वाळवंटातील जहाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंटासाठी हा खास महोत्सव दरवर्षी जानेवारी -फेब्रुवारीमध्ये साजरा केला जातो. यंदा १४-१५ जानेवारीला बिकानेर येथे हा कॅमल फेस्टिव्हल होणार आहे. उंटाची लोकर काढून त्यापासून विविध वस्तू तयार करणे, उंटांची स्पर्धा, उंटांचे विविध कलागुणदर्शन, त्यांची शानदार मिरवणूक अशा उपक्रमांचा यामध्ये समावेश असतो. सुंदर रंगीबेरंगी अशा वस्त्रांनी हे उंट सजवले जातात. जुनागढ किल्ल्याच्या लालभडक पाश्र्वभूमीवर हे सारे खूप उठून दिसते. पारंपरिक राजस्थानी नृत्याचा कार्यक्रम, नयनरम्य रोषणाई आणि शोभेच्या दारूची आतषबाजी असा सर्व धम्माल माहोल या काळात येथे असतो. वाळवंटात एक प्रकारे चैतन्य आलेले असते. पाठोपाठ १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणारी नागपूर जत्रा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची जत्रा आहे. या ठिकाणी जनावरांचा मोठा बाजार या काळात होत असल्यामुळे नागपूर जनावर जत्रा म्हणूनदेखील ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. सुमारे ७० हजार जनावरांचा व्यापार या दरम्यान केला जातो. बैल, उंट, घोडे अशा जनावरांचा त्यात समावेश असतो. भरजरी उंची वस्त्रांनी ही जनावरं सजवलेली असतात, तर त्यांचे मालकदेखील पारंपरिक रंगीबेरंगी पोशाखात या जत्रेत सहभागी होतात. त्याशिवाय मसाल्यांचा मोठा व्यापार या काळात होत असतो.