती व विकलांगता निश्चित टाळता येते आणि समाजामध्ये रोगप्रसाराचा धोका टाळता येतो.

कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे

  • अंगावरील त्वचेच्या रंगापेक्षा फिकट, लालसर रंगाचा कोणताही डाग किंवा चट्टा.
  • त्वचेच्या रंगरूपात पोतात होणारे बदल. त्वचा तेलकट, लालसर, सुजलेली आणि गुळगुळीत होणे.
  • कानाच्या पाळ्या जाड होणे आणि अंगावरील गाठी इत्यादी.
  • चेतातंतू बाधित झाल्याने संबंधित भागात सुन्नपणा येणे. स्नायू अशक्त होऊन त्यांच्या कार्यात बिघाड होणे. कुष्ठरोगात चेतातंतू बाधित झालेले कार्य औषधोपचाने पूर्ववत होणे कठीण असते.

बहुविध औषधोपचार (एमटीडी)

या औषधाच्या एकाच मात्रेने सुमारे ९९ टक्के जंतूचा नष्ट होतात. असे असले तरी कुष्ठरोग पूर्णपणे बरा होण्यास नियमित आणि संपूर्ण औषधोपचार घेणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा कुष्ठरोग सहा ते बारा महिन्यांत पूर्णपण बरा होतो. सर्व सरकारी दवाखान्यात कुष्ठरोगाचे उपचार मोफत उपलब्ध आहेत. या उपचार पद्धतीमुळे विकृती आणि विद्रुपतेचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे.

कुष्ठरुग्णाच्या सहवासितांमध्ये प्रतिबंधन

नव्याने निदान केलेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांना किंवा कुटुंबियांना याचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना रिफॅम्सीन या औषधाची एक मात्रा दिली जाते. या औषधांमुळे कुष्ठरोगाचा संसर्ग होणे टाळता येते. कुष्ठरोगाची प्रतिबंधक लस ही देशातील काही राज्यामध्ये दिली गेली आहे. गुजरातमधील काही जिल्ह्य़ांमध्ये ही प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. त्यामुळे ही लसही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरात येण्याची शक्यता आहे. कुष्ठरोगाबाबतच्या लक्षणांची योग्य माहिती, औषधोपचार, सहवासितांना प्रतिबंधात्मक औषधोपचार हे या आजारापासून बचावाचे उत्तम मार्ग आहेत. तेव्हा कुष्ठरुग्णांना घरातून वेगळे किंवा आलिप्त ठेवण्याची आवश्यकता नाही. कुटुंबीयांसोबतच राहून पूर्ण औषधोपचार घेऊन या आजारातून मुक्त होणे शक्य आहे.

कुष्ठरुग्णांबाबत सकारात्मक दृष्टिकोन

काही वर्षांपूर्वी कुष्ठरोग महारोग मानला जात होता. परंतु हा आजार संपूर्णपणे बरा होत असल्याचा विश्वास बसल्याने या आजाराबाबतची समाजातील भीती कमी झाली आहे, तसेच या रुग्णांकडे बघण्याचा समजाचा दृष्टिकोन बऱ्याच अंशी सकारात्मक होत आहे. त्यामुळेच पूर्वीच्या कुष्ठवसाहतीपेक्षा घरातच राहून रुग्णावर उपचार आणि पुनर्वसन करण्याकडे कल दिसून येत आहे. मुंबईतील कुष्ठरुग्णांच्या कुटुंबांचे सामान्य कुटुंबांशी रोटी-बेटी व्यवहार वाढले असून हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.

(स्रोत – कुष्ठरोग विभाग, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिक)

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is leprosy
First published on: 13-11-2018 at 04:32 IST