‘सेंद्रिय शेतीकडे आता लक्ष द्यावे’ हा पाशा पटेल यांचा लेख वाचला (लोकसत्ता, रविवार विशेष, १८ मार्च). यामध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या पक्षाचे गोडवे गात शेतकरी मोर्चाचे (लाँग मार्च) खापर काँग्रेस-राष्ट्रवादीवर फोडले. आघाडी सरकारने आदिवासींना त्यांचा हक्क दिला असता तर त्यांना आत्ता मोर्चा काढायची वेळ आली नसती; मग भाजपने चार वर्षांत काय केले, हा प्रश्न उरतोच.

शिवाय, ‘देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आपला प्रश्न सोडवेल अशी आशा त्यांना वाटली म्हणून हजारो शेतकरी उन्हातान्हात चालत आले’ असे याच लेखातील म्हणणे! तुम्ही जर उन्हातान्हात २०० किलोमीटर (स्वत:चे पाय रक्ताने माखून) मुंबईपर्यंत आलात, तरच तुमच्या मागण्या मान्य होतील असा त्याचा अर्थ होतो काय?

अदिवासी शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न इतर शेतकऱ्यांपेक्षा कमी असण्याचे मूळ कारण असे की, ते रासायनिक खतांचा खूप कमी वापर करतात (भांडवल कमतरता) हे त्यांचे बलस्थान नसून त्यांच्यासाठी नुकसानकारकच ठरले आहे; कारण काहीही झाले तरी रासायनिक खत घालून केलेल्या शेतीतील उत्पन्न हे सेंद्रिय खत घालून केलेल्या शेतीपेक्षा नेहमी जास्तच राहिले आहे. सेंद्रिय शेतीची अजून बाजारपेठ उपलब्ध नसताना असा सल्ला त्यांना देणे जरा जिकिरीचे आहे. त्यापेक्षा पाशा पटेल यांनी त्यांना ‘सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खताची जोड देऊन शेती करा असा सल्ला दिला’ असता तर बरे झाले असते.

अभिजीत दिलीप पवार, इस्लामपूर, अकलूज

जहाल पत्रकारासमोर राहुलची भंबेरी उडेल..

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलेली कौरवांची उपमा आणि स्वत:ला दिलेली पांडवांची उपमा खरोखरच अविवेकी बोलण्याची परिसीमा म्हणावी लागेल. फक्त आरोपाकरिता आरोप करायचे. पुरावे तर सोडाच, आरोपदेखील कपोलकल्पित. त्यातदेखील ठोसपणा कुठेच नाही. सत्तर वर्षांपासून अविरत सत्ता उपभोगणारे पांडव आणि मागच्या चार-पाच वर्षांपासून सत्तेवर असलेले कौरव. हे असे कसे होऊ शकते? यांना महाभारत पूर्णत: माहीत आहे की नाही? उद्या जर अर्णव गोस्वामीसारख्या जहाल पत्रकाराने प्रश्नांची सरबत्ती केली तर राहुलची काय भंबेरी उडेल याची सर्वाना कल्पना आहे. मग असले बिनबुडाचे आरोप करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा सत्तारूढ पक्षाच्या कार्यपद्धतीचे सखोल अध्ययन करून काही ठोस पुराव्यांसोबत जर आरोप केले तर त्याने विश्वासार्हता जास्त वाढेल.

मोहन लाडूकर, ठाणे 

पांडव म्हणजे चांगलेच असे कसे?

रामायण व महाभारतात जाण्याची आतापर्यंत भाजपची मिरासदारी होती. ती मिरासदारी तोडून राहुल गांधीही आता महाभारतातील पात्रांमध्ये घुसू लागले आहेत. देशाचे नेतृत्व  करणारे धर्मनिरपेक्ष असावेत असा डंका एरवी बडवणारे आता अचानक मंदिरात जाऊ लागले आहेत. पांडव म्हणजे चांगलेच असे कसे म्हणता येईल? कारण कुरुक्षेत्राच्या युद्धात गंगापुत्र भीष्म, आचार्य द्रोणाचार्य, दानवीर कर्ण या सर्व महारथींना पांडवांनी कपटानेच मारले. त्यामुळे कौरव म्हणजे वाईट व पांडव म्हणजे चांगले ही संकल्पना आता लोप पावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाभारत चांगले वाचावे. जमल्यास भगवद्गीता वाचावी म्हणजे कर्मयोगांचे त्यांना दर्शन होईल. त्यांची त्यांना जास्त गरज आहे.

प्रशांत कुलकर्णी, मनमाड

कोणी पप्पूम्हणा, कोणी काँग्रेसमुक्तम्हणा..

लोकसभा- २०१४ च्या निवडणुकीत त्या वेळी नवख्या असलेल्या राहुल गांधी यांना ‘पप्पू’ या विशेषणाने हिणवत, प्रचारात राळ उठविण्यात आली होती. आणि एकहाती सत्ता आल्यानंतर, अतिआत्मविश्वासाच्या भरात ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणासुद्धा केली गेली. पण मागील चार वर्षांत राहुल गांधी यांनी आपल्या कार्यशैलीत बदल करून, गुजरात विधानसभा निवडणुकीत चमक दाखवून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. आता याच ‘पप्पूने’ आपल्या नेतृत्वाखाली काँग्रेसची दमदार वाटचाल सुरू केली आहे.

पक्षाच्या ८४ व्या महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणाने काँग्रेसमध्ये नवचतन्य निर्माण करून, आपला पक्ष येणाऱ्या निवडणुकीत भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज आहे, असे स्पष्ट संकेत राहुल यांनी दिले आहेत. आपल्या पक्षात तरुणांना योग्य संधी दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आणि पक्षातील ढुढ्ढाचार्यानाही योग्य तो संदेश दिला. आपल्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या वाटचालीची दिशा राहुल यांनी स्पष्ट केली. भाजपची ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा ही केवळ दिवास्वप्नच ठरणार आणि २०१९ ची निवडणूक रंगतदार ठरणार, हे पुरेसे स्पष्ट झाले आहे.

आता भाजपने गंभीरपणे चिंतन बठका घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)

काळी आई मुक्तिसंग्रामव्यापक व्हावा

‘नीरवला दिलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांकडून नांगरणी!’ ही बातमी (लोकसत्ता, १८ मार्च) वाचून समाधान झाले. जमिनीची किंमत कवडीमोल, अनेकांचे पसे दिले नाहीत, मग प्रस्तुत जमीन नीरवच्या वा त्याच्या कंपनीच्या नावावर कशी झाली? यात जे कुणी सरकारी व खासगी दलाल असतील त्यांची चौकशी करून त्यांना जेलची हवा खाण्यास पाठवावे. शेतजमीन हिरे-कंपनीला दिली याचा अर्थ त्या जागी तो धंदा येणार होता. या अशा धंद्याला शेतजमीन देता येते का? याचीही चौकशी झाली पाहिजे. राज्यात व मुंबईच्या आसपास शेतकऱ्याच्या जमिनी, धनिक व लुटारू भांडवलदार अशाच पद्धतीने घेत आहेत, घेतल्या आहेत. ज्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेऊन अजूनही पडीक राहिल्या आहेत त्या संबंधित शेतकऱ्यांनी ताब्यात घेऊन ‘काळी आई मुक्तिसंग्राम’ चळवळ अधिक व्यापक करावी.

मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

पवारांच्या सदिच्छांनी राहुलयुक्त भारत’?

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर सोडलेल्या टीकास्त्रामागे निश्चित स्वरूपाची योजना दिसून आली. दिल्लीतल्या काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी करीत असलेली टीका आणि राज ठाकरे यांनी केलेली टीका यामध्ये समान सूत्र दिसून येते. गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी शरद पवार आणि राज ठाकरे यांची झालेली भेट ही केवळ सदिच्छा भेट स्वरूपाची नव्हती; कारण संपूर्ण भाषणात काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध एकही शब्द काढला गेला नाही. मोदींवर टीकेच्या फैरी झाडून विरोधी पक्षांच्या तथाकथित एकीमध्ये आपला सहभाग दाखविणे हेच उद्दिष्ट दिसून आले. राज यांच्या संपूर्ण भाषणाचे सार म्हणजे मोदींना आणि भाजपला सत्ताउतार करा आणि काँग्रेसच्या मागे ताकद उभी करा, मोदीमुक्त म्हणजे काँग्रेसयुक्त आणि राहुलयुक्त असाच संदेश राज यांनी दिला.

अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण

तिसरे स्वातंत्र्य येईलदेखील, पण पुढे काय?

मोदी सरकारवर बहुतांश जनता नाराज असली तरी आणि राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे २०१९ साली तिसरे स्वातंत्र्य मिळवायचे ठरवले तरी आणीबाणीनंतर मिळवलेल्या दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर आलेल्या जनता पक्ष सरकारचा (१९७७) दाहक अनुभव जनतेने घेतलेला आहे. सध्याच्या विरोधी पक्षांची मोट बांधून तथाकथित स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर फार काही अपेक्षा करता येईल असे वाटत नाही.

मोहन गद्रे, कांदिवली

राज यांची निराधार, भडकविणारी विधाने

‘मोदीमुक्त भारतासाठी एकत्र या’ (बातमी : लोकसत्ता, १९ मार्च) असे आवाहन करताना राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या त्यांच्या भाषणादरम्यान वादग्रस्त तसेच काहीं चक्क बिनबुडाची विधाने केल्याचे आढळते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरूंवर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवण्यासाठी दबाव आणला होता अशा स्वरूपाचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. माझ्या माहितीप्रमाणे पटेल यांचे १९५२ साली निधन झाले; तेव्हा मुंबई- महाराष्ट्र असा कुठलाही प्रश्नच अस्तित्वात नव्हता. भाषावार प्रांतरचनेनुसार आंध्रप्रदेश हे पहिले राज्य १९५४ साली निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रश्नाला गती मिळाली, त्यामुळे पटेलांच्या हयातीत नेहरूंवर त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नी दबाव आणला असे विधान राज ठाकरे यांनी कुठल्या आधारावर केले?

रामजन्मभूमी प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राममंदिर झालेच पाहिजे, पण त्याला धार्मिक स्वरूप देऊ नये. रामजन्मभूमी प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे आहे आणि त्यात मुस्लीम वक्फ मंडळ, जन्मभूमी न्यास आणि निर्मोही आखाडा अशा तीन पक्षांनी वादग्रस्त भूमीवर अधिकार सांगितला असताना  त्या विषयाला ‘धार्मिक स्वरूप देऊ नये’ असे म्हणणारे राज ठाकरे ‘मंदिर झालेच पाहिजे’ असे विधान करून धार्मिक तेढ निर्माण करत नाहीत का?

राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

loksatta@expressindia.com