‘काळजी आणि काजळी’ हे संतुलित संपादकीय (२४ फेब्रु.) वाचले.  वैचारिक गोमूत्राने पावन झालेले भाजपचे विजयी लोकप्रतिनिधी  पुण्यनगरीत आणि इतरत्र महापौर होतील. स्वातंत्र्यलढा, औद्योगिक प्रगती, कामगार चळवळ, पुरोगामी चळवळ असा संपन्न ऐतिहासिक वारसा आणि देशाची आर्थिक राजधानी व विद्येचे माहेरघर असा वर्तमान लौकिक असलेल्या मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालातून काही गोष्टी स्पष्ट होतात. राजकारणात नैतिकतेची जागा व्यवहारवादाने आणि मतदाराचा ग्राहक झाल्यावर निवडणुका हा बाजार अटळपणे ठरतो. मग गुंडापुंडांचा प्रवेश, घराणेशाही, भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे तिरस्करणीयऐवजी सर्वमान्य ठरतात. हे निकाल तरुण, विचारवंत आणि सुशिक्षितांना काळजीत टाकणारे असतील तर ती काळजी दूर करण्याची जबाबदारी त्यांनीच घेतली पाहिजे, अन्यथा तथाकथित वैचारिक गोमूत्राने पवित्र होऊन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून विकासनामक मलमूत्रापेक्षा वेगळी अपेक्षा करू नये. महात्मा गांधी, फुले, आंबेडकर, भगतसिंह, टिळक, आगरकर इत्यादींच्या जयंत्या आणि पुण्यतिथीप्रसंगी वैचारिक आचमन करण्याऐवजी झटपट शुद्धीकरणासाठी हमखास यश देणारे गोमूत्र प्राशन करावे. चॅनेलच्या प्राइम टाइममध्ये आणि मुद्रित माध्यमांमध्ये वैचारिक रवंथ करण्यापेक्षा क्षीण होणाऱ्या चळवळीला दिशा आणि ताकद देण्यासाठी विचारवंतांनी प्रयत्न केले तर अपेक्षित बदलाला मदत होईल, अन्यथा ग्रामपंचायत ते संसदेत देशी ट्रम्प निवडून येतील, गुलालाची उधळण आणि कर्णकर्कश फटाके सामान्यांचे जगणे असह्य़ करतील.

– वसंत नलावडे, सातारा

 

उमेदवार जिंकले, मतदार हरले..

‘काळजी आणि काजळी’ हा अग्रलेख (२४ फेब्रु.) वाचला. महानगरपालिकेचे मतदान बघता सरासरी ५१ ते ५३ टक्के झालेले मतदान हे जनतेच्या निराशेचे फलित आहे का, हा विचार समोर येत आहे. याचे कारण म्हणजे जवळपास ४७ ते ४८ टक्के लोकांनी मतदान न केल्यामुळे ही टक्केवारी निवडणुकीच्या विरोधात होती असे म्हणावे लागेल. त्याची कारणे पण वेगवेगळी आहेत. मतदारांच्या याद्यांत झालेला घोळ, मतदारांचा निरुत्साहीपणा आणि महत्त्वाचे म्हणजे मतदान करताना प्रभाग पद्धतीत पांढऱ्या, गुलाबी, पिवळ्या आणि निळ्या रंगात गोंधळलेला प्रत्येक मतदार हे होय. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मतदान कसे करावे हे सांगताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली. उमेदवारांनी फक्त आपल्या पक्षाचा व स्वत:चा प्रचार केला, परंतु मतदान कसे करावे, ज्यावर त्यांचे भविष्य अवलंबून होते ते त्यांना समजावता आले नाही. त्यामुळे मतदान यंत्रावरील बटन चार वेळा दाबायचे म्हणजे फक्त दाबायचे, मग तो उमेदवार महत्त्वाचा असो अथवा नसो. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत विकासाचा मुद्दा फार महत्त्वाचा असतो, पण या निवडणुकीत राजकीय पक्षच महत्त्वाचा दिसून आला हे मात्र तेवढेच खरे आहे. परिणामस्वरूप नागपूर काय किंवा अन्य महानगरपालिकांचे परिणाम बघता असे दिसून येते की, काही पक्ष अगदी भुईसपाट झालेत. मात्र एका पक्षाची व व्यक्तिविशेषाची लाट उमेदवारांना तारून गेली हे तेवढेच नवल ठरले. जो पक्ष प्रभाग पद्धतीला विरोध करीत होता तोच पक्ष प्रभाग पद्धती स्वीकारून महानगरपालिकेत आपले वर्चस्व लादून गेला. त्यामुळे आता विकास की व्यक्तिविशेष व पक्षलाट हे महत्त्वाचे ते जनतेने स्वत: ठरवावे. त्यामुळे इथे मला एकच म्हणावेसे वाटते, की निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उमेदवार जिंकले असले तरी मतदार मात्र अप्रत्यक्षरीत्या हरले आहेत.

– प्रा. डॉ. अमर बोन्द्रे, नागपूर

 

जनसंघाच्या जुन्या दिव्यावरील काजळी दूर होईल?

‘काळजी आणि काजळी’ हा अग्रलेख (२४ फेब्रु.) वाचला. भाजपचा विजय हा मुंबईपासून सर्वदूर पसरलेला दिसतो. या विजयाचे श्रेय फडणवीसांचेच आहे, हे नि:संशय. चलन निश्चलनीकरणाचाही त्रास होऊनही लोकांनी दीर्घ काळाचा विचार करून हा निर्णय घेतलेला दिसतो. घटना घडून गेल्यानंतर कारणमीमांसा सोपी असली तरीही ते करणे अत्यावश्यक ठरते. काँग्रेसचे अदृश्य होत चाललेले नेतृत्व, राष्ट्रवादीला कंटाळलेले लोक आणि पक्ष कार्यकर्त्यांना न सांभाळू शकलेली मनसे या पाश्र्वभूमीवर युद्ध शिवसेना आणि भाजपपुरते सीमित झाले. युतीमुळे या दोन्ही पक्षांना आपापली ताकद नेमकी अजमावून पाहता येत नव्हती, ती संधी या निवडणुकांमुळे प्राप्त झाली.

निवडणुकांच्या निर्णयाचे सखोल विश्लेषण होणे आवश्यक आहे. शेवटच्या दोन तासांत कोणकोणत्या केंद्रांवर नेमके किती मतदान झाले? किती जणांनी ‘नोटा’या पर्यायाचा वापर केला? स्थानिक पातळीवर पक्ष, व्यक्ती, विकास किंवा अन्य कोणत्या कारणांमुळे विजय वा पराभव निश्चित झाला? काही दिवसांपूर्वी एकमेकांना जेलमध्ये पाठवण्याच्या धमक्या देणारे उद्या पुन्हा एकमेकांच्याच गळ्यात गळे घालून बसणार असतील तर सामान्य माणसाची स्थिती ‘सिंहासन’मधल्या पत्रकार (निळू फुले)सारखी होईल. नीतिमूल्यांची काळजी आम्ही कशाला करू? चरख्यावरचा स्वामित्व हक्क महात्मा गांधींनी केव्हाच सोडून दिला, आता आम्ही फक्त वाल्याचे वाल्मीकी केव्हा होतील याची वाट पाहात बसलोय. निर्माणाच्या पवित्र युगात पारदर्शी कार्य करणारे नेतृत्व चरित्र निर्माण करतील आणि भारतभूमीचे कल्याण विसरणार नाहीत आणि जनसंघाच्या जुन्या दिव्यावर आलेली काजळी दूर करतील, अशी भाबडी अपेक्षा.

– शिशिर सिंदेकर, नासिक

 

आता ‘पारदर्शक’ कारभार दिसेल?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांना जवळपास समसमान जागा मिळाल्या; पण सत्तेच्या जवळ जाण्यासाठी दोघांनाही तीसच्या आसपास अधिकच्या नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे. जर या दोघांची पुन्हा युती झाली तर निवडणुकीच्या आधी पारदर्शकता, भ्रष्ट कारभार, चौकशी इत्यादी ज्या वल्गना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून केल्या होत्या, त्यांचे काय होणार याचे उत्तर भाजपचे मतदार मागतील. जर युती न करता सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले तर अशा परिस्थितीत घोडेबाजार जोरात चालण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे पुन्हा स्थिती ‘जैसे थे’. थोडक्यात, काहीही झाले तरी महानगरपालिकेचा कारभार ‘मागील पानावरून पुढे चालू’ असेच एकंदर चित्र असेल.

– निशिकांत मुपीड, कांदिवली (मुंबई)