प्रतिगामीपण अशिक्षितपणातून जन्माला येते. पुरोगामी होण्यासाठी सुशिक्षितपणा ही पूर्वअट असते. हिंदुत्ववादी जसा स्वत:ला अभिमानाने हिंदुत्ववादी म्हणवतो तसा कोणताही पुरोगामी स्वत:ला पुरोगामी म्हणताना आढळणार नाही. पुरोगामीपणा मिरवणारे लोक पुरोगामी असण्याची शक्यता कमी असते.

खोटे पुरोगामी समोर ठेवून पुरोगामी या संकल्पनेची टिंगल करणे हे काही बरोबर नाही. पण हे सर्रास केले जाते. ‘पुरोगाम्यांचे प्राक्तन’ हा अग्रलेख (२३ नोव्हेंबर) पुरोगामीपणाला या अंगाने भिडावा हे ‘दुर्दैव’च. घरातल्या खोटय़ा नोटा मोजून एखाद्याची श्रीमंती ठरवायचा हा प्रकार आहे. वास्तविक समाजातल्या सर्वानी पुरोगामी असले पाहिजे, निदान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने वैचारिकदृष्टय़ा सुशिक्षित असले पाहिजे.

या अग्रलेखाचा रोख खोटय़ा पुरोगामी लोकांवर हल्ला चढवणारा आहे हे स्पष्ट आहे. लेखनाच्या ओघात आलेली काही निरीक्षणे पटण्यासारखी आहेत. उदाहरणार्थ- ‘मुद्दा मान्य असणाऱ्यांनाच तो पुन्हा पुन्हा समजावून सांगणे हा पुरोगामी लोकांचा उद्योग’.

पण ही कोणत्याही वैचारिक गटाची मर्यादा आहे. मी स्वत: मुद्दा न पटणाऱ्यांना मुद्दा पटवून द्यायचा प्रयत्न सतत करीत आलो आहे. आणि मला त्यात आजतागायत शून्य यश मिळाले आहे. आपल्याखेरीज आपले ऐकायला कोणी का उत्सुक नाही? – ‘सलमान खानच्या चित्रपटाला लोक अधिक गर्दी का करतात? चांगल्या दर्जेदार चित्रपटाला गर्दी का करीत नाहीत?’ या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे. मानसशास्त्रज्ञ याचा वेध घेऊ  शकतील.

‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या संकोचाबद्दल सामान्य नागरिकास खंत वाटायला हवी’- असे एक विधान अग्रलेखात आहे. आता अशी खंत वाटत नसेल तर तो दोष समाजाचा की पुरोगाम्यांचा? अशा प्रकारची खंत वाटणे हे शहाणपणाचे लक्षण नाही काय? समूहाच्या शहाणपणाच्या अभावी हे घडते, असे म्हणण्याऐवजी पुरोगाम्यांवरल्या अविश्वासामुळे हे घडते असे कसे म्हणता येईल? समाजाचा चांगल्या मूल्यांवर विश्वास नाही हेच यातून दिसून येते. या देशात सुधारकांना कायम दगड खावे लागले आहेत. इतिहास हेच अधोरेखित करतो. ही स्थिती समाजाच्या निर्बुद्धपणाची किंवा अशिक्षितपणाची द्योतक आहे. ‘बेगडी पुरोगामित्व’ असा शब्दप्रयोग लेखात आहे. समाज या बेगडीपणालाच पुरोगामित्व समजून चालत असेल आणि नावे ठेवत असेल तर तो समाजाच्या आकलनाचा दोष आहे. अग्रलेखातही बेगडी पुरोगामित्वाची उदाहरणे देऊन पुरोगामी नेत्यांवर झोड उठवली आहे, त्यातूनही हेच समोर येते.

‘नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहून जनतेने या पुरोगाम्यांना पूर्णपणे भिरकावून दिले’ असे अग्रलेखात म्हटले आहे. आता हे जनतेने चांगले केले की वाईट केले? शहाणी मूल्ये भिरकावून लोक वाईट मूल्यांच्या मागे धावले, तर त्यात चूक कोणाची? चांगल्या मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या पुरोगाम्यांची की वाईट मूल्यांचे आकर्षण असणाऱ्या लोकांची?

मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी अमेरिकन जनतेच्या अध्यक्षीय निवडीचेही उदाहरण इथे देता येईल. अशा स्थितीत प्रतिगामी शक्तींना बळ दिल्याबद्दल पुरोगाम्यांनी जनतेलाच बोल लावले तर त्यात चूक काय? लोकांना आपल्या लायकीचे सरकार मिळते म्हणतात. तशी लोकांना आपल्या आवडीची मूल्यव्यवस्था मिळते असे का नाही म्हणायचे?

स्वत:ला पुरोगामी म्हणवून न घेणारे एक खरेखुरे पुरोगामी, नरेंद्र दाभोलकर यांचा भर समन्वय साधण्यावर असायचा, संवाद साधून आपले विचार प्रतिपक्षाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न असायचे. पण त्यात त्यांना यश आल्याचे दिसत नाही. पुरोगामी गटाच्या बाहेर आज जो मोठा समाज आहे तो नरेंद्र दाभोलकर यांच्याकडे समाजशत्रू म्हणूनच बघतो. अशा वातावरणात पुरोगामी आपसातच बोलत राहिले तर नवल नाही. अटळच आहे ते.

अवधूत परळकर, माहीम (मुंबई)

 

हिंदुत्ववादी असणे चूक कसे?

‘पुरोगाम्यांचे प्राक्तन’ हा अग्रलेख वाचला. आजच्या पुरोगाम्यांबद्दलचे यथातथ्य विश्लेषण लेखात केलेले आहे. आज पुरोगामी विचारसरणी कठीण परिस्थितीतून जात आहे असे म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठी दोन कारणे अधोरेखित करता येतील. पहिले आहे ढ’्र३्रूं’ उ११ीू३ल्ली२२. पुरोगामी नेहमीच ढ’्र३्रूं’’८ ू११ीू३ कसे राहता येईल याबद्दल प्रयत्नशील असतात. ही अत्यंत दांभिक वृत्ती आहे आणि ती सामान्य लोकांना म्हणावी तेवढी  ंस्र्स्र्ीं’ नाही होत आहे. द४१ं या प्रश्नोत्तरांच्या संकेतस्थळावर जॉन डेव्हिस नावाच्या व्यक्तीने अमेरिकी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीबद्दल अतिशय सुंदर उत्तर लिहिले आहे. पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे ट्रम्प यांना पाठिंबा दाखवणाऱ्या सामान्यांची कशी गळचेपी करायचे याबद्दल लिहिलेले आहे.

दुसरे कारण म्हणजे आजचे पुरोगामी लोक हे विचारविरोधीपेक्षा जास्त व्यक्तीविरोधी झाले आहेत. भारतामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित झाल्यापासून ते आजपर्यंत पुरोगामी फक्त मोदी कसे चूक आहेत किंवा हिंदुत्ववादी आहेत हे दाखवण्याच्या मागे लागलेले आहेत. पण हिंदुत्ववादी असणे म्हणजे चूक हे मात्र सामान्य लोकांना पटवण्याचा छोटासा प्रयत्नदेखील पुरोगामी करताना दिसत नाहीत. अग्रलेखात लिहिल्याप्रमाणे कळपाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न पुरोगाम्यांनी करावा.

सिद्धार्थ चपळगावकर, पुणे

 

जादूमंतरमानसिकता कमी झाल्यास बरे!

‘पुरोगाम्यांचे प्राक्तन’ या संपादकीयात (२२ नोव्हें.) म्हटल्याप्रमाणे ‘कन्विन्सिंग द कन्विन्सड’ हा प्रकार खरोखरच अतिशय कंटाळवाणा होता. शिवाय ज्यांचे विचार बदलायची गरज आहे त्यांना त्यांच्या जुन्याच विचारांशी अधिक घट्ट बांधण्याचा जबरदस्त नकारात्मक परिणामही यातून साधला गेला होता. अग्रलेखात अपेक्षा केल्याप्रमाणे काश्मीरमध्ये मुस्लिमेतर मुख्यमंत्री केव्हा होईल ते सांगता येत नाही, मात्र या देशातील मुळातच उदारमतवादी विचारसंस्कृतीमुळे अनेकदा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अनेक केंद्रीय मंत्री अहिंदू झाले आहेत हे सत्यही लक्षात घ्यावे लागेल. असे पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये शक्य झालेले दिसत नाही.

तरीही महाराष्ट्रात मात्र दोन्ही वेळा ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यावर, पुरोगामी म्हणवून घेण्यात ज्यांची हयात गेली त्यांनी टोमणे मारीतच तो काळ काढला आहे. कुजबुज मोहिमा राबवून आता ‘पेशवाई आली’ वगैरे ‘पुरोगामी’, ‘प्रबोधनात्मक विचार’ पसरवण्याचे कार्य आताही सुरू आहे. खरे तर ७० वर्षांच्या धर्मनिरपेक्ष राजवटीनंतर देशांत वेगळे चित्र दिसायला हवे होते. पंजाबमध्ये मुख्यमंत्री शीखेतर आहे, काश्मीरमध्ये मुस्लिमेतर आणि महाराष्ट्रात मराठेतर आहे आणि लोक केवळ त्याच्या गुणवत्तेवर त्याचे मूल्यमापन करीत आहेत, असे चित्र दिसायला हरकत नव्हती. परंतु तसे झाले नाही आणि त्याची कारणेही समजण्यासारखी आहेत. समजावून घ्यावीच लागतील.

ज्यांना बुलेट ट्रेन आणून झटक्यात देशाची गाडी फास्ट ट्रॅकवर न्यायची घाई झाली आहे त्यांचे देशाच्या समस्यांबद्दलचे आकलन काय पातळीवरचे आहे त्याचे दर्शन नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातात १२० हून अधिक निरपराध लोकांच्या जिवाची आहुती देऊन झालेच आहे. अर्थशास्त्राबद्दलचे ज्ञान आणि प्रशासनातील नैपुण्यही आतापर्यंत ५० हून अधिक बळी जाऊन सिद्ध होतेच आहे. आता तरी ‘आलामंतर कोलामंतर छू’ असल्या जादूमंतर मानसिकतेतून पंतप्रधानांनी बाहेर येऊन, याच आपल्या ‘साध्या देशात’ राहून इथले प्रश्न समजावून घ्यावेत अशी व्यर्थ विनंती करावीशी वाटते. त्यांची ‘जादूमंतर’ मानसिकता कमी झाली तरी देश पुष्कळ पुरोगामी होईल अशी आशा!

श्रीनिवास बेलसरे, ठाणे पूर्व.

 

पुरोगामी मूल्ये राज्यघटनेत आहेतच..

गेले काही दिवस काही जण पुरोगामी विचारांनी प्रेरित होऊन ‘दक्षिणायन’च्या मोहिमेवर निघाले आणि नंतर गोव्याला पोहोचले. इथपर्यंत त्यांची दखलही कोणी घेतली नव्हती. ती ‘पुरोगाम्यांचे प्राक्तन’ (२२ नोव्हें.) या अग्रलेखाने विरोधभक्तीने का होईना, घेतली आहे.

पुरोगामी दांभिक असतात आणि आपल्याच विचारांभोवती फिरत असतात, आपल्याच विचारांच्या कोंडाळ्यात फिरत असतात, हा एक प्राचीन आरोप आहे. त्यांचा दांभिकपणा उघडा करण्यासाठी उदाहरणे निवडली आहेत, तीदेखील नामी आहेत. लोकशाही मार्गाने एखादे सरकार- भाजप/ शिवसेना सरकार- निवडले गेले तर त्याला विरोध कोणी केला? ते सरकार कोणत्याही मार्गाने उखडून टाकावे, असे तर कोणी म्हटले नाही. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाले, हेदेखील शेकडो लोकांना आवडलेले नाही. त्यांना कोणी दांभिक म्हटलेले नाही.        पुरोगामी व्यासपीठावरील नेहमीच्या कलावंतांचे सध्या बाजूला ठेवू या; पण मुंबईपासून महाड, चिपळूण, सावंतवाडी, गोवा असा प्रवास करीत गेलेले कार्यकर्ते/पत्रकार ‘नेहमीचेच कलावंत’ होते का? मंदार काळे, डॉ. आशीष देशपांडे अशी मंडळी फार राजकीयदृष्टय़ा प्रसिद्ध नसलेली आणि तरुणच आहे. हे सर्व जण ठिकठिकाणी थांबत स्थानिक तरुणांशीही संवाद  साधत होते. टिप्पणी करण्यापूर्वी याविषयी माहिती करून घ्यावी, अशी साधी अपेक्षा करू नये का? या सर्व भ्रमंतीत तरुण – विद्यार्थी यांचा  सहभाग उल्लेखनीय होता.

शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा : ‘पुरोगामित्व’ आणि लोकशाही – समता -स्वातंत्र्य इत्यादी मूल्ये ही कोणा एका गटाची नाहीत, तर राज्यघटनेप्रमाणे  ती झाकीर नाईकपासून समस्त साधू- बाबा- बापू यांनी शिरोधार्य मानलीच पाहिजेत. जर काही स्वत:ला पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी यात गफलत केली, तर त्या-त्या वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देणे योग्यच ठरेल; पण लोकांमध्ये त्या विचारांबद्दल घृणा निर्माण करणे योग्य नव्हे; कारण ते सध्याच्या लोकप्रिय अविचारांना मदत करणारे ठरेल.

भाजप सरकार अनेक मुद्दय़ांवर ठेचकाळत आहे, चुका करत आहे. त्यावर राजकीय टीका अनेक जण करत आहेत, घटनेच्या नजरेतून करत आहेत. आज तरी सामाजिक संघटनांपलीकडे त्यांच्याकडे काहीही नाही, ही चिंतेची बाब आहे; पण दक्षिणायन किंवा यापूर्वी असहिष्णुतेविरुद्ध केलेली वैचारिक लढाई या गोष्टी म्हणजे, अग्रलेखात अपेक्षा म्हणून मांडलेल्या मार्गावर आधी उमटलेल्या पाऊलखुणा आहेत, असे मानणे अयोग्य ठरणार नाही.

डॉ. अनिल केशव खांडेकर, पुणे

[या मुद्दय़ांखेरीज अन्य मुद्दे मांडणारी, किंवा वरील पत्रांतील मुद्दय़ांबाबत पुढील चर्चा करणारी निवडक पत्रे शुक्रवारच्या लोकमानसमध्ये]

loksatta@expressindia.com