कोकणात फिरताना आपण बऱ्याचदा त्याच त्याच ठिकाणी फिरतो; पण एकदा देवरुखला गेलो असताना आम्हाला तिथे एक नवे ठिकाण समजले. ते ठिकाण म्हणजे टिकलेश्वर. सुंदर निसर्ग आणि नीरव शांतता अनुभवायची असेल तर टिकलेश्वरला मुद्दाम जायला हवं. डोंगरमाथ्यावर असलेल्या या ठिकाणापासून सह्य़द्रीचे अक्राळविक्राळ रूप पाहता येते. माल्रेश्वर या सुप्रसिद्ध धबधब्यामुळे तिथेच जवळ असलेले टिकलेश्वर काहीसे अपरिचित राहिले आहे. देवरुखवरून माल्रेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावरच टिकलेश्वरला जाणारा एक फाटा फुटतो. लांबूनच पांढरा रंग दिलेले देऊळ आपले लक्ष वेधून घेते. टिकलेश्वरला पूर्वी पायथ्याच्या तळावडे गावातून चालत जावे लागे; परंतु आता मात्र तिथपर्यंत गाडीरस्ता झाला आहे. टिकलेश्वरच्या मंदिराची जागा चांगली प्रशस्त आहे. आत दोन समाध्या आहेत. शिखराच्या थोडेसे खालच्या टप्प्यावरून शिखराला प्रदक्षिणा घालता येते. प्रदक्षिणेच्या वाटेवर काही पाण्याची टाकी आणि गुहा खोदलेल्या दिसतात. त्यातील एका टाक्यातले पाणी स्वच्छ आणि थंडगार असते. मंदिरापासून दिसणारे दृश्य केवळ अवर्णनीय आहे. पूर्वेला ममतगड नावाचा एक किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. घाटमाथ्यावरच्या गोठणे गावापासून माल्रेश्वरला येणारी वाट, पायथ्याच्या कुंडी गावातून घाटावरील चांदेल गावी जाणारा कुंडी घाट, असा सगळाच परिसर इथून न्याहाळता येतो. पूर्वेकडे असलेला सलग घाटमाथा फारच सुरेख आणि भेदक दिसतो. आता या घाटमाथ्यावर जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत, कारण चांदेल, रुंदीव ही सगळी गावे आता सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आल्यामुळे तिथून उठवली आहेत आणि हा सर्व प्रदेश आता संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. छोटेखानी किल्ला भवानीगडसुद्धा याच परिसरात आहे. तसेच ममतगड हा किल्लासुद्धा इथून जवळ आहे. देवरुखमधील साने मंडळींकडे या किल्ल्याची किल्लेदारी होती. तसेच बारमाही वाहणारा धोधावणे हा धबधबासुद्धा टिकलेश्वर आणि प्रचितगड यांच्या सान्निध्यात वसलेला आहे. हा परिसर अत्यंत देखणा असून देवरुखला जर मुक्काम केला तर ही सर्व ठिकाणे दोन दिवसांत पाहून होतात.

shilpaabhi@yahoo.com