‘लोकसत्ता’च्या १५ नोव्हेंबरच्या अंकातील काही वृत्ते उद्धृत केली आहेत. असे कोण म्हणाले? याला महत्त्व नाही. असे विचार मांडले जातात हे नमूद व्हावे..
‘काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, दहशतवादाने स्वातंत्र्य व उदारतेचा पराभव करता येणार नाही’, ‘हा हल्ला म्हणजे निरपराध लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना पकडून शिक्षा करू, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले’, ‘हा हल्ला म्हणजे फ्रान्सविरुद्धचे युद्धच असून कोणतीही दयामाया न दाखवता चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा फ्रान्सने केली आहे.’ तसेच ‘दहशतवादाला खतपाणी घालण्याचे फ्रान्सचे धोरणही कारणीभूत आहे, असे प्रतिपादन सीरियाचे अध्यक्ष बशर अल्-असाद यांनी शनिवारी केले.’
‘शिक्षा करणे’ आणि ‘चोख प्रत्युत्तर देणे’ आवश्यक असले तरी तेवढेच होणे मुळीच पुरेसे नसते. ‘फ्रान्सचे धोरणही कारणीभूत आहे’ असे उदात्तीकरण करणे सुरू झालेच आहे. इराक युद्धात प्रामुख्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ज्या घोडचुका केल्या त्याची कबुली टोनी ब्लेअर यांनी इतक्या वर्षांनी दिली आहे. जनमानसाची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न करणे याच्या जोडीला धर्म-प्रांत इत्यादी कारणांमुळे होणारे संघर्ष ज्या कारणांमुळे वृिद्धगत होतात त्या मूळ कारणांवरसुद्धा उपाय आवश्यक आहे. केवळ बंदूक वापरून ‘चोख प्रत्युत्तर देणे’ हे अनेक वेळा शक्य नसते हे व्हिएतनाम, अफगाणिस्तान आणि आता इराकमध्ये सिद्ध होऊनसुद्धा लष्करी पॉवर्सना उमज आलेली नाही. काश्मीरप्रश्नी लष्करी ताकदीवर उपाय करू बघणाऱ्यांनी यावरून धडा घ्यावा.
– राजीव जोशी, नेरळ

प्रश्न शाळांच्या वेळेचा की राष्ट्रीय कार्यसंस्कृतीचाही?
‘शाळा सहा तासच असावी’ या शीर्षकाच्या पत्रात (लोकमानस, १६ नोव्हें.) ‘मुळात बालमानसशास्त्राला धरून जगाच्या पाठीवर कुठेच आठ तास शाळा भरत नाहीत’ असे विधान आहे; पण ही चर्चा सुरू झाल्यावर इंटरनेटवर अनेक संकेतस्थळांवर नजर टाकली. इंटरनेट माहितीच्या मर्यादा मान्य करूनही अनेक देशांच्या शाळेच्या वेळा दिसल्या. त्यात चीन (७.३० ते ५), फ्रान्स (८ ते ४), केनिया (८ ते ४), रशिया (८.३० ते ३), दक्षिण कोरिया (८ ते ४ ), स्पेन (९ ते ५) अशा (सात ते आठ तास शाळा भरणाऱ्या) देशांची माहिती आहे. मग पत्रातील विधान कोणत्या अभ्यासाच्या आधारे आहे?
अशाच प्रकारे सुट्टी कमी करण्याचा मुद्दा आला की, ‘परदेशात ८०० तासपेक्षा जास्त शाळा भरत नाहीत’ अशी ढाल वापरली जाते. हे अनेक देशांबद्दल खरे असेलही; पण काही देशांत प्राथमिक शाळा ८०० तासांपेक्षा जास्त भरतात. उदा. फ्रान्स (९३६ तास), आर्यलड (९१५ तास), नेदरलँड्स (९३० तास), न्यूझीलंड (९३५ तास), स्पेन (८८० तास) अशीही माहिती मिळाली.
तेव्हा परदेशातील सोयीचे तपशील वापरताना हे तपशीलही बघावेत. परदेशातील गुणवत्ता, तेथील कार्यसंस्कृती हे न बघता इथल्या शाळा कमी तास भरवण्यासाठी तिथले पुरावे शोधणे हे हास्यास्पद आहे. शाळा किती तास व किती दिवस भरवाव्यात, ही चर्चा करताना परदेशातील कोणतीही आकडेमोड न करता मुळात वर्षांत १४५ दिवस शाळा बंद का ठेवायची? इतक्या सुट्टय़ांची गरज काय? हा मुद्दा केंद्रभागी ठेवून चर्चा झाली पाहिजे. शाळाच काय, इथली सर्व सरकारी कार्यालये ही ५२ रविवार व महत्त्वाचे सण असे ६५ दिवस वगळता ३०० दिवस सुरू राहिली पाहिजेत. राष्ट्रीय कार्यसंस्कृती वाढण्याच्या उंचीवरून या मुद्दय़ावर एकमत व्हायला हवे.
– हेरंब कुलकर्णी, अकोले (अहमदनगर)

टिपू सुलतानच्या धर्मनिरपेक्षतेचे लेखी आणि परिस्थितिजन्य पुरावे..
‘टिपू सुलतानच्या धर्माधतेचे अनेक पुरावे उपलब्ध’ हे पत्र वाचले. वादासाठी आपण टिपू धर्माध होता, असे मानले तर पुढील गोष्टींचा उलगडा होत नाही.
१) टिपू सुलतानची राहणी एखाद्या िहदू राजासारखी कशी? दाढी केलेली, मिशी मराठा पद्धतीने राखलेल्या तसेच त्याचा मुकुटही इस्लामी पद्धतीचा आहे असे वाटत नाही. त्याच्या काही चित्रांमध्ये, कानात कर्णफुले कशी?
२) जर तो धर्माध होता तर म्हैसूरच्या आसपास जितकी प्राचीन देवळे आहेत तितकी उत्तर भारतात आढळत नाहीत. तसेच देवळे पाडून त्याने मशिदी बांधल्या, असा आरोप झालेला नाही.
३) त्याच्या राज्याचे नाव जरी म्हैसूर होते तरी त्याने राजधानी मंदिरांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या श्रीरंगपटनम येथे केली व तेव्हा त्या गावाच्या नावचे इस्लामीकरण कसे काय केले नाही?
४) त्याने स्वत: १५६ देवळांच्या व्यवस्थापनासाठी देवस्थानांच्या नावे जमिनी लिहून दिल्याच्या नोंदी आहेत. सन १७९१ मध्ये परशुरामभाऊ भावे यांच्या नेतृत्वाखाली टिपूचा सर्वात समृद्ध भाग बेडनुर यावर आक्रमण करून मराठा फौजांनी आद्य शंकराचार्यानी स्थापन केलेला दक्षिणेकडील ‘शृंगेरी मठ’ उद्ध्वस्त करून ६० लाख रुपयांची जवाहिरात लुटून नेली व तेथील विरोध करणाऱ्या ब्राह्मणांना जिवे मारले, यास रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या लिखाणात दुजोरा मिळतो. शंकराचार्य सच्चिदानंद भारती (तिसरे) यांनी टिपू सुलतानला पत्र लिहून झालेल्या घटनेची माहिती कळवली व टिपूने तातडीने परत मठाची घडी पहिल्यासारखी बसवून दिली. त्याच काळात त्यांनी कांची येथील टिपूच्या वडिलांनी उद्ध्वस्त केलेले मंदिर परत बांधून देण्याची विनंती टिपू सुलतानला केली, जी तात्काळ टिपूने कार्यवाही करून मान्य केली. या काळात टिपू सुलतानने शंकराचार्याना २९ पत्रे लिहिल्याची नोंद आहे.
-प्रसाद भावे, सातारा</p>

धर्म वाईट नसतो
‘आयसिस’ने फ्रान्समध्ये केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्हायला हवा. पण त्याचबरोबर इस्लाम= दहशतवाद हे समीकरण तितकेच चुकीचे आहे. धर्मग्रंथांची कालसुसंगतता तपासून पाहणे तितकेच गरजेचे ठरते.
कुठलाच धर्म वाईट नसतो, त्यातील काही लोक वाईट असतात, हे नेल्सन मंडेला यांचे वाक्य लक्षात ठेवण्याची गरज आहे!
– कबीर पळशीकर, मुंबई.

मराठी चित्रपटांनी जाहिरात करावीच, पण..
‘मराठी चित्रपटांनी हा अतिरेक टाळावा’ (लोकमानस, १६ नोव्हेंबर) या पत्रात म्हटल्याप्रमाणे िहदी चित्रपटांशी स्पर्धा करताना जाहिरातींचा अतिरेक होतो, ही गोष्ट खरी. मात्र बरेचसे चांगले मराठी चित्रपट केवळ व्यवस्थित जाहिरात न केली गेल्यामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत हेही तितकेच खरे. परिणामी त्यांना व्यावसायिक यश मिळवता आले नाही.
एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीने निर्मितीमूल्यांच्या बाबतीत कात टाकली असताना नियोजनबद्ध ‘मार्केटिंग’ करणे हे ओघाने आलेच. एरवीही सध्याच्या चित्रपटांचे (िहदीसह) चित्रपटगृहांतील वास्तव्य सरासरी दोन ते तीन आठवडेच असते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हे गरजेचे ठरते. म्हणूनच चित्रपटांची जाहिरातबाजी ही आवश्यकच ठरते आणि ती मराठी चित्रपट निर्मात्यांना करावीच लागणार. चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली जाऊन त्यांची पावले चित्रपटगृहाकडे वळतील एवढेच प्रमाण जाहिरातींचे असावे.
– दीपक काशीराम गुंडये, वरळी