गिअर्सची माहिती करून घेताना आपण आतापर्यंत शिफ्टर्स, कसेट्स, फ्रीव्हिल्स, ड्राइव्हट्रेन, केडन्सविषयी माहिती करून घेतली. आज आपण या सगळ्यासोबत गिअर बदलण्यात सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डिरेलरबद्दल माहिती करून घेणार आहोत. खरंतर डिरेलरचं संपूर्ण कार्य कसं चालतं आणि त्याचे वेगवेगळे भाग कोणते याविषयी जाणून घेण्यात वेगळी गंमत आहे. पण ते सर्वच इथे सांगत बसलो तर ते खूप तांत्रिक होईल आणि किचकट वाटेल. त्यामुळे त्याची प्राथमिक माहिती आणि गिअर्सचा वापर कसा करावा याविषयी पाहूया. पण त्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं, डिरेलर हा असा भाग आहे ज्या विषयी माहिती नसल्यास त्याला हात लावू नये. कारण गिअरच्या सायकलमध्ये डिरेलरला काही इजा झाली तर मनस्ताप होण्याची, आíथक फटका बसण्याची शक्यता असते. म्हणून त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. लांबच्या सायकल प्रवासादरम्यान सायकलची वाहतूक इतर वाहनांमधून करताना डिरेलर सुरक्षित राहील हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. तसंच काही झाल्यास दुरुस्तीसुद्धा खात्रीलायक मेकॅनिककडूनच करून घ्यावी.
डिरेलर हा शब्द १९३० मध्ये पहिल्यांदा वापरला गेल्याच्या नोंदी सापडतात. हा फ्रेंच शब्द आहे. ट्रेन रुळावरून घसरल्याच्या क्रियेला इंग्रजीमध्ये डिरेलमेंट असं म्हणतात आणि त्यावरूनच हा शब्द आला आहे. म्हणजे आपल्या सायकलमध्येही गिअर्स बदलताना वरच्या दातेरी चक्रीवरून चेन खालच्या चक्रीवर येते, तसंच. पूर्वी रस्त्यावरील शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या सायकलींना ‘क्लब’ किंवा ‘डिरेलर’ असंही म्हटलं जायचं. आजच्या आधुनिक सायकलींप्रमाणे त्यासुद्धा वजनाने हलक्या असत. जगप्रसिद्ध टूर-दि-फ्रान्स या सायकल स्पध्रेत १९३७ मध्ये डिरेलरची प्रणाली पहिल्यांदा वापरली गेली.
सायकलची चेन वेगवेगळ्या आकाराच्या दातेरी चकत्यांवर चढवण्यासाठी आणि उतरवण्याची (गिअर्स बदलण्यासाठी) एक प्रणाली आहे. त्या प्रणालीमध्ये जो सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो त्या भागाला डिरेलर असं म्हणतात. सायकलला दोन ठिकाणी डिरेलर असतात. पेडलपाशी असणारा (फ्रन्ट) डिरेलर, जो क्रँकमधील दोन (किंवा तीन) दातेरी चकत्यांसाठी चढ-उतारासाठी मदत करतो. दुसरा मागच्या चाकाजवळ असणारा (रिअर) डिरेलर. तो मागचे गिअर्स चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी साहाय्य करतो. हँगर बोल्ट, लिमिट अडजेिस्टग स्क्रू, केबल बॅरल अ‍ॅडजेस्टर, केबल अँकर बोल्ट, केज प्लेट, पुली बोल्ट, आयडलर लोव्हर पुली व्हिल, जॉकी अप्पर पुली व्हील इ. भागांचा मिळून रिअर डिरेलर तयार होतो. तर फ्रन्ट डिरेलरमध्ये केबल अँकर बोल्ट, केज, केज प्लेट्स, केज स्क्रू, आऊटर आर्म, क्लॅम्प बॅन्ड, बॉडी, लिमिट अ‍ॅडजेस्टमेंट स्क्रू इ. भाग असतात.
चढावावर चढताना
अनेकदा प्रश्न विचारला जातो की, चढ चढताना गिअर्सचं कॉम्बिनेशन काय असावं? पण खरं तर असं काही ठरावीक मोजमाप नाही. कारण त्यासाठी चढ कोणत्या प्रकारचा आहे, रस्ता कसा आहे, सायकलला किती गिअर्स आहेत, सायकल कोणत्या प्रकारची आहे, इ. अनेक गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात. गिअर्स हे फक्त तुमच्या पायावरचा ताण थोडा हलका करण्यासाठी आहेत. तुमचे पाय चांगले सरावले आणि गिअर्सची सायकल असल्यास कोणत्या प्रकारच्या चढावर कोणतं गिअर कॉम्बिनेशन लागू पडतं हे एकदा कळलं की चढ चढवणं फारसं कठीण जात नाही.

गिअर्सचा वापर कसा करावा?
सायकल थांबलेली असताना कधीही गिअर्स बदलू नयेत. कारण त्यानंतर तुम्ही जेव्हा सायकल चालवायला सुरुवात कराल तेव्हा चेन सटकण्याची भीती असते.
सायकल चालवताना मागचे आणि पुढचे गिअर्स एकाच वेळी बदलू नयेत. आवश्यकतेनुसार आधी पुढचा आणि मग मागचा गिअर बदलावा किंवा उलट करावे.
गिअर्स बदलताना एक एक करून तो चढवावा किंवा उतरवावा. खटाखट गिअर्स बदलू नये.
गिअर्सच्या योग्य वापरासाठी रस्त्याचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे. चढण किंवा उतारावर गिअर्स बदलण्याआधी पुढे रस्ता कसा दिसतोय याचा आगाऊ अंदाज घ्या आणि त्यानुसार गिअर्स बदलण्याचा निर्णय घ्या.
पायावर आणि सायकलच्या चेनवर ताण येण्याआधीच गिअर्स बदला. (तो अनुभव तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रस्स्त्यांवर सायकलिंग करून येईल.)
जोर लावून गिअर्स बदलण्याचा प्रयत्न करून नये. त्याने गिअर्स शिफ्टर्स आणि गिअर्स वायर तुटण्याची शक्यता असते.
चिखलातून किंवा वाळूमधून सायकल चालवण्याचा प्रसंग आल्यास, रस्ता संपल्यावर लागलीच पाण्याचा किंवा ब्रशचा वापर करून गिअर्स जेथे जोडलेले असतात त्यावरून माती स्वच्छ करावी. जेणेकरून ते बदलताना खूप त्रास होणार नाही आणि माती अधिक खोलात जाऊन बसणार नाही.

चढ आणि उतार
चढ चढताना आणि उतरतानाही गिअर्स बदलता येतात. गरजेनुसार ते बदलावेत.
तीव्र चढ चढवताना सुरुवातीपासून चढाचा अंदाज घेऊन गिअर्स बदलायला घेतले तर गरज पडल्यास अचानक आलेल्या अतितीव्र चढावरही गिअर्स बदलणं फारसं कठीण जात नाही.
चढ संपवून माथ्यावर पोहचल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावेळी सर्व गिअर्स एकाच वेळी उतरवू नयेत. एक एक करून गिअर उतरवावा.
उतारावर गिअर्स उतरवलेले असावेत. नाहीतर उतार संपल्यावर येणाऱ्या सपाट रस्त्यावर गतिशील पेडलला पेडलिंग करणं कठीण जातं आणि पाय सटकण्याची शक्यता असते.
तीव्र उतारावर पेडलिंग करणं गरजेचं नसलं तरी सायकलवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाय पेडलवर ठेवणं आणि अधूनमधून पेडलिंग करणं खूप आवश्यक आहे.
उतारावर पाय हवेत मोकळे सोडून देऊ नयेत.
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com