सह्यद्रीत भटकंती करताना नित्य नवे अनुभव येतात. नाशिक जिल्ह्यतील सटाणा तालुक्यातील अजमेरा हा तसा अपरिचित किल्ला. पायथ्याच्या पहाडेश्वर मंदिराजवळून गड चढायला सुरुवात केली, पण पायवाट अशी नव्हतीच. जीव मुठीत घेऊन घसाऱ्यावरून खाली सरकत वर चढत होतो. गडाच्या अध्र्या उंचीवर असलेल्या पठाराजवळ आल्यावर वाद्याचे कर्णमधुर सूर ऐकू येऊ लागले. आमची उत्सुकता ताणली गेली आणि आम्ही पटकन पठार गाठले. तिथे एक माणूस विचित्र वाद्य वाजवत होता. हे वाद्य आदिवासी तारपा वाद्यासारखे दिसत असले तरी वेगळेच होते. त्या वादकाचे नाव होते युवराज वाघ. महादेव कोळी समाजाचा हा तरुण मूळचा देवळाणे गावचा. पण खंडाने शेती कसण्यासाठी तो पहाडेश्वरला राहायला आला होता. त्याच्या हातात जे वाद्य होते ते वाद्य त्याने स्वत: बनवले होते. त्याचे नाव त्याने ‘पावरा’ असे सांगितले. पावराचा पहिला फुगीर भाग भोपळा कोरून त्यापासून बनवलेला होता. त्या भोपळ्याला पुढे साधारण सहा इंचांच्या बांबूच्या दोन नळ्या बसवलेल्या होत्या. त्याला बासरीवर असतात तशी तीन भोके होती. त्या बांबूच्या नळ्यांच्या दुसऱ्या टोकाला बलाचे शिंग जोडलेले होते. त्या िशगाच्या वर अ‍ॅल्युमिनियमचा दोन इंचभर पत्रा गुंडाळलेला होता. हे वेगवेगळे भाग जोडण्यासाठी त्याने मधमाश्यांच्या पोळ्यातून मिळालेले मेण वापरलेले होते. भोपळ्याच्या जवळ अजून एक कमानदार भोपळा जोडलेला असून, त्यावर झालर असलेले रंगीत कापड आणि गोंडे लावून वाद्य सजवण्यात आले होते. या वाद्याच्या जोरावर तो आजूबाजूच्या परिसरात लग्न, धार्मिक विधीत वाजवण्याच्या सुपाऱ्या घेतो, असे त्याने सांगितले. वेगवेगळ्या कार्यात वाजवल्या जाणाऱ्या सुरावटी त्याने आम्हाला ऐकवल्या. पावरा वाजवताना त्या भोपळ्यात तोंड घालून पूर्ण ताकदीने फुंकावे लागते. अशा प्रकारे फुंकताना त्याचे गाल फुगीर होत. जबडय़ाच्या नसा ताणल्या जात. त्याच वेळी त्याची बोट सराईतपणे बांबूच्या नळीवरील भोकावरून फिरत त्यातून ती मधुर सुरावट निघत होती. एकूण काम ताकदीचे होते. आम्ही त्यांना विनंती केल्यावर पुढची वाट दाखवायला ते तयार झाले. आपला पावरा वाजवत त्यांनी किल्ला चढायला सुरुवात केली. त्या सुरावटींवर पावले टाकत आमचा सुरमयी प्रवास चालू झाला.

अमित सामंत amitssam9@gmail.com