‘सुरतमधील व्यापाऱ्यांना भडकावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न – स्मृती इराणी’ हे वृत्त (१० नोव्हें.) बरेच काही उघड करते. ‘‘वस्तू व कर सेवाप्रणाली त्रासदायक असल्याचे प्रतिज्ञापत्र सुरत वस्त्रोद्योगातील प्रतिनिधी मंडळाने दिल्ली येथे सादर केले’’ ही ‘भरवशाच्या म्हशी’ने घडविलेली ‘डेव्हलपमेंट’ (अर्थात ‘विकास’ नव्हे तर पुच्छ-प्रगती!) भाजपच्या तोंडचे लोणी नाहीसे करू शकते. ‘आम्ही (प्रदीर्घ काळ, साधकबाधक चर्चेनंतर आणि पूर्ण विचारांती) केलेल्या योजनेत त्रुटी आहेत, (त्या क्षुल्लक नसून फार मोठय़ा असल्याने) व्यापाऱ्यांना समस्यांचा सामना करणे भाग झाले’ असा कबुलीजबाब दिला आहे. भव्य-दिव्य प्रतिमेचा दावा करणाऱ्या नेतृत्वाची छाती ५६ इंची नसून आक्रसलेली आहे. ‘किंग कॅन डू नो राँग’ असे दोषाचा कोठेही स्पर्श न झालेले, ‘नेतृत्व जे अलांच्छ्न’ असा अद्भुत अलौकिक अवतार नाही तर नेतृत्वाचे पाय मातीचेच आहेत हे यातून अभावितपणे किंवा अपरिहार्यतेने सांगितले जाते. मग भक्तगणांनी कोणाच्या आशेवर दिवस कंठावयाचे?

कोणत्याच त्रुटीची आणि चुकांची कबुली देणे गांधींच्या नव-भक्तांना आणि त्यांच्या ‘प्रतापी’ नेत्यांना परवडत नसते. पण कितीही वल्गना केल्या तरी ‘पैशाचे सोंग’ कोणालाच आणता येत नाही हे आता उमजू लागले आहे. त्यामुळे वल्गना बंद करून ‘रडगाण्या’च्या भूमिकेत ते गेले आहेत. हा बदल, ही कोंडी अधोरेखित केली तर कार्याचे योग्य मूल्यमापन करणे भक्तांना टाळता येणार नाही अशी आशा आहे. भक्तिभावनांच्या कल्लोळाची व्यर्थता, तोटे सांगणे आवश्यक आहे.

-राजीव जोशी, नेरळ

 

शिवसेना राष्ट्रीय पक्ष बनला, हे कळलेच नाही..

शिवसेना गुजरातमध्ये विधानसभेच्या ५० हून अधिक अधिक जागा लढविणार ही बातमी (१० नोव्हें.) वाचली. हिमाचल प्रदेशातही निवडणुका होत्या. परंतु शिवसेनेला त्यांचा कसा काय विसर पडला? मुंबईत  एकेकाळी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या  शिवसेनेचे राष्ट्रीय पक्षात केव्हा रूपांतर झाले, ते कळलेच नाही. कदाचित मुंबईतल्या मराठी माणसांच्या सर्व समस्या मिटल्या असाव्यात. त्यामुळे देशांतर्गत कोठेही निवडणुका लढविण्याचा त्यांचा हक्क कोणाला हिरावून घेता येणार नाही. तसेच गुजरातमध्ये आमचाच मुख्यमंत्री होणार, हे नेहमीप्रमाणे जाहीर करायला शिवसेनेचे एक अग्रमानांकित प्रवक्ते बहुधा विसरलेले दिसताहेत. त्यांना याची आठवण करून देण्यासाठी हा पत्रप्रपंच.

– उल्हास गुहागरकर, गिरगांव (मुंबई )

 

सक्ती व स्वेच्छा यातील फरक कळत नाही?

‘तेव्हाच्या रांगांत कोणी मेल्याचे ऐकले नाही’ हे पत्र (लोकमानस, १० नोव्हें.) वाचून विशाद वाटला. स्वत:च्या कष्टाने कमावलेले पैसे एका रात्रीत झाल्यावर आपल्याच कष्टाची पुंजी बँकेत जमा करण्यासाठी तासन्तास थांबल्यामुळे मरण पावलेल्या लोकांच्या प्रामाणिकपणावरच शंका घ्यायची, म्हणजे हा ‘भक्तांचा’ कळस आहे.

पत्रलेखकाने दूधखरेदी, रेल्वे तिकीट वा मुलांच्या प्रवेशासाठी रांगेत थांबल्याचे उदाहरण दिले आहे. पण दूध कुणाला हवे होते? रेल्वेने सुट्टीत कोणाला जायचे होते? व मुले कुणाची होती याचीही उत्तरे लेखकाने द्यावीत. सक्ती व स्वेच्छा यातील फरक लेखकाला कळत नाही का? का पैशाअभावी स्वत:च्या मांडीवर स्वत:चे मरणारे मूल बघणाऱ्या आईची हतबलता लेखकाला खोटी वाटते? आणि तेव्हा कोणी मेले नाही म्हणून आता कोणी मेले नसणार या तर्कटाला काय म्हणावे?

– कौस्तुभ तिलोत्तमा सोमकांत, लातूर</strong>

 

दिवास्वप्न पाहताना..

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान..’ हा ‘अन्वयार्थ’ (९ नोव्हें.) वाचला. यातून एक गोष्ट कळते की, जरी शरद पवारांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असली तरी ती त्यांनी जवळपास गमावलेली दिसते. त्यांच्या खासदारांची संख्या आपल्याला ते प्रतीत करते. खुद्द पवारांनीच वेळोवेळी हे मान्यही केलेय. पण आपल्या वक्तव्यातून जर प्रफुल्ल  पटेलांना आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असे सूचित करायचे असेल तर ते मात्र हास्यास्पदच आहे. कारण बऱ्याच वेळा पवारांनी मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगितले आहे. या विधानाची आता सगळ्यांना सवय झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला यातून काही फायदा होईल असे वाटत नाही.

– विशाल ना. खोडके, अंबड (जालना)

 

सहमतीच्या कार्यक्रमाबद्दल कारवाई कशी

‘बेस्ट कर्मचाऱ्यांकडून माधवी जुवेकरवर नोटांची उधळण’ ही बातमी (९ नोव्हें.) वाचली. त्यात असं म्हटलं आहे की माधवीसह ११ जणांवर कारवाई होऊ  शकते. जर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम स्वत:च्या पैशांनी व सहमतीने केला असेल तर त्यात कारवाईचा प्रश्न येतोच कुठे? कोणता कार्यक्रम करावा आणि पाहावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य माधवी जुवेकर आणि बेस्ट कर्मचारी यांना नाही का?

–  शरद कोर्डे, ठाणे</strong>

 

लहान मुलांमध्ये हिंसकता येते तरी कुठून?

हरयाणामधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर या चिमुकल्याची हत्या ही शाळेतीलच अकरावीच्या विद्यार्थ्यांने केल्याचे उघड झाले. ही अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. तसेच समाजाला अस्वस्थ करणारी आहे. लहान मुलांमध्ये ही हिंसकता येते तरी कुठून? मुलांमध्ये अशा वयात येणारी क्रूरता आणि हिंसकता या समाजाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या घटना तर आहेतच पण पालकांची चिंता वाढवणाऱ्यासुद्धा आहेत.

– अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)

 

सरजट यांचा राजीनामा आणि आत्महत्या

‘पटेल – न पटेल’ या अग्रलेखात (१० नोव्हें.) प्रीती पटेल, सर मायकेल फेलॉन या मे मंत्रिमंडळातील सदस्यांच्या हकालपट्टीचा तर डॅमिअल ग्रीन यांच्या चौकशीचा उल्लेख आहे. दरम्यान ३ नोव्हेंबरला वेल्स मंत्रिमंडळातून कार्ल सरजट यांचीही गैरवर्तणुकीमुळे हकालपट्टी करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे त्यांनी ७ नोव्हेंबरला आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.

– सुखदेव काळे, दापोली