News Flash

भुवनेश्वरची देखणी मंदिरे

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात पाय सोडून निवांत वसलेले राज्य म्हणजे ओडिशा.

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये शिल्पकृतींनी ओतप्रोत भरलेली अनेक मंदिरे आहेत

ओडिशा म्हटले की कोणार्कचे सूर्यमंदिर, पुरीचे जगन्नाथाचे मंदिर डोळ्यासमोर येते. पण, ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये शिल्पकृतींनी ओतप्रोत भरलेली अनेक मंदिरे आहेत. या शिल्पाविष्कारांचा अनुभव घ्यायला हवा.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात पाय सोडून निवांत वसलेले राज्य म्हणजे ओडिशा. त्याची राजधानी असलेल्या भुवनेश्वरला मंदिरांची नगरी असे म्हणतात. कोणार्कचे सूर्यमंदिर, पुरीचे जगन्नाथाचे मंदिर आणि भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराज मंदिर ही जरी ओडिशाची अनमोल रत्ने असली, तरीसुद्धा भुवनेश्वर या राजधानीच्या शहरात असंख्य मंदिरे आजही मोठय़ा दिमाखात उभी आहेत. यातल्या प्रत्येकाचे काहीना काही वेगळेपण आहे. स्थापत्यशास्त्रातील कलिंगशैलीमध्ये बांधलेली ही मंदिरे काहीशी निराळी दिसतात. त्यांची शिखरे आपले लक्ष वेधून घेतात. ही मंदिरे म्हणजे अभ्यासकांसाठी जरी एक मोठा खजिना असला तरी सर्वसामान्य पर्यटकानेसुद्धा आवर्जून काही वेळ देऊन ही मंदिरे बघावीत, त्यावरील मूर्तिकाम बघावे आणि त्याची काहीशी निराळी अशी स्थापत्यरचना अनुभवावी.

ओडिशाच्या मंदिर स्थापत्यामधील सर्वात प्राचीन शैलीचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर म्हणून परशुरामेश्वर मंदिराकडे पाहिले पाहिजे. पश्चिम दिशेकडे तोंड असलेल्या या मंदिराची निर्मिती इ.स.च्या ७ व्या शतकामध्ये झाली असे मानले जाते. मंदिराला चारही बाजूंनी सुंदर प्राकारभिंत आहे. जगमोहनावर म्हणजेच सभामंडपावर बांधलेल्या शिखराला ओडिशामधे पिढा देऊळ असं म्हणतात. या ठिकाणी जगमोहनावर पिढा देऊळ बांधलेले नाही. म्हणजेच ती शैली विकसित होण्याच्या आधीच्या काळातील हे मंदिर आहे. तसेच ओडिशातील मंदिरात दिसणारे नृत्यमंडप आणि भोगमंडप हेसुद्धा या ठिकाणी दिसत नाहीत. फक्त गर्भगृह आणि जगमोहन एवढेच या देवळाचे स्वरूप आहे. छोटेखानी पण अत्यंत सुबक असे हे मंदिर त्यावरील विविध मूर्तींसाठी पाहावे असे आहे. या मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत यातील अनेक प्रसंग कोरलेले दिसतात. अग्नी, यम, वरुण हे दिक्पाल, तसेच गंगा-यमुना, शिवपार्वती, अर्धनारीश्वर, सप्तमातृका, महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती तर अफलातून आहेत. गर्भगृहाच्या मागील भिंतीवर असलेली पाश्र्वदेवता ही इथे कार्तिकेय आहे. त्याचे वाहन मोर इथे दाखवले आहेच; पण तो मोर आपल्या पायांनी सापाला मारतो आहे याचे शिल्पांकन अगदी हुबेहूब केलंय.

दुसरे असेच मंदिर म्हणजे वेताळ मंदिर. हे मंदिर इ.स.च्या ८ व्या शतकात बांधले गेले. या मंदिराचे स्वरूप काहीसे अर्धगोलाकार म्हणजे चैत्यगृहासारखे असून याचे कळसावर खाखरा शैलीतील तीन शिखरे असल्यामुळे याला तीन मुंडिया देऊळ असं स्थानिक लोक म्हणतात. खाखरा शैलीमधील हे शिखर बघितल्यावर दक्षिणेतल्या द्राविड शिखराची आठवण होते. अगदी छोटासा आणि आटोपशीर पसारा असलेलं हे मंदिर ऐन गाव भागात आहे. परशुरामेश्वर मंदिरापेक्षा या मंदिरावरील शिल्पे जास्त नाजूक आणि सुबक असल्याचे जाणवते. गर्भगृह मात्र काहीसे गूढ वाटते. आतमधे आठ हाताची अत्यंत उग्र अन् भयावह दिसणारी चामुंडेची मूर्ती असून या देवीला स्थानिक मंडळी कपालिनी असे म्हणतात. ही देवी चामुंडा ही या तांत्रिक पंथियांची उपासना देवता असावी. कापालिक हा एक तंत्रमार्गी पंथ होता. या पंथामधील साधक कवटी जवळ बाळगत असत आणि त्यामध्ये वस्तू ठेवत असत. सर्वसामान्य जनतेला भीती वाटावी अशीच यांची उपासना पद्धत होती. अतिशय भेसुर अशा या चामुंडेसोबत वीरभद्र आणि इतर सहा मातृकांची शिल्पे बघायला मिळतात. तसेच तिच्या उजवीकडे गणपती आहे. मंदिरावर असलेली सूर्यमूर्ती फारच सुरेख आहे. आपल्या या आगळ्यावेगळ्या शिखर शैलीमुळे हे मंदिर लांबूनही उठून दिसते. वेताळ मंदिराच्याच आवारात अजून एक मंदिर बांधलेले दिसते आणि ते म्हणजे शिशिरेश्वर मंदिर असून, त्यावर असलेल्या अर्धनारीश्वर, हरिहर याचसोबत लकुलीश आणि कामदेवाच्या मूर्ती देखण्या आहेत. लकुलीश हा शैव पंथातील पाशुपत संप्रदायाचा संस्थापक समजला जातो. इथे लकुलीश हा धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये दिसतो. अशी मुद्रा ही शक्यतो गौतम बुद्धाची दाखवली जाते. ही मूर्ती पाहिल्यावर तत्कालीन मूर्तिशास्त्रवर बौद्ध तत्त्वज्ञानाचा पडलेला प्रभाव अगदी प्रकर्षांने जाणवतो. मुक्तेश्वर मंदिर म्हणजे ओडिशा शैलीतील सवरेत्कृष्ट मंदिर आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मंदिर आकाराने लहान असले तरीसुद्धा कळसाला पोहोचलेल्या मंदिर स्थापत्यशैलीचा हा एक अजोड नमुना. याच्या रचनेत सुबकता आणि मार्दव असून हे खालपासून वपर्यंत शिल्पसौंदर्याने नटलेले आहे. शिल्पकृतींनी ओतप्रोत भरलेले मंदिर इ. स.च्या १० व्या शतकात बांधले गेले. परशुराम मंदिराच्या मागेच अतिशय सुंदर आणि टुमदार असे मुक्तेश्वर मंदिर आहे. मंदिराला प्राकारभिंत असून आत जाण्यासाठी इथे असलेली दगडी कमान अप्रतिम आहे. इतर कुठल्या मंदिरांना अशी कमान दिसत नाही. यामुळे हे मंदिर फारच सुंदर दिसते. मंदिराच्या बाजूने प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्ग असून तिथून चालताना मंदिरावरील खूपच सुंदर मूर्ती बघता येतात.

हजारो मंदिरे असलेल्या या भुवनेश्वर नगरीमध्ये ही देखणी मंदिरे आजही मोठय़ा दिमाखात उभी आहेत. या देशी शैव संप्रदाय किती खोलवर रुजला होता याचे प्रतीक म्हणजे ही मंदिरे होत. इथे असलेली मंदिरे ही सर्व शिवमंदिरे आहेत. अपवाद फक्त अनंत वासुदेव मंदिर. एवढे एकच मंदिर विष्णूचे, बाकी सर्व मंदिरे शिवाची. इतकी समृद्ध परंपरा आपल्याला लाभलेली आहे आणि ती पाहण्यासाठी कुठलीही, कोणाचीही परवानगी लागत नाही ही फार मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे. इथली काही मंदिरे ही पुरातत्त्व विभागाने अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवली आहेत. त्यांच्यासभोवती सुंदर अशा बागा तयार केल्या आहेत. त्या हिरव्यागार बागांच्या मध्ये उंच गेलेले मंदिरांचे कळस आपले लक्ष वेधून घेतात. देखणे आणि सुंदर असे एखादे मंदिर आपले स्वागत करत असते. आपले पाय सहजच तिकडे वळतात. आतमधे गेल्यावर तिथल्या स्थापत्याने आणि त्या मंदिरावरील अतिशय सुंदर, देखण्या शिल्पाविष्काराने आपले देहभान हरपते. काळ-वेळ विसरून आपण त्या मंदिराशी अगदी एकरूप होऊन जातो.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2017 12:17 am

Web Title: many temples with sculptures in bhubaneswar
Next Stories
1 वन पर्यटन : लोणार वन्यजीव अभयारण्य
2 फेस्टिव्ह टुरिझम : राजस्थानचे महोत्सव
3 भूतानचे पक्षीवैभव
Just Now!
X