‘एकवीस मार्च हा दिवस विषुवदिन किंवा वसंतसम्पात म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे २१ सप्टेंबरला शरदसम्पात असतो. या दोन्ही दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस-रात्र समसमान म्हणजे बारा तासांचे असतात,’ असे आपण भूगोलात शिकतो. मात्र, आपल्या पंचांगात थोडी वेगळी माहिती मिळते. साळगावकर यांच्या यंदाच्या ‘कालनिर्णय’मध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा मुंबईसाठी अशा आहेत. (पुण्याच्या वेळा सुमारे चार मिनिटे आधीच्या समजाव्या.)
२१ मार्च उदय ०६.४४ अस्त १८.४८
२१ सप्टेंबर उदय ०६.२९ अस्त १८.३४
खोलात जाऊन मागील काही वर्षांच्या कालनिर्णयमध्येसुद्धा उदयास्तांच्या नेमक्या याच वेळा दिलेल्या आढळल्या. म्हणजे २१ मार्चचे, त्याचप्रमाणे २१ सप्टेंबरचेही दिनमान १२ तास नव्हे तर १२ तास आणि चार किंवा पाच मिनिटे असल्याचे आपले पंचांग सांगते. प्रत्यक्षात १२ तास दिवस आणि १२ तास रात्र ही स्थिती १७ मार्चला (उदय सकाळी ०६.४७ आणि अस्त संध्याकाळी ०६.४७) आणि २५ सप्टेंबरला (६.३०/६.३०) असल्याचे पंचांगावरून दिसते. मग २१ मार्च हा विषुवदिन कसा? आणि २१ सप्टेंबर हा शरदसम्पात कसा?
याशिवाय आणखीही एक विसंगती आढळते. भारतीय प्रमाण वेळ (भाप्रवे) ही ८२.५ अंश पूर्व या रेखावृत्तावरील स्थानिक वेळेप्रमाणे ठरविली असल्यामुळे, २१ मार्च रोजी त्या वृत्तावरील सर्व ठिकाणी (उदा. अलाहाबाद शहर ) सूर्योदय बरोबर सकाळी सहा वाजता, मध्यान्ह १२ वाजता आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजता व्हायला हवा. पण मुंबईचे रेखावृत्त सु. ७३ अंश पूर्व म्हणजेच प्रमाण रेखावृत्ताच्या पश्चिमेस ९.५ अंश असल्यामुळे मुंबईची स्थानिक वेळ ही भाप्रवेच्या सुमारे ३८ मिनिटे मागे आहे. अर्थात, २१ मार्च रोजी मुंबईचा सूर्योदय सकाळी ६.३८ वाजता आणि सूर्यास्तही संध्याकाळी त्याच वेळी व्हावयास हवा. प्रत्यक्षात सूर्योदयाची वेळ ६.४४ असल्याचे पंचांग सांगते, आणि दिनमान १२ तास चार मिनिटांचे.
वरील दोन्ही विसंगती कोणत्या कारणांमुळे येतात याचे स्पष्टीकरण खगोलशास्त्राच्या जाणकारांनी द्यावे, अशी अपेक्षा आहे.
– विजय आ. श्रोत्री, बावधन, पुणे

 

Earth Day History and importance in Marathi
Earth Day 2024 : जागतिक वसुंधरा दिनाची सुरुवात का आणि कधी झाली? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
Aditya Thackeray
‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका
Loksatta viva A glamorous celebration of fashion Lakme Fashion Week Geo World Garden
लॅक्मे फॅशन वीकची सेलिब्रिटी मांदियाळी
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव

कम्युनिस्ट आवाज उठवतात..
‘सडक्यातले किडके’ हा अग्रलेख (१६ मार्च) वाचला. अग्रलेखात छगन भुजबळ यांच्या अटकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय साठमारीचा आढावा घेणाऱ्या याच अग्रलेखात शेवटी म्हटले आहे- ‘ही अशी प्रकरणे पुन:पुन्हा होत राहतात, कारण त्यासाठी सोयीची ठरणारी व्यवस्था सुधारावी असे कोणत्याही पक्षाला वाटत नाही.’ पण हे विधान सवंग आहे. कारण देशातील भ्रष्टाचाराचे मूळ असलेल्या ‘क्रोनी कॅपिटॅलिझम’विरुद्ध जर कोण सातत्याने आवाज उठवत असेल तर ते दोन्ही कम्युनिस्ट पक्षच आहेत. पण याच कम्युनिस्ट पक्षांची ‘आíथक साक्षरते’च्या बाबतीत बावळट, मागास अशी हेटाळणी करणे हा लोकसत्ताकारांचा आवडता छंद आहे. कम्युनिस्ट पक्षांना इतर पक्षांच्या पंक्तीत उभे करणे, हा केवळ त्यांच्यावर अन्याय नसून राजकीय चच्रेचे जाणीवपूर्वक केलेले विकृतीकरण आहे. सबब त्याचे खंडन करणे जरुरीचे आहे.
– प्रसाद घागरे (मुंबई अध्यक्ष, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष).

 

देव कोपणार नाहीत
धुलिवंदन आणि त्याचे शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, आíथक दुष्परिणाम याविरोधात बोलावे आणि लिहावे तितके कमीच आहे. रंगाची, पाण्याची आणि अनेकदा तर मानवी संबंधांचीही नासाडी करणाऱ्या या सणापासून सुज्ञांनी लांबच राहिलेले बरे. रंग, त्यातील घातक रसायने, त्यामुळे त्वचेचे होणारे नुकसान, रंगाच्या नावाखाली उडवली जाणारी घाण, पसरवली जाणारी दहशत हे सारे भटक्या व चावऱ्या कुत्र्यांच्या दहशतीपेक्षा दाहक आहे. रंग उधळला नाही, पाण्याने-घाणीने कुणाला माखवले नाही, तर आपल्या दैवतांपकी कुणीही कोपणार नाही व शापही देणार नाही हा माझा गेल्या अनेक वर्षांचा वैयक्तिक अनुभव आहे. जागरूक वाचकांनीही तो मनोभावे घ्यावा व पाणीटंचाईच्या काळात पूर्णत: कालबाह्य़ ठरलेल्या या धुळवडीला समाजमानसातूनही हद्दपार करावे, अशी सर्वाना मनापासून विनंती.
– राजेंद्र घरत, वाशी, नवी मुंबई.

 

मैदानावर राज्य खेळांचेच हवे!
१६ मार्चच्या टी-ट्वेंटी सामन्यात ईडन गार्डनवरील प्रेक्षकांनी बांगलादेशच्या टीमपेक्षा पाकिस्तानच्या खेळाडूंना जास्त प्रोत्साहन दिले असे वृत्त आहे. परंतु एक भूतपूर्व कोलकातावासी या नात्याने मला खात्री आहे की पाक कप्तान शाहीद आफ्रिदीच्या तुफानी फलंदाजीला तेथील प्रेक्षकांनी जशी दाद दिली असेल तसाच बांगलादेशच्या सौम्य सरकार याने सीमारेषेवर घेतलेला अप्रतिम झेलही त्यांनी वाखाणला असेल. वास्तविक, मला वाटते की प्रेक्षकांनी चांगला खेळ -मग तो कोणत्याही टीमचा का असेना- उचलून धरला पाहिजे. १९ मार्चच्या ईडन गार्डनवरील सामन्यात माझे प्रिय कोलकातावासी हे तारतम्य बाळगतील व भारत-पाक या दोन्ही चमूंचे खेळाडू जेव्हा जेव्हा उत्कृष्ट खेळतील तेव्हा तेव्हा टाळ्यांच्या गजराने त्यांची वाखाणणी करतील, अशी मी आशा करतो. सामन्यांच्या मदानांवर खेळाचे राज्य असायला पाहिजे- कोणत्याही देशाचे नव्हे!
– सुकुमार शिदोरे, पुणे.

 

हीच अधिकृत भूमिका?
‘मुख्यमंत्री, तुम्ही चुकत आहात.. ’ या १४ मार्चच्या अग्रलेखावर भारतीय जनता पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षांचे ‘चूक नव्हे ,हा निर्णय लोककल्याणाचाच’ हे पत्र शासनाची अधिकृत भूमिका समजायचे काय? त्या बाबतचा शासननिर्णय नक्की काय होणार आहे? की, हे पत्र म्हणजेच शासननिर्णय समजावे!
– प्रभू राजगडकर, नागपूर</strong>

 

१८३७ नव्हे, १७३७
‘नागर आख्यान’ या सदरातील ‘प्रशियाची राजधानी बर्लिन’ या लेखांकाच्या (१८ मार्च) दुसऱ्या परिच्छेदात, ‘१८३७ साली (बर्लिनची) लोकसंख्या ८० हजार झाली’ असा उल्लेख माझ्या नजरचुकीने झाला आहे. वास्तविक तो ‘१७३७ साली’ असा हवा होता.
– सुनीत पोतनीस, नाशिक