मेघालय हे इशान्येकडील राज्यांतील बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले एक छोटेसे राज्य. नावाप्रमाणेच मेघांचा आलय असलेले सर्वाधिक पर्जन्यमानाचे राज्य. संपूर्ण मेघालय गारो, खासी व जैतिया टेकडय़ांनी व्यापलेला आहे. या वेगवेगळ्या टेकडय़ांच्या प्रदेशात राहणाऱ्या जमातीही या टेकडय़ांच्याच नावाने म्हणजे गारो, खासी, जैतिया या नावाने ओळखल्या जातात. मेघालयातील बहुतांश लोकसंख्या ही या जमातींची आहे.
सुमारे ३०० प्रकारचे ऑर्किड, दोन राष्ट्रीय उद्याने, अनेक प्रकारचे वन्य प्राणी यांनी समृद्ध असं हे राज्य आहे. येथील भटकंतीसाठी ऑक्टोबर ते एप्रिल हा कालावधी अनुकूल आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यान येथे प्रचंड पाऊस असतो.
गुवाहाटीपासून ९० किलोमीटरवर शिलाँग हे मेघालयाच्या राजधानीचे शहर आहे. येथे सर्व शहरी सुविधा आहेत. प्रवासासाठी बस व जीप गाडय़ा यांची सेवा चांगली आहे. रस्तेही चांगले आहेत.
शिलाँगकडे जाताना १७ किलोमीटर अलीकडे, प्रचंड मोठा असा उमियाम जलाशय आहे. हा सर्व परिसर अत्यंत रम्य आहे. शिलाँगपासून १० किलोमीटरवर शिलाँग शिखर (६४४५ फूट) आहे. येथून शिलाँग शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. शहरापासून दहा- बारा किमीच्या परिसरात स्प्रेड इगल, स्वीट, एलेफंट अशा नावांचे धबधबे आहेत.
शिलाँगपासून ५४ किमी अंतरावर चेरापुंजी येथून हिरव्या रंगाने नटलेल्या खोल दऱ्या, मोसमाई, दैन्थलेन, नोहकेलीकाई या नावाचे व असे अनेक धबधबे व बांगलादेशचा पठारी प्रदेश नजरेसं पडतो. येथून ५५ किमीवर मोंहसिराम हे आता सर्वाधिक पर्जन्यमान असणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते. याच पट्टय़ात दऱ्या-खोऱ्यांमध्ये लिविंग रुट ब्रिज हे नैसर्गिक आश्चर्य खास पाहण्याजोगे आहेत. ओढे, नाले ओलांडून जाण्यासाठी असे ३५ अवाढव्य पूल या परिसरात आहेत.
खासी जमातीचा नोंगक्रेम सण व गारो जमातीचा वांगाला डान्स नोव्हेंबरमध्ये तर जैतियांचा बेह देन्खलाम सण जुलैमध्ये असतो.
आपल्या देशात नैसर्गिक भुयारे फक्त मेघालय राज्यात आहेत. मेघालयाच्या टेकडय़ांमध्ये असलेला चुनखडीचा खडक व सर्वाधिक पर्जन्यमान या घटकांमुळे मेघालयात हजारो भुयारांची निर्मिती झाली आहे. ही भुयारं भूगर्भ शास्त्रज्ञ व इतर अभ्यासकांसाठी नंदनवन म्हणावी लागतील. साहसाची व नित्य नव्याचा वेध घेण्याची ओढ असणाऱ्यांसाठी एक आव्हानच आहे. अशा या भुयारातून पृथ्वीच्या अंतरंगाचा वेध घेत केलेल्या साहसी मार्गक्रमणाला केव्हिंग संबोधलं जातं. या केव्हिंगसाठी प्रस्तरारोहणाच्या तंत्राचा तर काही ठिकाणी वॉटर डायव्हिंग तंत्राचा वापर करावा लागतो. आतापर्यंत शोध घेतलेले सर्वात लांब भुयार ३१ किमी लांबीचे आहे. नैसर्गिकरित्या या गुहांमध्ये तयार झालेल्या नानाविध रचना पाहताना आपण वेगळ्याच जगात आहोत की काय असा भास होतो. चेरापुंजीत मोसमाई नावाचे भुयार आहे. या भुयारातील मार्ग योग्य त्या सुविधा करून सोपा केलेला असल्याने पर्यटकांना या भुयाराची अनुभूती घेता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुणाचल
गुवाहाटी – तेजपूर-भालुकपाँग – बोमदिला- सेलापास – तवांग – गुवाहाटी
तेजपूर – भालुकपाँग (२ तास) भालुकपाँग हे अरुणाचल सीमेवरील गावी नामेरी राष्ट्रीय उद्यान आहे. भालुकपाँग येथे आसाम पर्यटनाचे सुंदर निवास्थान आहे.
भालुकपाँग ते बोमदिला (६ तास) – वाटेत टीपी येथील ऑर्चिड पार्क व नाग मंदिर आहे. बोमदिला हे १० हजार फूट उंचीवरील डोंगरउतारावर वसलेले जिल्ह्य़ाचे गाव.
बोमदिला – सेलापास – तवांग (१२००० फूट) -(८ तास) – सेलापास (१३७०३ फूट) ही वाटेत लागणारी सर्वात उंचावरील खिंड पार करावी लागते. त्यांनतर जसवंतगड हे
सन्यतळ व त्यांनतर जंग धबधबा लागतो. त्यानंतर तवांगला पोहोचता येते. येथे ३ रात्री मुक्काम हवा.
एक दिवस स्थानिक तवांग मोनेस्ट्री व इतर ठिकाणे पाहणे व दुसऱ्या दिवशी संगेत्सर तलाव व चीनच्या सीमेपर्यंतच्या प्रदेशाला भेट देता येते. तवांग ते तेजपूर व तेथून गुवाहाटी असा परतीचा प्रवास करता येईल.
हृषीकेश यादव – hrishikeshyadav@hotmail.com

आवाहन
लोक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा
वारसा असणारं मंदिर. कदाचित
ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहीत नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.
ऑफबीट क्लिक : हल्लीच्या भटकंतीत, भटकंती कमी आणि छायाचित्रण अधिक असंच झालंय. पण त्यापलीकडे जाऊन काहीतरी अनोखं फ्रेममध्ये उतरवणारे असतातच. कधी ती फ्रेम अचानक मिळते, तर कधी बरीच प्रतीक्षा करावी लागते. असं एखादं छायाचित्र तुमच्याकडे असेल तर लगेच आम्हाला पाठवा.
भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात.
अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता.
आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.
ई-मेल – lokbhramanti@gmail.com

Web Title: Meghalaya magic
First published on: 27-07-2016 at 01:32 IST