निसर्ग आणि मानव यांच्या द्वैतातून तयार झालेल्या प्रथा-परंपरा, प्राचीन काळापासून त्यांची सणांशी जुळलेली नाळ अशी एक पुरातन संस्कृती आपल्याकडे नांदताना दिसते. काळानुरूप त्यात अनेक बदल होत गेले. कधी कुठे विकृतीचाही शिरकावोाला. पण मूळ विचारधारा आणि त्यामागची भावना तशीच आहे. वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा होळीचा सण त्यापैकीच एक. शहरातून ही होळी काहीशी विकृतीकडे झुकली असली तरी आणि पर्यावरणाला धोका पोहोचवणारा त्यातील वादग्रस्त भाग बाजूला ठेवला तर गावपातळीवर अजूनही अनेक प्रथा-परंपरा मोठय़ा आस्थेने जपल्या जातात. त्यानिमित्ताने महाराष्ट्र, गोवा, पंजाब आणि उत्तरेतील काही ठिकाणच्या होलिकोत्सवाच्या पर्यटनाचा आनंद येत्या होळीच्या सुट्टीत घ्यायला हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकणातील शिमगा

अमित सामंत

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यंत होळीचा सण पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला जातो. या दोन्ही जिल्ह्यांत होळी साजरी करण्याच्या पद्धतीत थोडा फार फरक आहे. सिंधुदुर्गात होळीच्या पूर्वसंध्येला गावाजवळचे आंब्याचे झाड किंवा माडाचे झाड, पोफळीचे झाड निवडले जाते. होळीसाठी कुठले झाड वापरायचे याचीही प्रत्येक गावाची परंपरा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या होळीसाठी पोफळीचे झाड वापरतात. मालवण देऊळवाडय़ातील नारायण मंदिरासमोरील होळीसाठी माडाचे झाड तर घुमडे गावातील होळीसाठी आंब्याचे झाड वापरले जाते. निवडलेल्या झाडाची विधिवत पूजा करून ते झाड तोडून वाजतगाजत मिरवणुकीने ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर आणले जाते. मंदिरासमोर आदल्या वर्षीच्या होळीच्या झाडाचा खूंट असतो. तो बाहेर काढला जातो. त्या ठिकाणी नवीन झाडाचा ओंडका उभारला जातो. त्यावर आंब्याच्या पानांचे तोरण आणि नारळ बांधला जातो. त्या भोवती सुकलेला पालापाचोळा, काटक्या रचून होळी तयार केली जाते. त्यानंतर होळीचे पूजन करून नवेद्य दाखवला जातो आणि खास मालवणी पद्धतीने गाऱ्हाणे घातले जाते. गावकरी होळीला नारळ अर्पण करतात आणि नवस फेडतात. होळीनंतर पाच दिवस ग्रामदैवताचे निशाण गावातील प्रत्येक घरी जाते. तेथे पाटावर ठेवून त्याची पूजा केली जाते, नवेद्य दाखवला जातो. पाचव्या दिवशी निशाण देवळाकडे येते. तिथे त्याची पूजा करून सर्व गावाला प्रसाद वाटला जातो. प्रत्येक गावाच्या प्रथा, परंपरा थोडय़ा फार प्रमाणात वेगळ्या असतात. हनुमान जयंतीला होळीसाठी देवळासमोर उभारलेला ओंडका तोडला जातो.
रत्नागिरीतही साधारणपणे अशाच पद्धतीने होळी साजरी केली जाते. मात्र, खेळे जाणे आणि पालख्या नाचविण्याची प्रथा रत्नागिरीत आढळते. खास गणवेश परिधान केलेले गावागावांतील खेळे होळीआधी साधारण चार-पाच दिवस घराबाहेर पडतात. विशेष म्हणजे हे खेळे अनवाणी असतात. शेजारील गावांतील प्रत्येक घरात डफ, टाळ-मृदुंगाच्या तालावर नाचल्यानंतर होळीच्या पूर्वसंध्येला हे खेळे माघारी परततात. घराच्या अंगणात नाचणाऱ्या खेळ्यांच्या चमूला ओवाळणी घालण्याची प्रथा आहे. त्यातून जमा होणाऱ्या पैशातून पोस्त (पार्टी) केली जाते. त्यातील काही रक्कम खेळ्यांच्या गणवेशासाठी वापरली जाते तर काही रकमेची बचत केली जाते.

कोकणातील होळीसारख्या सणांना हल्ली पर्यटनाची जोड दिली जात असल्याचे चित्र दिसते. पारंपरिक होळीची मजा अनुभवायची असेल तर कोकण हा चांगला पर्याय आहे. सिंधुदुर्ग किल्ला, चिवला, तारकर्ली, देवबाग असे सागर किनारे,  देवबाग बीचवरील वॉटर स्पोर्ट्स , डॉल्फीन सफारी, पक्षी निरीक्षणासाठी धामापूर तलाव, सुवर्ण गणेश मंदिर , घुमडे गावातील घुमडाई मंदिर, आंगणेवाडीतील मंदिर, खरेदीसाठी मालवण बाजारातही पर्यटनाचा आनंद घेता येईल. रत्नागिरी जिल्ह्यत दापोली, गुहागर, आंजर्ले, हर्णे-मुरूड आदी ठिकाणी पर्यटनाच्या सुविधा आहेत.

जाण्यासाठी :- कोकण रेल्वे / एसटी / खासगी वाहनाने कोकणात जाता येते.

राहण्यासाठी :- मालवण, तारकर्ली, दापोली, गुहागर, रत्नागिरीत राहण्याची व जेवणाची सोय होते.

amitssam9@gmail.com

सातपुडय़ाची राजवाडी काठी

नीलेश पवार

संगीत-नृत्य-गाणी यांचा समावेश असलेल्या सातपुडय़ातील होलिकोत्सवाने देशाच्या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्य़ातील होळीचा उत्सव पाहण्यासाठी देशासह विदेशातूनही पर्यटक येत असतात. राज्यात फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून सर्वत्र होलिकोत्सव साजरा केला जात असताना आदिवासी संस्कृतीचा आद्य सण असलेला होलिकोत्सव सातपुडय़ात पाच दिवस साजरा केला जातो. सातपुडय़ातील विविध परिसरांत पंचमीपर्यंत पारंपरिक वाद्य आणि वेशभूषा परिधान करून विविध ठिकाणच्या मानाच्या होळ्या पेटवल्या जातात. त्यातही सर्वाधिक आकर्षण मानाच्या ‘राजवाडी काठी’ होळीचे असते.
साडेसातशे वर्षांपेक्षा अधिकची परंपरा असलेल्या काठी संस्थानच्या राजवाडी होळीचे आकर्षण आजही कायम असून या राजवाडी होळीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक व पर्यटक दरवर्षी येत असतात. आदिवासींचे श्रद्धास्थान असलेला होलिकोत्सवाची सुरुवात भोंगऱ्या बाजाराने होते. होळीच्या आधी येणाऱ्या आठवडे बाजारात पारंपरिक पद्धतीने मानकऱ्याची वेशभूषा करून होलिकोत्सवाच्या सामानाची खरेदी केली जाते. होळीसाठी आदिवासी बाबा, बुवा, डाणका, डोहा आणि बुध्या या प्रतीकांचा पारंपरिक वेश परिधान करून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतात.

संस्थाने कधीच खालसा झाली असली तरी काठी या गावातील तत्कालीन संस्थानिकांच्या पिढय़ांना आजही मान आहे. या संस्थानिकांची होळी म्हणजे राजवाडी होळी होय. होळीच्या तीन ते चार दिवस आधी गुजरातच्या जंगलातून ७० ते ८० फुटाच्या बांबूचा शोध घेऊन तो खांद्यावर काठीपर्यंत आणला जातो. काठीतील वडाच्या झाडाखाली पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. या वेळी काठीचे राजा उमेदसिंह यांच्या राजगादीचीही पूजा करण्यात येते. कोणत्याही साधनांचा वापर न करता आदिवासी हातानेच होळीचा बांबू उभा करण्यासाठी खड्डा करतात. विविध ठिकाणांहून आदिवासी बांधव समूहाने वाद्य वाजवीत नाचत काठी येथे दाखल होत असतात. होळीच्या दिवशी रात्रभर आदिवासी गटागटाने नृत्य करत असतात. होळीचा दांडा पूर्व दिशेला पडल्यास येणारे वर्ष सुखसमृद्धीचे राहील असे मानले जाते.

आदिवासींमध्ये होळीसाठी नवस केला जातो. होळीच्या पाच दिवस आधीपासूनच आदिवासी  ब्रह्मचर्यत्व धारण करतात. खाट अथवा पलंगावर न झोपता जमिनीवर झोपूनच या कार्यकाळात होळीला वंदन केले जाते. मोलगी, जावदा पुनर्वसन, असली, तोरणमाळ, बिलगाव अशा विविध ठिकाणी होणारा पारंपरिक होलिकोत्सव पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे केंद्रिबदू झाला असून जवळपास आठ दिवस ढोल, शिट्टी आणि बिरीज्या तालावर सातपुडा डोलत असतो. यामुळे होळी म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते.

काठीपर्यंत कसे पोहोचाल?

नंदुरबार जिल्ह्य़ातील काठी येथे जाण्यासाठी नंदुरबार, धुळे, नाशिक या ठिकाणांहून रस्तामार्गे जाता येते. धुळ्याहून- शहादा-धडगावमार्गे जवळपास  १५० किलोमीटरचे अंतर कापून काठी गाव गाठता येते. नंदुरबापर्यंत रेल्वेने प्रवास करून पुढे अक्कलकुवा-मोलगीमार्गे काठी येथे जाता येते. नाशिकपासून नंदुरबार किंवा धुळेमार्गे काठी हे अंतर सुमारे ३५० किलोमीटर आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी काठी येथे निवासाची कोणतीही व्यवस्था नाही. परंतु, काठीपासून काही किलोमीटरवर असलेल्या नंदुरबार, धडगाव, मोलगी, तोरणमाळ या ठिकाणच्या विश्रामगृह किंवा लॉजमध्ये थांबता येऊ शकते.

गोव्याचा शिगमोत्सव

प्रतिनिधी

वर्षभर अनेक उत्सव साजरे करणारा गोयंकरांचा आवर्जून पाहावा असा शिगमोत्सव होळीपासून सुरू होतो आणि पुढे पाच-सहा दिवस मोठय़ा उत्साहात सुरू असतो. पौराणिक कथांवर आधारित चित्ररथ, रंगीबेरंगी कपडेपट आणि झेंडे घेऊन निघालेल्या मिरवणुका असा मोठा तामझाम हा खास आकर्षणाचा भाग असतो. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून पाच-सहा दिवस हा माहोल संपूर्ण गोव्यावर पसरलेला असतो.

धक्तो (धाकटा) शिगमो आणि व्हडलो (मोठा) शिगमो अशा दोन प्रकारे हा उत्सव होत असतो. धक्तो शिगमो हा मुख्यत: जुन्या गोव्यात ग्रामीण भागात फाल्गुन पौर्णिमेच्या आधी पाच दिवस सुरू होतो तर व्हडलो शिगमो नव्या गोव्यात शहरात पोर्णिमेला सुरु होऊन पुढे पाच दिवस चालतो. मिरवणुका या मुख्यत: पणजी आणि परिसरात होतात, तर चित्ररथांसाठी ग्रामीण भागात डोकवावे लागेल. मिरवणुकांत गोव्याच्या अनेक पारंपरिक नृत्यांचा आनंद घेता येतो. तर ग्रामीण भागात गावकरी एका नियोजित स्थळी एकत्र येऊन नमनाची गाणी म्हणतात. तलगडी, हान्पेट, लॅम्प डान्स आणि गोफा असे नृत्य प्रकार यानिमित्ताने सादर केले जातात. ढोल-ताशांच्या आवाजात गावात प्रत्येकाच्या दारात ही मिरवणूक नेली जाते. गोवा पर्यटन महामंडळाच्या वेबसाइटवर व फेसबुकवर याबद्दल अधिक आपणास मिळू शकते.

पंजाबमधील होला मोहल्ला

दीपाली भोसले

अमृतसरपासून सुमारे २५० किलोमीटरवर आनंदपूर साहिब हे शिखांचे धर्मस्थळ आहे. दहावे गुरू गोविंद सिंग यांनी तेथूनच खालसाची सुरुवात केली. त्या काळी मुगलांचे आक्रमण रोखण्यासाठी गुरू आपल्या शिष्यांना युद्धाचे प्रशिक्षण देत असत. या प्रशिक्षणाची सुरुवात होळीच्या दिवशी झाली म्हणून होला मोहल्ला हा सण साजरा केला जातो. या सणाला पंजाबमधीलच नव्हे, तर देश-परदेशातील शीख बांधव, पर्यटक येतात. युद्धकला, शस्त्रकलेच्या थरारक कसरती या वेळी पाहावयास मिळतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी मुख्य गुरुद्वारातून मिरवणूक निघते. ही मिरवणूक आनंदपूर साहिबमधून फिरून हिमाचल प्रदेशच्या चरणगंगा येथे समारोप होतो.
  होळीच्या काळात आनंदपूर साहिबमधील हॉटेल आणि लॉजचे भाडे जवळपास दुप्प्ट होते. त्यामुळे पूर्ण नियोजन करूनच तेथे जाणे श्रेयस्कर. अमृतसर, आनंदपूर साहिब आणि  जवळच्या नैनादेवी या तीर्थस्थळांचे दर्शन घेऊन चंदीगडहून परतीचा प्रवास असा चार-पाच दिवसांचा कार्यक्रम आखता येईल.

dbhosle@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi special article on different places
First published on: 09-03-2016 at 04:10 IST