फिल्म टुरिझमची संकल्पना वेगळ्या प्रकारे प्रत्यक्षात राबवून पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरलेल्या हैद्रबाद येथील प्रसिद्ध ‘रामोजी फिल्मसिटी’चा खास ‘समर कार्निव्हल’ याहीवर्षी धमाल मस्तीत सुरू झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे कार्निव्हल पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. मात्र आपल्याकडे गोवा सोडले तर कार्निव्हलची मजा फारशी अनुभवता येत नाही. लोकांच्या मनात कार्निव्हलबद्दल असलेली उत्सुकता लक्षात घेऊनच ‘रामोजी फिल्मसिटी’ने दरवर्षी ‘समर कार्निव्हल’ची सुरुवात केली. बच्चेकंपनीची उन्हाळी सुट्टी लक्षात घेऊन ५३ दिवस या ‘समर कार्निव्हल’चे आयोजन केले जाते. यावर्षीदेखील ‘रामोजी फिल्मसिटी’त या कार्निव्हलला जोरदार सुरुवात झाली आहे.

भव्य-दिव्य फिल्मसेट्स, म्हैसूरच्या वृंदावन गार्डनपासून अनेक प्रसिद्ध ठिकाणच्या प्रतिकृती, तंत्राच्या करामतीने साधलेले शोज, लाइव्ह सादरीकरण अशा मनोरंजनाचा पेटारा असलेली ‘रामोजी फिल्मसिटी’ कार्निव्हलच्या काळात दिव्यांच्या प्रकाशाने आणखीनच उजळून निघते. फिल्मसिटीची सफर आणि रात्री होणारी कार्निव्हल परेड, कार्निव्हलसाठी वेगवेगळ्या थीमनुसार रचलेले फ्लोट्स, लांब लांब कांठय़ावर चालणारे विदूषक, पऱ्या अशी खासी कार्निव्हल परेड संपूर्ण फिल्मसिटीतून फिरते. या कार्निव्हलची मजा वर्षांतून एकदाच या उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवता येते. ‘रामोजी फिल्मसिटी’चा हा खास ‘समर कार्निव्हल’ महिना-दीड महिना अनुभवता येणार आहे.

गोवा फूड फेस्टिव्हल

गोव्याची खाद्यसंस्कृति आणि धम्माल संगीताने नटलेला असा गोवा फूड आणि कल्चर फेस्टिव्हल १० ते १४ मे या काळात रंगणार आहे. पणजी येथील डी. बी. बांदोडकर मैदानावर होणारा हा फेस्टिव्हल पर्यटकांसाठी खास आकर्षण असणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील अनेक बॅण्ड या महोत्सवात भाग घेणार आहेतच, पण त्याचबरोबर स्थानिक पातळीवर कलाकारांच्या सादरीकरणाचा अनुभव घेता येणार आहे. गोव्यातील अनेक प्रसिद्ध रेस्टॉरन्टसच्या स्टॉलवर खास गोवन पदार्थाचा आनंद पर्यटकांना घेता येईल. गोवा पर्यटन महामंडळ यांच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन मागील वर्षांपासून केले जात आहे.

आवाहन

लोक पर्यटन : कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी. कदाचित ते सर्वाना फारसं माहितदेखील नसेल. अशा ठिकाणाला आपण भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत छायाचित्रासह पाठवून द्या.

आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.

ई-मेल – lokbhramanti@gmail.com