मालेगाव : दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात टंचाईने उग्र स्वरुप धारण केले असून तालुक्यातील झोडगे येथे टंचाईने मायलेकीचा बळी गेला. पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोघींचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
नीताबाई जाधव (४७) आणि इच्छामणी जाधव (१६) अशी मायलेकींची नावे आहेत. मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागात टंचाई अधिक तीव्र आहे. माळमाथ्यावरील झोडगे परिसरात २० दिवसांनी पिण्याचा पाणी पुरवठा होत आहे. गावातील बहुसंख्य विहिरींनी तळ गाठला असून ज्या विहिरींमध्ये थोडे पाणी उपलब्ध आहे, तिथे गावातील महिलांना भांडी, कपडे धुण्यासाठी जावे लागते. पशुपालकांनाही शेतशिवारातील विहिरींवर जाऊन जनावरांची तहान भागवावी लागत आहे.
हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?
नीताबाई आणि त्यांची मुलगी इच्छामणी या झोडगे शिवारातील एका विहिरीवर धुणे धुण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. काही वेळाने या मायलेकी विहिरीत पडल्याचे तेथून जाणाऱ्या मेंढपाळ महिलेच्या लक्षात आले. या महिलेने माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. मदतकार्यास विलंब झाल्याने दोघींना वाचवण्यात यश आले नाही.
मायलेकी विहिरीत कशा पडल्या, याची निश्चित माहिती पोलिसांकडेही नाही. दोर बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरल्याने आधी दोघींपैकी एक पाण्यात पडली असावी, तिला वाचविण्यासाठी दुसरीने विहिरीत उडी घेतली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.