18 February 2020

News Flash

चिंब भटकंती : भोरगिरी-भीमाशंकर

 पावसाळ्यात छोटेखानी आणि सर्वाना जमेल असा ट्रेक करायचा असेल तर भोरगिरीला जायला हवे.

भीमाशंकराच्या मंदिरात पोर्तुगीज घंटा पाहण्याजोगी आहे.

पावसाळ्यात छोटेखानी आणि सर्वाना जमेल असा ट्रेक करायचा असेल तर भोरगिरीला जायला हवे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात एका टोकाला अत्यंत टुमदार, छोटंसं आणि निवांत गाव वसलेलं आहे ते म्हणजे भोरगिरी. पुणे-राजगुरुनगर-वाडा-टोकावडे-भोरगिरी असा फक्त ९० किलोमीटरचा प्रवास. भोरगिरी गावात रस्ताच संपतो. एक सुंदर कोटेश्वर मंदिर आहे इथे. त्याच्या दारातच असलेली पाश्चिमात्य पेहेराव केलेली गणपतीची मूर्ती अगदी निराळी आहे. उजव्या बाजूला डोंगरावर भोरगिरीचा किल्ला आहे. इथून पायवाटेने भीमाशंकर फक्त सहा किलोमीटरवर आहे. चांगला रुंद मार्ग, वाटेत विविध ओढे, ओहोळ आडवे येतात. पावसाळ्यात हा परिसर कधी ढगांनी भरून जातो. रस्ता छान वळत वळत भीमाशंकरच्या जंगलात जातो. आपण नेहेमी जातो त्याच्या विरुद्ध दिशेने भीमाशंकरला जाऊन पोहोचतो. इथले जंगल खूप सुंदर आहे. अगदी रमतगमत गेले तरी दोन तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. खूप पाउस पडत असेल तर काहीसा वेळ जास्त लागेल कारण वाटेत काही ओढे आडवे येतात ते पार करायला वेळ लागतो. वाटेत असंख्य धबधब्यांची मालिका पाहता येते. भीमाशंकरचे दर्शन घेऊन परत पुण्याला परतायचे. भीमाशंकराच्या मंदिरात पोर्तुगीज घंटा पाहण्याजोगी आहे. शक्यतो श्रावण महिना टाळावा कारण भीमाशंकर हे प्रसिद्ध बारा ज्योतिìलगांपकी एक असल्यामुळे श्रावण महिन्यात अतोनात गर्दी असते.

जरंडेश्वर

चिंब भटकंतीला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नसतात. भटकायची ऊर्मी आणि पायात बळ असेल तर अक्षरश शेकडो ठिकाणं आपली वाट बघत उभी असल्याचं बघायला मिळतं. साताऱ्याजवळ डोंगरावर एक असंच सुंदर ठिकाण आपली वाट बघते आहे. ऐन पावसाळ्यात इथे मुद्दाम जायला हवे. खरं तर कोणत्याही नावापुढे ‘श्वर’ आलं की समजावं हे हमखास शंकराचे देवस्थान असणार. पण या नियमाला अपवाद असणारे एक नितांत सुंदर गिरिस्थान साताऱ्याच्या अगदी जवळ आहे ते म्हणजे श्रीजरंडेश्वर. साताऱ्याच्या पूर्वेला १२ किलोमीटरवर हे स्थान वसलेले आहे. माथ्यावर पोहोचण्यासाठी जवळजवळ एक हजार पायऱ्या चढून जाव्या लागतात. पावसाळ्यात या पायऱ्या चढून जायचे श्रम अजिबात जाणवत नाहीत. जरंडेश्वराच्या डोंगरावर असंख्य रानफुले फुललेली दिसतात. माथ्यावरील मंदिरात बलभीम हनुमानाची मूर्ती आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मारुतीच्या या देवळाच्या मागे प्रभू रामचंद्रांचे मंदिर आहे. या ठिकाणाचे वैशिष्टय़ असे सांगतात की रामायणात लक्ष्मण जेव्हा मूíच्छत होऊन पडला तेव्हा त्यासाठी हनुमंताने हिमालयातून संजीवनी वनस्पतीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. वाटेत त्या पर्वताचा एक तुकडा खाली पडला आणि तो म्हणजेच हा जरंडेश्वराचा डोंगर अशी या ठिकाणची कथा प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या डोंगरावर आजही अनेक औषधी वनस्पती बघायला मिळतात. मारुती मंदिराजवळच खालच्या बाजूला समर्थाच्या पादुका असणारी घळ आहे. डोंगरावरील टाक्यांमधील पाणी स्वच्छ आणि थंडगार असते. पावसाळ्यामध्ये असंख्य रानफुलांनी नटलेला हा डोंगर आवर्जून पाहण्याजोगा असतो.

गंभीरनाथ

ऐन पावसाळ्यात पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील खंडाळा घाट खरोखरच बघण्यासारखा असतो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून कोसळणाऱ्या असंख्य धबधब्यांची मालिकाच इथे पाहायला मिळते. डय़ुक्स नोज, राजमाचीचा किल्ला, ढाक बहिरीचा सुळका अशी अनेक ठिकाणं या घाटाच्या आसपास दिसतात. पावसाळ्यात चिंब भिजायला असेच एक वेगळे पण खूप मस्त ठिकाण याच घाटात आहे ते म्हणजे गंभीरनाथाची गुहा! मंकी हिल आणि ठाकरवाडीच्या मध्ये १६व्या आणि १७व्या बोगद्याच्या वर डोंगरात कातळात खोदलेली एक गुहा आहे. तीच ही गंभीरनाथाची गुहा. पुण्याकडून जाताना सगळ्या रेल्वेगाडय़ा ठाकरवाडीला तांत्रिक थांबा म्हणून थांबतात. इथे खाली उतरले की रेल्वे रुळावरून थोडे चालत जावे लागते. तिथे काळजीपूर्वक जायला हवे. तिथून पुढे डोंगरावर जायला एक पाऊलवाट दिसते. त्याने वर चढायचे. गुहेचे तोंड मात्र रेल्वे रुळाच्या विरुद्ध बाजूला आहे. त्यामुळे त्या डोंगराला वळसा घालून मागच्या बाजूला जावे लागते. गुहेच्या तोंडाशीच एक वादकाची मूर्ती दिसते. आणि जवळच एक पाण्याचे कुंडही  आहे. गुहेत अंदाजे पंचवीस-तीस माणसे बसतील एवढी जागा आहे. गुहेच्या आतल्या भागात एका कोनाडेवजा खिडकीतून अजून आत गेले की गंभीरनाथाची बठी मूर्ती आहे. पावसाळ्यात इथून सगळाच परिसर अतिशय रम्य दिसतो. धुक्याने आच्छादलेले डोंगर, त्यावरून पडणारे जलप्रपात, मधूनच घाटातून जाणारी रेल्वेगाडी आणि सर्वत्र फुललेली रानफुले हा सगळाच नजारा अतिशय रमणीय असतो. लोणावळा, खंडाळा या गर्दीच्या जागा टाळून थोडी वेगळी वाट पकडायची असेल तर हे ठिकाण अगदी अप्रतिम आहे.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

First Published on August 9, 2017 5:02 am

Web Title: bhorgiri village in khed taluka of pune
Next Stories
1 परिकथेतली मत्स्यकन्या           
2 वन पर्यटन : अंबाबरवा अभयारण्य
3 डभोईचा किल्ला
Just Now!
X