सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवरील आग्नेय कडय़ावरून म्हणजेच सर्वात कठीण मार्गाने यशस्वी आरोहण करणारे ज्येष्ठ गिर्यारोहक डग स्कॉट आणि गिर्यारोहण अनेक विक्रम केलेल्या ताशी आणि नुंग्शी मलिक, लिओ होल्डिंग यांना भेटण्याची, संवाद साधण्याची संधी भारतीय गिर्यारोहकांना मिळणार आहे. हिमालयन क्लब या देशातील सर्वात जुन्या अशा गिर्यारोहण संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्ताने डग स्कॉॅट १८ आणि १९ फेब्रुवारीला भारतात येणार आहेत. हिमालयन क्लबतर्फे देण्यात येणारा केकू नवरोजी स्मृती पुरस्कार या वर्षी डग स्कॉट यांच्या ‘द हार्ड रोड टू एव्हरेस्ट’ या आत्मचरित्राला देण्यात येणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या आरोहणाचे थरारक अनुभव ऐकता येतील. त्याचबरोबर १९७७ साली ख्रिस बॉनिग्टनबरोबर बेथा ब्रांक (ओगरे) या काराकोरम पर्वतराजीतील २३ हजार ९०० फूट उंचीच्या शिखरावरील पहिल्या यशस्वी आरोहणाचे सादरीकरणदेखील ते करतील. या आरोहणाला यावर्षी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. वार्षिक कार्यक्रमानिमित्ताने आरोहणातील नीतिमूल्यं या विषयावर एका खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. डग स्कॉट यांच्या अध्यक्षेतेखाली हा परिसंवाद होणार आहे. सध्या आपल्याकडे गिर्यारोहणातील व्यापारीकरण आणि साहसी पर्यटनात जी अनागोंदी सुरू आहे त्या पाश्र्वभूमीवर हा परिसंवाद महत्त्वाचा आहे.

ताशी आणि नुंग्शी मलिक या जुळ्या बहिणी साहसी क्रीडा प्रकारात अनेक विक्रम करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत. गिर्यारोहण आणि महिला या विषयावर एक खास सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे. सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर आरोहण करणाऱ्या पहिल्या जुळ्या बहिणी, सातही खंडांतील सर्वोच्च शिखरं यशस्वी आरोहण करणाऱ्या जुळ्या बहिणी अशी त्यांच्या कारकीर्दीची गिनिज बुकमध्ये नोंद झालेली आहे.

लिओ होिल्डग यांनी अतिउंच प्रस्तरभिंती आरोहणात अनेक महत्त्वाची आरोहणं केली आहेत. त्याचबरोबर गिर्यारोहणातील साहसी चित्रीकरणामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. तसेच ‘द वाईल्डेस्ट ड्रिम’ हा एव्हरेस्टवरील उत्तरपूर्व बाजूने आरोहणाचा थरारपट

पाहता येईल.

२०१६ मध्ये हिमालयन क्लबने पूर्व काराकोरम पर्वतरांगेतील शाही कांग्री मोहिमेचे सादरीकरण होणार आहे. एका छोटय़ा चमूच्या मोहिमेत शाही कांग्रीवर आरोहण करता आले नाही, पण न्या कांग्रीवर आरोहण करायचा प्रयत्न केला. पण केवळ शिखरापासून

२०० मीटरवर आरोहण सोडावे लागेल. या मोहिमेचे सादरीकरण होईल.

दिनांक १८ व १९ फेब्रुवारी या दोन दिवसांत केसी कॉलेज सभागृह चर्चगेट येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल. नावनोंदणी www.himalyanclub.org या संकेतस्थळावर ऑनलाइनदेखील करता येईल. अधिक माहितीसाठी  संपर्क – ०२२ २४९१ २८२९.