News Flash

‘राहुलमुक्त कॉँग्रेसची’ खरी गरज

गुरुवारी जाहीर झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निकालानंतर ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा शब्द पुन्हा चच्रेत आलेला आहे.

गुरुवारी जाहीर झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निकालानंतर ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा शब्द पुन्हा चच्रेत आलेला आहे. एके काळी निर्वविाद वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसची सत्ता अवघ्या पाचच राज्यांत उरली आहे. त्यातही कर्नाटक हे एकच राज्य मोठे आहे. काँँग्रेसविरोधकांना जरी ही बातमी गुदगुल्या करणारी वाटत असली तरी दूरगामी विचार केला असता ही गोष्ट देशहितासाठी तितकीशी स्वागतार्ह वाटत नाही. कारण लोकशाहीत सशक्त विरोधी पक्ष असणेदेखील गरजेचे असते. काँँग्रेस नामशेष झाली तर विविध प्रादेशिक पक्ष ती जागा घेतील आणि राज्य पातळीवर जरी प्रादेशिक पक्ष हितावह असले तरी केंद्रीय राजकारणात राष्ट्रीय पक्षाप्रमाणे व्यापक विचार करण्यात त्यांच्यावर मर्यादा असतात. कोणत्याही एकाच पक्षाची प्रदीर्घ काळ एकहाती वर्चस्व राहणे भविष्यात धोकादायक ठरू शकते. काँग्रेसची सध्याची अवस्था जरी जर्जर असली तरी ती तशीच राहील असे नाही. कोणताही देशव्यापी पक्ष असा सहजासहजी अस्तंगत होत नसतो. मात्र त्यासाठी त्यांना सर्वच आघाडय़ांवर सपशेल अपयशी ठरलेल्या ‘युवा नेते’ राहुलबाबांची अंधभक्ती सोडावी लागेल. थोडक्यात आपणाला सध्या ‘काँग्रेसमुक्त भारतापेक्षा राहुलमुक्त काँग्रेसची’ खरी गरज आहे असे वाटते.
– अनिरुद्ध ढगे, वास्को द गामा (गोवा)

 

भरलेल्या ताटाचे वाटेकरी..
लोकसभेच्या आणि महाराष्ट्राच्या घवघवीत यशात संघाचा सिंहाचा वाटा आहे असा दावा संघाचे समर्थक करतात. त्यानंतर झालेल्या दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला तेव्हा संघसमर्थकांनी खांदे पाडून सूचक मौन पाळले. आता आसाममध्ये भाजप जिंकला म्हटल्यावर संघाचे पोपट या विजयात संघाचे लक्षणीय योगदान आहे असा सूर आळवू लागले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा, गेली लोकसभा या निवडणुकांत काँग्रेसची जमिनीला पाठ लागली त्याचे अपश्रेय राहुल गांधींना नाही, पण बिहार विधानसभेच्या विजयात- खरं तर खारीएवढादेखील वाटा नसताना सारे श्रेय राहुलबाबांना. आताच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे अपश्रेय मात्र राहुलबाबांना नाही. संघ आणि राहुल गांधी.. फक्त भरलेल्या ताटाचे वाटेकरी.
– सुहास शिवलकर, पुणे

 

जुन्या धडय़ाची नवी उजळणी
‘नायकांची निवडणूक’ हा अग्रलेख (२० मे) पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करतो. आपण म्हणता तसे व्यक्तिनिष्ठता ही संस्कृती भारतीय समाजात वाढत चाललेली बाब असून ती आपल्याला हितावह नाही. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने ही निवडणूक धोक्याची घंटा असली तरी भाजपलाही यातून काही सुरेल घंटानाद बहाल होत नाही. प्रादेशिक पक्षांना येणारे महत्त्व हे मोदी सरकारला सोयीचे वाटत असले तरी त्यांची अरेरावी सहन करणे आणि त्यांच्या नाकदुऱ्या काढणे हे सोपे काम नाही. ममता, जयललिता यांना गृहीत धरता येणार नाही. महाराष्ट्रात शिवसेनाही आता अधिक आक्रमक होईल. थोडक्यात, केवळ निवडणुकीपुरते समझोते करण्याऐवजी राजकीय अपरिहार्यतेतून असे समझोते आता वारंवार आणि निष्ठेने करावे लागणार आहेत, हा धडा भाजप शिकतोच आहे. या निवडणुकीने त्याची उजळणी झाली एवढेच.
– अविनाश माजगावकर, पुणे

 

दरी रुंदावतच जाणार!
संजीव चांदोरकर यांचा ‘पनामा पेपर्स, कॉर्पोरेट्स व जनता’ हा लेख (२० मे) वाचला. सदर लेखात बहुराष्ट्रीय कंपन्यांची करचोरीची पद्धती व त्याचा सामान्य माणसाच्या राहणीमानाशी संबंध मांडला होता. सर्वप्रथम आपण कर चुकवणे (टॅक्स इव्हॅजन) व कर टाळणे (टॅक्स अव्हॉयडन्स) या दोन्हीतील मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे. कर चुकवण्याचा संबंध काळ्या पशाशी आहे व तो कायदेशीर गुन्हा आहे. कर टाळणे म्हणजे कायद्यात असलेल्या पळवाटांचा योग्य रीतीने वापर करणे. बहुराष्ट्रीय कंपन्या दुसऱ्या पद्धतीने कर टाळत असल्याने आपण कायदेशीररीत्या त्यांना पकडू शकत नाही. ‘गार’सारख्या कायद्याची यापुढील वर्षांपासून अंमलबजावणी करणे व कायद्यातील पळवाटा कमी करणे इतकेच विकसनशील देशांच्या हाती आहे. कर टाळणे पूर्णपणे थांबवणे शक्य नसले तरी योग्य कायद्यातील तरतुदी वापरून कमी करणे शक्य आहे. पण या कंपन्यांचा सरकारवरील दबाव एवढा जास्त आहे की ‘गार’ संसदेत मांडल्यानंतर प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपतिपदी पाठवण्यात आले व त्यानंतर या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे कोणत्याही सरकारला शक्य झालेले नाही. विकसनशील राष्ट्रांनी ठोस पावले उचलली नाहीत तर त्यांचे असेच शोषण होत राहील व मदतीच्या स्वरूपातील रकमेद्वारे विकसित राष्ट्रे त्यांना आपल्या प्रभावाखाली कायम ठेवतील. यामुळे विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमधील दरी अधिक रुंदावत जाईल हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
– स्वप्निल देशमुख, कल्याण

 

हिंदू धर्म आणि संस्कृतीची महानता
‘अ‍ॅपल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. हिंदू धर्म आणि संस्कृती जगात प्रसिद्ध आहे. आपल्या धर्मातील देवतांचे महत्त्व हिंदूंना माहीत नसेल त्याहून अधिक त्यांना माहीत असावे, असे वाटते. बुद्धीची देवता असलेल्या मंगलमूर्तीचे महत्त्व कूक यांना ठाऊक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘अ‍ॅपल’चे संस्थापक स्टीव्ह जॉब्सही हिंदू संस्कृतीकडे आकर्षति झाले होते.
– कुणाल चेऊलकर, नाहूर (मुंबई)

 

फुलपाखराला संस्कृतमध्ये ‘चित्रपतंग’ हा शब्द
‘संस्कृत भाषेच्या श्रेष्ठत्वाचे मिथक’ हे पत्र (लोकमानस, २० मे) वाचले. या पत्रात ‘संस्कृत भाषेत फुलपाखराला शब्दच नाही’ असा उल्लेख आहे. त्या संदर्भात एक माहिती : वामन शिवराम आपटे यांच्या ‘द स्टुडन्ट्स इंग्लिश-संस्कृत डिक्शनरी’ या कोशात ‘बटरफ्लाय’ याचा अर्थ ‘चित्रपतंग’ असा दिला आहे.
– विनायक शंकर ठकार, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 2:54 am

Web Title: loksatta readers letter 50
टॅग : Readers Letter
Next Stories
1 नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा घटता प्रभाव?
2 केवळ ‘नीट’चाच पुळका कशासाठी?
3 भारतीय कुस्तीला हानी पोहोचवणाऱ्या घटना
Just Now!
X