गौताळा औट्रमघाट अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यच्या सीमेवर वसलेले आहे. औरंगाबादपासून ६५ किलोमीटरवर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे. विविध प्रजातींची वृक्षराजी, प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले २६१ चौ. किमीचे हे क्षेत्र महाराष्ट्र सरकारने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी अभयारण्य म्हणून घोषित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभयारण्य कन्नड गावापासून १५ किलोमीटरवर तर चाळीसगावपासून २० किलोमीटरवर आहे. कन्नडहून दोन किलोमीटरवर पुढे गेल्यानंतर एक फाटा लागतो. तिथून आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ जातो. अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू, पळस, रानिपपळ, रानशेवगा, कडुिनब, चिंच असे वृक्ष आहेत तर तळ्यात पाणडुबा, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतो. तेथून आपण साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा, िपपळ, पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन, शेवग्याची झाडे, प्राणी, पक्षी पाहू शकतो. अभयारण्यात बिबटय़ा, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर यांसह इतर ५४ प्रजातींचे प्राणी तर २३० प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद आहे.

प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्याची कुटी, पुरातन मंदिरे, लेणी, महादेव मंदिर, हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर, केदारकुंड, सीताखोरे आणि धवल तीर्थ धबधबा अशा विविध स्थळांनी पर्यटकांना भुरळ घातल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो. या डोंगरातून नागद नदी उगम पावते आणि उजवीकडे भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलीकडे मांजरमाळ डोंगर दिसतो.

या अभयारण्याजवळ पाटणा येथे निकुंभ राजवंशानी बांधलेले बाराव्या शतकातील पुरातन मंदिर आहे. चंडिकादेवी मंदिरापासून काही मीटर अंतरावर गणित आणि खगोलतज्ज्ञ भास्कराचार्याचे पीठ आहे. पाटणदेवीच्या हिवरखेडा प्रवेशद्वारातून पर्यटक अभयारण्यात प्रवेश करू शकतात. पुरणवाडी आणि पाटणादेवी येथे वन विभागाची विश्रांतीगृहेही पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत. गौताळा औट्रमघाट अभयारण्य हे मराठवाडय़ातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.

हे वन मंदिरे पुरातत्त्वीय संपदेने समृद्ध आहे. कन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर चंदन नाला लागतो. तिथे मोर-पोपट यांसह सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबूल, कोतवाल, चंडोल असे विविध रंगाचे पशुपक्षी दिसतात. या नाल्यानंतर दाट जंगल सुरू होते. पुढे एक मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. या परिसरात पूर्वी गवळी लोक राहायचे, त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या त्यावरून या तलावाला गौताळा तलाव असे नाव पडले पुढे हेच नाव या अभयारण्यालाही मिळाले.

औरंगाबाद-कन्नड रोडला डावीकडे पितळखोरा  लेणी आहेत. सह्यद्री पर्वताच्या सातमाळ डोंगररांगात कोरलेल्या या लेणीही पर्यटकांना आकर्षति करतात. गौताळा तलावाच्या पुढे एक ऊंच टेकडी आहे. या टेकडीवर एक गुहा आहे. त्यात एक पाण्याची टाकी आहे. गुहेत गौतम ऋषींची दगडी मूर्ती आहे. या गुहेत गौतम ऋषींनी तप केले असे म्हटले जाते. यामुळेच या टेकडीला गौतम टेकडी असं देखील म्हणतात.

कधी जाल?

जुलै ते जानेवारी हा कालावधी उत्तम. जवळचे शहर- चाळीस गाव- २० किमी, कन्नड- १५ किमी.

विमानतळ- औरंगबाद- ७५ किमी

रेल्वे स्थानक- चाळीसगाव –

२० किमी, औरंगाबाद- ६५ किमी

जवळची प्रेक्षणीय स्थळे- औरंगाबाद- मकबरा, पाणचक्की, खुलताबाद. दौलताबाद, अजिंठा वेरुळ, भद्रामारुती, औरंगाबाद लेणी, सोनेरी महल

drsurekha.mulay@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautala autramghat sanctuary
First published on: 15-03-2017 at 01:57 IST