पुणे-कोल्हापूर महामार्गावरील सातारा हे असंच एक टुमदार शहर. शहराचा पसारा काही फार नाही, परंतु त्याला इतिहास खूपच मोठा. अजिंक्यतारा किल्ल्याच्या मांडीवर पहुडलेल्या या सातारा शहराच्या जवळच एका डोंगरावर असलेलं भन्नाट आणि वैशिष्टय़पूर्ण असं ठिकाण म्हणजे पाटेश्वर. सरत्या पावसाळ्यात अगदी वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर पाटेश्वरला पर्याय नाही. सातारा-रहिमतपूर रस्त्यावर देगाव इथे पाटेश्वरचा फाटा आहे. गाडीरस्ता पुढे जाऊन एका डोंगरावर चढतो आणि काही अंतर गेल्यावर हा रस्ता संपतो. तिथून पुढे सुरुवातीला काही पायऱ्या लागतात आणि तिथेच दगडात कोरलेले गणपती बाप्पा दर्शन देतात. तिथून पुढे आपण डोंगर सपाटीवर येतो. तिथून अंदाजे ४५ मिनिटे चालत जायचे. दोन्ही बाजूंनी सभोवतालचा परिसर अप्रतिम दिसतो. शिवाय अधून मधून दरीतून येणारा भन्नाट वारा झेलत हे चालणे फारच आनंदाचे जाते. चालताना आपण एकटे नसतो. असंख्य गोड आवाजात गाणारे पक्षी आपल्याला साथ देत असतात. रानवाटेने पुढे गेल्यावर उजवीकडे एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या पाठीमागे जाऊन काही पायऱ्या चढून वर गेले की पुढे झाडीमध्ये लपलेले श्री पाटेश्वराचे सुंदर मंदिर सामोरे येते. समोरील दगडी नंदी मुद्दाम पाहण्यासारखा. इथेच काही दगडांमध्ये कोरलेली लेणी आहेत आणि त्या लेण्यांमध्ये सर्वत्र कोरलेली असंख्य शिविलगे अचंब्यात टाकतात. एका लेणीच्या तीनही भिंतींवर शिविलगाच्या माळा कोरलेल्या आहेत. शेजारच्याच लेणीमध्ये सहस्रिलगी शिविपड, धारालिंग, चतुर्मुख लिंग, काही शिविलग नंदीच्या पाठीवर, काही पायाशी असा सगळा अप्रतिम परिसर. एका लेणीमध्ये शिविलगाच्या शेजारच्या खांबांवर नागाची शिल्पे आहेत. बाजूलाच एक समाधीवजा बांधकाम दिसते. त्याच्या बाहेर गरुडाचे आणि मारुतीचे एक शिल्प ठेवलेले दिसते. अभ्यासकांच्या मते ही सारी निर्मिती इ.स.च्या दहाव्या शतकानंतरची आहे. श्री पाटेश्वर देवस्थानच्या दुरुस्तीसाठी अहिल्याबाई होळकर व सरदार अनगळ यांनी मदत केली होती. डोंगरमाथ्यावर झाडी असून विविध पक्ष्यांचे गुंजारव कानी पडत असतात. अगदी रम्य परिसर. इथून पाय काही निघत नाहीत. इथूनच जवळ जरंडेश्वर आणि नांदगिरी हा किल्लासुद्धा पाहता येईल. दोन दिवस भटकण्यासाठी काढले तर सातारा इथे मुक्काम करून एक दिवस जरंडेश्वर आणि नांदगिरी किल्ला आणि दुसऱ्या दिवशी सहस्रिलगी पाटेश्वर अशी ऐन पावसाळ्यातली निराळीच भटकंती करता येईल.
आशुतोष बापट – ashutosh.treks@gmail.com