News Flash

प्राचीन पिंपळेश्वर मंदिर

आडवाटेवरच्या या गावालासुद्धा सुंदर परंपरा लाभली आहे.

प्राचीन पिंपळेश्वर मंदिर

नाशिक हा किल्ल्यांचा जिल्हा. पण त्यातील बागलाण तालुक्याने अनेक ऐतिहासिक पराक्रम गाजवत स्वतचा वेगळा ठसा उमटवला आहे. बागलाण तालुक्यात १६ हून अधिक विविध रूपांनी नटलेले आणि वेगळे स्वरूप असलेले किल्ले आहेत. प्राचीन राजवटींची अनेक मंदिरे व तेवढेच सुंदर वाडे आहेत. येथील खेडूत माणसाने हजारो वर्षांच्या परंपरा आजही जपत त्या सांभाळल्या आहेत. येथील इतिहास नरसिंह रूपाने बोलतो तो वीरगळी आणि मंदिरांच्या स्तंभांतून. म्हणूनच नोंदी घेणारे परकीय भूमीवरील आंग्ल अधिकारी या बागलाणच्या प्रेमात पडले. कोणी रहस्यमय तर कोणी स्वर्गाच्या उपमा बागलाणला दिल्या. बागलाणची भूमी संतांची भूमी म्हणून नेहमीच ओळखली गेली. ‘रघुपति राघव राजाराम’ हे गांधीजींचे आवडते भजन बागलाणच्याच कवी जसवंत स्वामींची देण आहे. आजघडीला बागलाण नावाचे विशिष्ट गाव नाही, पण तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले सटाणा हेसुद्धा काही कमी नाही.

आडवाटेवरच्या या गावालासुद्धा सुंदर परंपरा लाभली आहे. या गावाचे वर्णन १६६५ साली आलेल्या युरोपियन प्रवासी थेवोनॉटने त्याच्या आत्मचरित्रात केले आहे. सटाणा म्हणजे सहा ठाणे. तर काही ऐतिहासिक वाङ्मयात त्याला शाह ठाणे म्हटले गेले. साधारण १२व्या शतकात दुर्गदेवीच्या दुष्काळात व परकीय आक्रमणात राजस्थानातून लाखो लोक महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. आणि त्याच काळात नदीकिनारी सहा ठिकाणी वस्त्या वसल्या. १४ व्या शतकात इरावती  नदीकिनारी नारायनशाहदेव राठोड या बागूल राजाच्या काळात एक मंदिर बांधले गेले. हे मंदिर एका उंचसखल टेकडीवर बांधले होते आणि मंदिराच्या चुहूबाजूने पाटाचे पाणी फिरवले होते. त्यामुळे सर्व बाजूंनी मंदिराचे संरक्षणच होणार. मंदिराची रचना अतिशय सुंदर असून गर्भगृह कमरेइतके जमिनीखाली आहे. मंदिर संपूर्ण दगडात तीन विभागांत असून नंदीकरिता स्वतंत्र दालन आहे. पूर्वीची रचना अशी असेल की, पाण्यातून पाय धुऊन नंदीगृहातून पायऱ्या चढून नंदीदेवाचे दर्शन घेऊन पुन्हा पायऱ्या उतरून सभामंडपातून गर्भगृहात जाण्याची व्यवस्था असावी. पण सध्या तेथे फरशीकाम केले आहे. मंदिर विविध कलाकुसरींनी परिपूर्ण होते पण काळाच्या पडद्याआड बऱ्यापकी वैभव इतिहासजमा झाले. त्या शिल्पांच्या खाणाखुणा आजही तेथे सापडतात. दगडी चौथऱ्यावरील नक्षीकाम लक्षवेधी आहे. बाहेर ठेवलेला नंदीसुद्धा अखंड दगडातील असून त्याच्यावरील नक्षीकाम व त्याची बांधणी अतिशय उत्तम आहे. त्याच्या गळ्यात एक शिविलग व शिविलगाची पूजा करत असलेली व्यक्ती दाखवली आहे. १९५१ साली मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण मूळ रचना अजूनही तशीच आहे. शिविलगावर ताम्रधातूचे लेपन आहे. पूर्वी तेथील एका शिळेवर शिलालेख होता पण जीर्णोद्धारात हरवला अशी वृद्धांकडून माहिती मिळते. तसेच मंदिराजवळ एक मोठा दगडी गोळा होता, शक्तिप्रदर्शनात त्याचा उपयोग होत असे. जुना नंदी बाजूला ठेवून तेथे दुसरा नंदी बसवला गेला. मंदिराच्या वरील भागातील ढासळलेले दगड बाजूला सारून तेथे नवा कळस चढवला गेला. सध्या हे पिंपळेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. कारण मंदिराच्या बाहेर पिंपळाची पाच मोठी झाडे आहेत. स्थानिक बुजुर्गाच्या सांगण्यानुसार ती शंभर वर्षे जुनी आहेत. पण ऐतिहासिक संदर्भानुसार हे मंदिर रामेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध होते. नदीकिनारी असलेल्या कित्येक महादेव मंदिरांना रामेश्वर महादेव मंदिर म्हणण्याची प्रथा आहे. १७ व्या शतकात या मंदिराला पेशवे सरकार व होळकर सरकारकडून वर्षांसन मिळत असे तसेच दिवाबत्ती करता पाठक कुटुंबाला दानपत्र मिळाले होते. पण आज तेसुद्धा इतिहासजमा आहे. या महादेव मंदिराचे एक वैशिष्टय़ असे की यास स्मशानेश्वर म्हणूनही ओळखले जाते. कारण मंदिराच्या अवतीभोवती अठरा पगड जातींच्या स्मशानभूमी आहेत, तसेच शैव लिंगायत समाजाच्या समाध्यासुद्धा आहेत. ही जरी एक बाजू असली तरी मंदिराच्या परिसरात इतर देवतांच्या प्राचीन मंदिरांचे समूह आहेत. या जागी पूर्वी लग्नसमारंभ व यज्ञवेदीचे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर होत असत. पुढे आल्यावर दुसऱ्या ठाण्यावरील हनुमंताचे मंदिर लक्ष वेधून घेते ते त्याच्याखाली असलेल्या वीरगळींमुळे. स्थानिक आख्यायिकेनुसार रामेश्वर मंदिर परिसरात दोन मोठे मठ व गोशाळा होत्या. १६ व्या शतकात उत्तरेकडील अजमीर गावाकडून मोघलांचे आक्रमण झाले व त्यांनी हे आश्रम उद्ध्वस्त केले.त्यावेळी रामल नावाच्या योद्धय़ाने ते आक्रमण परतवून लावले व ऋषी आणि गोधनाची रक्षा केली. पण या युद्धात रामलदेव धारातीर्थी पडले. त्यांच्या पराक्रमाची साक्ष तेथील वीरगळी आजही देत आहेत.अशा त्या अपरिचित योद्धय़ाला नमन करण्यासाठी व रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सटाण्याची वाट पकडायलाच हवी.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2017 2:19 am

Web Title: ancient pimpleshwar temple
Next Stories
1 तुंगारेश्वर
2 सांतिआगो द कॉम्पोस्टेलाची वारी
3 लोक पर्यटन : येलघोल लेणी
Just Now!
X